महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अनुभव शिक्षा केंद्र व महाराष्ट्र युवा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “अनिष्ट व अघोरी प्रथा विरोधी प्रबोधन परिषद” वर्धा येथील मातोश्री सभागृहात मंगळवार दिनांक ९ डिसेंबर २०१४ ला आयोजित करण्यात आली होती. त्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना म. अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांनी वर्ध्यात ९ नोव्हेंबर रोजी झालेली रूपेश मुळेची निर्घृण हत्या ही अंधश्रद्ध मानसिकतेतून केलेली अमानुष कृती होती कारण अंधश्रद्धेचा वापर करून हितसंबंध जोपासणाऱ्यांचे ते षडयंत्र मानवनिर्मित आपत्तीचा भाग आहे तसेच ती दैवी दहशतवादाची निष्पत्ती आहे असे प्रतिपादन उद्घाटनप्रसंगी केले.
या प्रबोधन परिषदेचे उद्घाटन अभिनव पद्धतीने उद्घाटक मा.प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून करण्यात आले. उद्घाटक म्हणून बोलतांना सुप्रसिद्ध Da प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या शोषणाला कारणीभूत विविध यंत्रणांचा समाचार घेतला. ज्योतिष्य छापणारी वर्तमानपत्रे व अंधश्रद्धा पसरविणारी टी.व्ही. चॅनल्सवर वाचकदर्शकांनी बहिष्कार टाकला पाहिजे. कारण सत्याचा नेहमी विजय होत असला तरी त्याची लढाई जिंकण्यासाठी मतपेट्या प्रभावित कराव्या लागतील असे परखड विवेचन केले. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारे प्रभावी गीत सादर केले.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष मा. महादेवराव भुईबार, अप्पर पोलीस अधिक्षक आर. जी. किल्लेकर, जनवादी महिला संघटनेच्या सरचिटणीस प्रभाताई घंगारे, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे अरूणकुमार हर्षबोधी यांची उपस्थिती होती. परिषदेची भूमिका राज्य प्रधान सचिव मा. माधव बावगे यांनी मांडली तर प्रास्ताविक राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश कांबळे यांनी केले.

दुसऱ्या सत्रात सहभागी विविध समविचारी संस्था. संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये वर्धा जि.प.चे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. दवले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे सरचिटणीस सुनील पाटणकर, सुधीर भगत ही मान्यवर होती. अध्यक्ष म्हणून अनुभव शिक्षा केंद्राचे समन्वयक मा. नितीन मते यांची उपस्थिती होती. त्यांनी परिषदेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने व्यक्त झालेल्या मागण्यांच्या आधारे पाच ठरावाचे वाचन करून सभागृहाची मान्यता घेतली. याप्रसंगी म.अं.नि.स.चे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ बुटले व मातोश्री सभागृहाचे संचालक संजय ठाकरे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, सचिव अॅड. इंगळे, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुरेश वरभे व चंद्रपूरचे कार्याध्यक्ष मा.पी.एम. जाधव, राष्ट्रीय संबुद्ध महिला संघटनेच्या शारदाताई झांबरे, सत्यशोधक समाजाचे प्रा. जनार्दन देवतळे, गुणवंत डकरे, संयुक्त कामगार आघाडीचे नंदकुमार वानखडे, म.अं.नि.स.चे जिल्हा उपाध्यक्ष बाबाराव किटे, जिजाऊ ब्रिगेडच्या सौ.वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. माधुरी झाडे यांनी तर आभार प्रदर्शन सारीका डेहनकर यांनी केले. परिषदेच्या आयोजनासाठी किसान अधिकार अभियान यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, युवा कार्यकर्तेमंगेश शेंडे, मयूर राऊत, श्रेया गोडे, अनिल मुर्डिव, सुधाकर मिसाळ, राजेंद्र ढोबळे, प्रा. श्रीराम मेंढे, महा युवा परिषदेचे व अनुभव शिक्षा केंद्राचे कार्यकर्तेयांनी परिश्रम घेतले व परिषदेकरीता मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
परिषदेमध्ये पारीत झालेले ठराव
ठराव क्र.१ : वर्ध्यातील रूपेश मुळेचा नरबळी देऊन खून केल्यानंतर अत्यंत अमानुषपणे अवयव कापून भाजून खाल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी मुन्ना पठाण व इतर संबंधितांवर जलदगती न्यायालयात प्रक्रिया होऊन सनदशीर मार्गाने शिक्षा दिली जावी अशा मागणीचा ठराव ही परिषद करीत आहे.
ठराव क्र.२: नरबळी दिल्या गेलेल्या बालक रूपेश मुळेच्या कुटुंबियांना विमा व इतर सहाय्य म्हणून आर्धिक मदत महाराष्ट्र शासनाने त्वरीत पोहचवावी अशी मागणी ही परिषद करीत आहे.
ठराव क्र.३ : जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीसाठी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी व अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुकानिहाय प्रशिक्षण घेतले जावे. त्यासाठी म. अं.नि.स. आपली तज्ञता व यंत्रणेची मदत विनामूल्य देण्यास तयार आहे असा ठराव करीत आहे.
ठराव क्र.४ : नरबळी व अघोरी, अमानुष प्रथा आणि कर्मकांडे करायला प्रवृत्त करणारी मानसिकता निर्माण करणारे प्रचार साहित्य, जाहिराती व पुस्तके यावर बंदी आणावी तसेच उपलब्ध साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ही परिषद करीत आहे.
ठराव क्र.५ : प्रत्येक पोलीस ठाण्यात त्याच्या हद्दीतील अंधश्रद्धेच्या संदर्भातील गुन्ह्यांची नोंद स्वतंत्र केली जावी. तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील बुवा, बाबा, मांत्रिक, देवऋषी, भगत, अंगात दैवी संचार असल्याचा दावा करून दरबार थाटणाऱ्या आणि अध्यात्मिक संप्रदायाच्या नावाखाली संस्था चालविणाऱ्या संबंधितांची नोंद ठेवली जावी अशी मागणी ही परिषद करीत आहे.