Categories
अंधश्रद्धा

गुप्तधनाच्या लालसेतून चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न : अंनिसची चौकशीची मागणी

फेब्रुवारी – २०१३

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील मुरली येथे गुप्तधनाच्या लालसेतून चिमुकलीचा बळी देण्याचा प्रयत्न गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे फसला. त्यात ग्रामस्थांनी दोन आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले; परंतु घाटंजी पोलिसांनी ही घटना गांभीर्याने न घेता आरोपींवर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून मोकळे सोडले. त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले. त्यामुळे या घटनेबाबत आता वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.

            प्रत्यक्ष घटनास्थळ पाहून कुणालाही कळेल की, हा प्रकार गुप्तधनाचा आहे. त्या संदर्भातील साहित्य जप्त केले असतानाही आणि फिर्यादीच्या बयाणाला महत्व न देता आरोपींनी फिर्यादीला एक लाख रूपये देण्याचे आमिष दाखविले. मंदिराच्या टिनशेडसाठी पैसे द्या, पण पोलिसांना बोलावू नका, असे सांगितले. एवढे असूनही पोलिसांकडून आरोपींची पाठराखण केली जात आहे. मुलीच्या किंचाळण्याने ग्रामस्थ गहिवरून गेले. ते म्हणतात की, काही झाले तरी चालेल; पण चिमुकलीचा जीव वाचला पाहिजे. तालुक्यातील चोरंबा गावातील सात वर्षीय बालिका सपना गोपाळ पळसकर ही दसर्‍यापासून गायब आहे. त्याबाबत घाटंजी पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे. अजूनही ती मिळाली नाही, ही बाब घाटंजी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. मुरली येथील नरबळीबाबत वृत्तपत्रांतून बातम्या प्रकाशित होताच उपविभागीय पोलिस अधिकारी भालचंद्र महाजन घाटंजी पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परंतु त्यांनी या संदर्भातील माहिती नंतर सांगतो, असे म्हणून वेळ निभावून नेली. वृत्त लिहिपर्यंत घाटंजी पोलिसांची कारवाई चालूच होती. परंतु या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींऐवजी फिर्यादीचीच कसून चौकशी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकरणातील फिर्यादी, तपास अधिकारी व संबंधितांचे कॉल डिटेल्स तपासल्यास सोक्षमोक्ष लागेल, असे बोलले जात आहे. प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून माझी मुलगी माझ्या पदरात टाका, असा टाहो चोरंबा येथील शारदा गोपाळ पळसकर या मातेने फोडला आहे.

            या प्रकरणाच्या चौकशीची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यवतमाळ जिल्हा शाखेने केली आहे. या संदर्भात नुकतेच एक निवेदन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन आरोपींना ताब्यात घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.

            तसेच निरपराध मुलगी सपना हिचा शोध घेण्याची मागणी विजय धाडसे, सुरेश वरभे, प्रकाश डब्बावार, किशोर पारटकर, विजय क्षीरसागर, विजय गाडगे, सविता हजारे, निलेश राऊत, रूपेश वानखडे, आकाश लोणारे, सचिन पाटील, एम.डी.कांबळे, सोनाली टाक, ज्योती डब्बावार यांनी केली आहे.             

– सुरेश वरभे, यवतमाळ