झोपडपट्टीत वर्धा शहरातील मध्य भागात ‘आर्वि नाका’ जवळ असणाऱ्या ९ वर्षीय रूपेश हिरामण मुळे या बालकाचे दि. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी अपहरण झाले. दि. ९ नोव्हेंबर २०१४ ला मृत शरीराचे अवयव कापून काढलेल्या अवस्थेत वस्तीपासून जवळच १ फर्लांगावर आढळून आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून शव तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविले. प्रथम दर्शनी पोलिसांनी रूपेशच्या शरीराला जनावरांनी खाल्ले असा निष्कर्ष काढला तर आई वडील आणि कुटुंबियांनी हा प्रकार अवयव विक्रीचा प्रकार आहे असे मत जाहीर केले. यावेळी याच वडार वस्तीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता मंगेश शेंडे हा उपस्थित होता. त्याने मत नोंदविले हा नरबळीचा प्रकार आहे. लगेचच फोन करून समितीचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांचेशी संपर्क करून माहिती दिली. मुन्ना पठाण या मांत्रिकाने हा नरबळी दिला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले.
शनिवारी दि. ८ नोव्हेंबर २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हिरामण मुळे यांची तीनही मुले वस्तीत खेळत होती. आईवडील मोलमजुरीसाठी बाहेर गेलेले होते. त्यामुळे फक्त आजी घरात एकटीच होती. थोड्याच वेळात रूपेश मुळे दिसत नसल्याचे लक्षात आले. सायंकाळी ६ वाजता पोलिस स्टेशन वर्धा येथे तक्रार नोंदविली गेली. त्याचवेळी रूपेश मुळे याचे आप्तगण, मित्रमंडळी यांनी रात्री १२ पर्यंत शोध घेऊनही तो मिळाला नाही. त्यामुळे काही अघटीत तर घडले नाही ना अशी शंका मनात येऊन गेली. दि. ९ नोव्हेंबर २०१४ ला विकास विद्यालय गांधीनगर येथील शाळेच्या मागील बाजूस पडीक असलेल्या जागेवर रूपेश मुळे याचा शरीराचा भाग कापलेल्या स्थितीत आढळून आला. त्याचा खून करून किडनी, डोळे, पोटातील आतडे आदी अवयव काढलेले आढळले त्यामुळे कोणीतरी ते अवयव काढून विकले असावे किंवा कुत्रे, डुक्कर यांनी खाल्ले असावे असा संशय घटनास्थळी भेट देणारे मुरलीधर बुरोड (पोलीस स्टेशन अधिकारी वर्धा) यांनी व्यक्त केला. यावेळी उत्तरीय तपासणीकरता मृतदेह सामान्य रूग्णालयात नेला असता वस्तीतील स्त्री पुरूष, वर्ध्यातील विविध संस्था, संघटनेचे कार्यकर्तेयांनी गर्दी करून या घटनेचा तात्काळ तपास लावून आरोपीला पकडण्याविषयी निवेदने, भेटी घेऊन निषेध नोंदविला. या घटनेची माहिती तात्काळ मा. मुख्यमंत्री, वनमंत्री यांना देण्यात आली. तर विविध संस्था संघटनांनी निषेध मोर्चेकाढून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी जलद गतीने तपास करून अवघ्या पाच दिवसांतच वर्धा शहरातील कारला चौकाजवळील वसाहतीत राहणाऱ्या ऑटो चालक मुन्ना पठाण उर्फ आरीफ शहा यास अटक केली. आणि हा खून नसून नरबळी आहे हे तपासात स्पष्ट झाले. नरबळी या प्रकरणाला मिळालेली प्रसिद्धी व्यक्त होणारा रोष, संस्था, संघटना यांच्या प्रतिनिधींचा दबाव, मोर्चे, आंदोलन, निवेदने यामुळे पोलिसांनी तपासाला वेग देऊन मुख्य मांत्रिक मुन्ना पठाण उर्फ आसिफ शहा यांच्यासह सात आरोपींना भा.द.वि.३०२ सह जादूटोणा विरोधी कायदा ३ (२९) २ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपी पठाण याला पोलीस कस्टडी तर उर्वरीत आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

घटना अशी घडली
आरोपी मांत्रिक मुन्ना पठाण हा मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी होता. चार ते पाच वर्षाआधी तो वर्ध्यात राहायला आला. इथे तो अॅटो चालवायचा जि. प. सदस्य व पं.स.सदस्य यांचेशी ओळख वाढवून सरकारी जमीन खोटे बोलून लोकांना ६० हजार ते १० हजारपर्यंत रक्कम घेऊन विकायचा. राजकीय वरदहस्त इथे असतानाच त्याला अघोरी मंत्रसिद्धी प्राप्त करण्याचा नाद लागला. तो मांत्रिकामध्ये कारागीर नावाने प्रसिद्ध होता. याचे आर्वि नाका येथील चौकात येणे-जाणे होते. त्यामुळे वस्तीतील लोकांशी ओळख होती. मुळे पण त्याला ओळखत होते. तो जरी ऑटो चालक म्हणून वावरत असला तरी तो मंतरलेले पाणी देणे, भूत काढणे आदी तंत्र-मंत्राचा उपयोग करून लोकांना फसवित होता. तो तंत्र-मंत्राची विद्या अधिक शक्तीशाली होण्याकरीता प.बंगालमध्ये राहून आला. मंत्र-तंत्राचे अघोरी साहित्य वाचून तो अघोरी क्रिया करायचा. गेले तीन वर्षांपासून तो स्वत:ची विष्ठा गोळी बनवून खात असे. घरी सर्व प्रकारच्या अघोरी पूजा पाठ करायचा. मागील महिन्यात त्याच्याशी सुभाष बापूराव भोयर या व्यक्तीशी परिचय झाला. अंकुश गिरी नावाचा तरूण पायाळू आहे त्याच्यातर्फे सुभाष भोयर यांच्या देवळी येथील शेतात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न पूजा पाठ करून करण्यात आला. यावेळी उत्तम महादेव पोहाणे वय ४०रा. तळेगाव वरमादूले. अंकुश सुरेश गिरी वय १८ रा. बोरगाव मेघे, सुरेश रामराव धनोरे वय ४० रा. वर्धा खाजगी शाळेत शिक्षक असणारा दिलीप उत्तम खानकर वय ३४ रा. देवळी सर्व वर्धा जिल्ह्यातील सोबत होते. यावेळी आरोपी मांत्रिक आसीफ शहा अजिम शहा उर्फ मुन्ना पठाण याची सिद्धी पुर्णत्वास न गेल्यामुळे नरबळी दिल्याशिवाय धन प्राप्त होणार नाही आपली शक्ती वाढणार नाही हे वरील आरोपींनी मांत्रिक पठाण याच्या मनावर बिंबविले. पठाण हा अघोरी कृत्य करीत असल्यामुळे त्याला ते पटकन पटले. वारंवार पठाणला बळी देण्याची आठवण वरील आरोपी करून देत असत.
अशातच वडार वस्तीतील रूपेश मुळे याच्यावर पठाण याची नजर केली आणि हीच आपली शिकार होय हे ठरवून सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान रूपेश याचे अपहरण करून दूर अज्ञात स्थळी नेऊन त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याची किडनी, लिंग, डोळे, ब्लेडने काढून, मृतदेह छिन्नविचिछन्न स्थितीत विकास विद्यालयाच्या मागे टाकून दिला. दुसरे दिवशी शोधास गेलेल्या लोकांना दिसला. तो त्यानंतर त्याने संपूर्ण काढलेले अवयव घरातील गेज, मीठ आदी साहित्य घेऊन महाकाळ येथील निर्जन स्थळी शिजवून व भाजून खाल्ले नंतर मारूतीच्या मंदिरात जाऊन पूजा केली व घरी येऊन झोपला. ५ वाजता अजान असल्यामुळे तो परत उठला. तो बेफिकीर अवस्थेत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. तपासात तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. यावेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी.घाटे यांनी हा प्रकार मंत्र-तंत्राचा असल्यामुळे या क्षेत्रातील काही मंडळीशी संपर्क केला. यातूनच बुटाचे पाणी पाजल्यास अघोरी शिक्षा संपते असे माहीत पडल्यामुळे तसा प्रयोग करण्याचा प्रयत्न करताच आसिफ शहा उर्फ मुन्ना पठाण बोलू लागला व त्याने गुन्हा कबूल केला मात्र हे कोणासाठी केले हे मात्र तो सांगत नाही. पोलिस या बाबतीत एकीकडे नरबळी म्हणून कबूल करतात तर पोलीस अधिक्षक नरबळी मानायला तयार नाहीत. तपास नरबळीच्या दिशेने सुरू असला तरी रूपेशचे आई वडील अनेक संस्था संघटनाचे कार्यकर्ते याला अवयव विक्रीचे रॅकेट समजून सी.आय.डी. तपासाची मागणी करत आहेत. पोलीस यंत्रणा अडचणीत आहे. यात डॉक्टरचा हात असावा असा संदेह आहे. मात्र सर्व पुरावे नरबळीकडे संकेत करतात मांत्रिकही कबूल करीत आहे. फक्त तो प्रमुख व्यक्ती कोण हे पोलीस यंत्रणा शोधू शकली नाही. तपास सुरू आहे. दोन्ही सभागृहात हे प्रकरण उचलले गेले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रूपेश मुळे याच्या हत्येला १ महिना होण्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी प्रबोधन परिषद घेण्यात आली. याचे पडसाद उमटताच मा.मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण नरबळी असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक(गृह) संतोष वानखेडे, पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे, गुन्हे शाखेचे महेश चाटे यांच्या नेतृत्वात अशोक घाट, उदय बारवाला, दिवाकर परिमल, अमर लाखे, समीर कडवे, आनंद भस्मे, अजय वानखेडे, विकास लोहकरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी केला.

आजही मांत्रिक आसिफ शहा याला या अमानवीय, अघोरी, निंदनीय कृत्याचे काहीही वाटत नाही. त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव दिसत नाहीत. आजही प्रश्न उभा राहतो त्याने हे कृत्य कोणासाठी केले त्याचे नाव का घेत नाही. पोलीस तपासात कमी पडतात का ? रूपेश मुळे हा गरीब असल्यामुळे हे प्रकरण दडपले जाईल का ? खरा सूत्रधार मिळेल की अजून रूपेश मुळे सारखे किती नरबळी जातील या प्रकारचे अवयव खाणारा नरबळी अजूनपर्यंत झालेला दिसत नाही. हे नरबळी प्रकरण दुर्मिळातून दुर्मिळ आहे.
– गजेंद्र सुरकार, वर्धा
संपर्क : मोबा. ९८२२२१९१००