महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बानगे(ता.कागल) येथील भोंदूबाबाला कागल येथील न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शंकर दादू निंगूरे उर्फ आवळीकर मामा असे या भोंदूबाबाचे नाव आहे.
तीन मुली असलेल्या एका विवाहित महिलेला मुलगा व्हावा, यासाठी पतीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी नवससायास केले जात होते. या महिलेला बानगे येथील आवळीकर मामाकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मंत्रतंत्राच्या आधारे तो पुत्रप्राप्ती करून देतो, असे या महिलेला सांगितले. त्यामुळे ती महिला या बाबाकडे गेली. त्या महिलेस बाबाने एका वेगळ्या खोलीत बसण्यास सांगितले. थोडावेळाने महाराज त्या खोलीत गेला. काठीने रिंगण काढून महिलेला त्यामध्ये बसण्यास सांगितले.
महिलेचा दीर मृत झालेला होता. त्याची शांती करण्याची गरज असल्याचे सांगून महाराजांनी तिला पुढच्या गुरूवारी येण्यास सांगितले होते. पुढील गुरूवारी महिला आल्यावर भोंदूबाबाने कपाळाला भंडारा लावला व भंडारा असलेले पाणी पिण्यास सांगितले. पतीला खालच्या खोलीत बसण्यास सांगून विवाहितेला वरच्या खोलीत नेले. तेथे महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर तीन-चार वेळा बोलावून घेऊन असेच वर्तन केले. तर 24 जानेवारीला भोंदूबाबाने विवाहितेला घरामागील गोठ्यात नेऊन बलात्कार केला. या प्रकारामुळे घाबरलेली विवाहिता गप्प बसली. मात्र दुसर्या दिवशी घडलेला प्रसंग तिने कुटुंबियांना सांगितला. यानंतर विवाहितेने कागल पोलिस ठाण्यामध्ये शंकर निंगुरे या भोंदूबाबा विरूद्ध तक्रार नोंदविली. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश बनकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदूबाबाला अटक केली.
– रमेश वडगणेकर, कोल्हापूर