Categories
भांडाफोड

भानसहिवरेत जमिनीतून मळगंगा देवी प्रकटल्याचा दावा

फेब्रुवारी – २०१३

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे एका महिलेला स्वप्नात मळगंगा देवीचा साक्षात्कार झाला व जवळच देवीचा तांदळा निघाला. देवीने साक्षात्कारातून सांगितल्याप्रमाणे तिथे बोअर घेतला असता पाणी लागल्याचा दावा करण्यात आला. हा दैवी चमत्कार की अफवा याबाबत परिसरात दिवसभर चर्चा होत होती. व येथे श्रद्धाळूंची गर्दी जमली होती. दरम्यान याबाबत कार्यकारणभाव शोधण्याची गरज असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव डॉ. मच्छिंद्र वाघ यांनी म्हटले असून 3 वेळा हा चमत्कार करून दाखविल्यास 21 लाखांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले आहे.

            याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे संगीता पोपट कोकाटे(वय 32 वर्षे) या विवाहित महिलेच्या स्वप्नात मळगंगा देवीचा साक्षात्कार झाला व देवीने 4 ते 18 डिसेंबर पर्यंत या महिलेच्या शरीरात प्रवेश केला. त्यामुळे ती निश्चल पडून राहिली. या काळात केवळ 2 चमचे दूध व गोमूत्र प्राशन करून 15 दिवस तिने उपवास ठेवला. या काळात पहाटे 4 वाजता व सायंकाळी 5 वाजता भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत. तिने 18 डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी देवी प्रकट होईल असे सांगितले होते. त्यामुळे काय चमत्कार घडतो हे बघण्यासाठी शेकडो भाविक बोअरच्या गाडीसह उपस्थित होते. सकाळी 9 वाजता संगीता कोकाटे यांना त्या घरात निद्रीस्त अवस्थेत होत्या त्या जागेवरून उठून हजार फूट अंतरावर ज्या जागेत मळगंगा देवी निघणार आहे त्या ठिकाणी आणले. तिथे त्या बेशुद्ध पडल्या. तेथील जागेवरील माती बाजूला सारून प्रथम घागर व नंतर चांदीचे डोळे असलेला मळगंगा देवीचा तांदळा व गणपती अशा वस्तू निघाल्या, त्याठिकाणी बोअर घेताच 30 फुटापासून 280 फुटापर्यंत गोड पाणी लागत गेले. त्यानंतर देवीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अनिल चौधरी यांच्या दोन किलोमीटर अंतरावरील वस्तीवर मंदिरात हा तांदळा तात्पुरत्या स्वरूपात स्थापित करण्यात आला.

3 वेळा चमत्कार दाखवल्यास 21 लाख देऊ-मच्छिंद्र वाघ

            भानसहिवरा येथील कथित चमत्काराबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव डॉ.मच्छिंद्र वाघ म्हणाले की, या घटनेचा कार्यकारण भाव शोधण्याची गरज आहे. चमत्कार दाखविणार्‍यांनी 21 हजार रूपये डिपॉझिट द्यावे व गर्दीसमोर चमत्कार न दाखवता आम्ही उपस्थित केलेल्या तज्ज्ञ लोकांसमोर हा चमत्कार तीन वेळा करून दाखवावा. चमत्कार सिद्ध केल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 21 लाखांचे बक्षिस व डिपॉझिट घेतलेले 21 हजार रूपयेही परत करू असे आव्हान त्यांनी दिले.