Categories
अभिवादन

 हाडाचा खरा सत्यशोधक : भाई माधवराव बागल

मे - २०१३

            “राजर्षी शाहू महाराजानंतर नाव घेण्याजोगी कोल्हापुरातील व्यक्ती म्हणजे भाई माधवराव बागल होय.” असे भाईजींच्या जीवनाचे योग्य वर्णन विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी केले आहे. ‘भाईजी’ या तीन अक्षरी शब्दाने सर्वत्र परिचित असणारे माधवराव बागल हे थोर चित्रकार, निर्भीड पत्रकार, सामाजिक व धार्मिक सुधारक, खरेखुरे सत्यशोधक, कामगार व शेतकरी वर्गाचे हितचिंतक, कोल्हापूर प्रजा परिषदेचे संस्थापक, कोल्हापूर संस्थानचे पहिले मुख्यमंत्री, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे आघाडीचे लढवय्ये होते. म.फुलेंचा सत्यशोधकी विचार व शाहू महाराजांचा कृतीशील आचार आणि डॉ.आंबेडकरांचा चिकित्सा व बंधुतेचा वारसा यांचा त्रिवेणी संगम भाईजींच्या जीवनात आढळतो.

            कोल्हापूर संस्थानातील पहिले बी.ए.एल.एल.बी. वकील व सत्यशोधक ‘हॅटरकर’ खंडेराव बागल हे भाईजींचे वडील. 28 मे 1896 रोजी माधवरावांचा जन्म झाला. घरचा सत्यशोधकी वारसा व काही काळ शाहुमहाराजांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे भाईजींची जडणघडण व त्यांनी जगलेले कृतीशील जीवन ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” याप्रमाणे होते. बहुरंगी जीवन जगलेल्या भाईजींच्या सामाजिक व धार्मिक चळवळींचा थोडक्यात आढावा या लेखात आपणास घ्यायचा आहे.

            अस्पृश्यता निवारणाचे भाईजींचे कार्य उल्लेखनीय आहे. परिवर्तनाची चळवळ आपल्या घरापासून सुरू करायचे ठरवून भाईजींनी केशव गोविंद जाधव या अस्पृश्य विद्यार्थ्याला घरी ठेवून घेतले. तो जेवताना त्याचे ताट आपल्याजवळ ठेवावे असे माधवरावांनी सांगितले, पण तसे होत नाही असे लक्षात येताच आपल्या जेवणाचे ताट घेऊन माधवराव त्याच्याजवळ बसू लागले. अस्पृश्यांचा आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांना शासकीय नोकरीत वरिष्ठ पदे दिली पाहिजेत असे भाईजींचे मत होते. त्याला कृतीशिलतेची जोड देऊन माधवराव स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष असताना कोल्हापूरच्या नगराध्यक्षपदावर ढोर समाजातील अ‍ॅड. आनंदराव सोनवणे या व्यक्तीची निवड केली. अस्पृश्यता निवारणासाठी भाईजींनी दौरे काढले. महारवाडा, चांभारवाडा, मांगवाड्यात जाऊन अस्पृश्यांच्या घरी जेऊ लागले. महारवाडे स्वत:च्या हातांनी झाडले. गांधी जयंतीदिनी इतर कार्यकर्त्यांसह संडासही साफ केले. अस्पृश्यांना मंदीर प्रवेशाचा हक्क म्हणून कोल्हापूरचे अंबाबाई मंदीरात जाहिरात करून अस्पृश्य विद्यार्थ्यांसहित प्रवेश घडवून आणला. नरसोबाची वाडी हे मंदीर सुद्धा अस्पृश्यांना खुले केले. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील दुतोंडी मारूतीचे देवालयही अस्पृश्यांना माधवरावांनी खुले केले. अस्पृश्यता निवारणावर पुस्तके लिहून हरिजन परिषदांचे अध्यक्षस्थान भाईजींनी भुषवले. महात्मा फुले व आंबेडकर या दोन महामानवांचे ब्रॉन्झचे अर्धपुतळे कोल्हापुरातील बिंदू चौकात बसवले. डॉ. आंबेडकरांचा त्यांच्या हयातीतील व देशातील हा पहिला पुतळा आहे. आंबेडकरांनी धर्मांतर केल्यावर माधवरावसुद्धा बौद्ध धर्मात प्रवेश करते झाले.

            स्त्री-मुक्तीचे भाईजींचे कार्यही घरापासून सुरू झाले. त्या काळी स्त्रिया पडदा पद्धत म्हणजे गोषा वापरत. माधवरावांनी आपल्या पत्नीने तोंडावर पडदा न घेता घराबाहेर पडून समाजात वावरण्याची व्यवस्था केली. ‘लग्नबंधने की तुरूंगवास’ या नावे पुस्तक लिहून स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार स्पष्ट करून तो थांबला पाहिजे अशी मागणी केली. ‘भगिनी’ मासिकातून स्त्रियांनी अंधश्रद्धा सोडाव्यात. स्वत: शिकावे, मुलांना शिकवावे असा हितोपदेश केला. माधवरावांनी 1957 साली मागणी केली होती की, पुरूषांनी स्त्रियांना विकासाची संधी देऊन राजकारणात समान हक्क द्यावेत. आज भारत सरकार स्त्रियांना 33% जे राजकीय आरक्षण देणार आहे त्याचा पाया दूरदृष्टी असणार्‍या भाईजींचा आहे.

            आंतरजातीय विवाहासाठी भाईजींचे कार्य आदर्शवत असे आहे. सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगावचे आत्माराम पाटील हे मराठा वर व ब्राम्हण वधू पिंगळे यांचा विवाह करणेत भाईजींचा पुढाकार होता. भाईजींनी स्वत:च्या नावे ‘निमंत्रण पत्रिका’ छापून हवीरे या लिंगायत मुलाचा जया कांबळे या अस्पृश्य मुलीशी आंतरजातीय विवाह लावून दिला. डिग्रजकर इनामदार या राजघराण्यातील व्यक्तीचा उच्च मराठा वर्गाचा विरोध पत्करून एका आदिवासी जातीतील स्त्रीशी विवाह लावून दिला.

            भाईजींचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. वृत्तपत्रातून लेख लिहून, पुस्तके लिहून, जाहीर चर्चा करून, भाषणे देऊन, जनतेमध्ये प्रत्यक्ष मिसळून अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. 1970 च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये दत्ता बाळ व भाईजींचा वाद फारच गाजला होता. भारतीय तत्वज्ञान अभ्यासून 1976 ला ‘दत्ताबाळ मिशन’ स्थापन केले होते. माणूस मुक्त कसा होईल? आत्म्याच्या मुक्तीचे मार्ग कोणते? यावर दत्ता बाळ अंधश्रद्धा पसरवून समाजाची हानी करतात असे निक्षून सांगितले. या दोघांतील हा वाद समाजापर्यंत जाऊन पोहोचला. दत्ता बाळांच्या बाजूने आचार्य अत्रे उतरले त्यांनी ‘मराठा’ मधून बागलावर टीका केली. शंकरराव किर्लोस्कर व नरूभाऊ लिमये माधवरावांच्या समर्थनार्थ बोलू लागले. बिंदू चौकातील जाहीर सभेत माधवरावांना दत्ता बाळ यांच्यावर टीका करताना विरोध म्हणून व्यत्यय आणला गेला. तरीही माधवरावांनी आपले कार्य चालूच ठेवले. दुसर्‍या एका प्रकरणात थोर चित्रकार जी.कांबळे यांनी शिवाजी महाराजांनी आपणाला स्वप्नात साक्षात्कार दिला असे विधान केले. बुद्धिप्रामाण्यवादी भाईजींनी अंधश्रद्धा जोपासण्याचे काम केल्याबद्दल जी. कांबळेंवर टीका केली. अनेक अनिष्ट प्रथांवर जाहीर टिका करून त्यात सुधारणा सुचवण्याचे भाईजींनी कार्य केले. लग्न समारंभातील खर्चिक, चुकीच्या गोष्टी टाळून तो खर्च शिक्षणप्रसारासाठी करावा असे जाहिररित्या भाईजींनी सांगितले. अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील यांच्या मुलाच्या लग्नावेळी आणि बाळासाहेब देसाई यांनी मुलाच्या लग्नात भेटी स्वीकारल्या म्हणून टीका करून त्यात सुधारणाही सुचवल्या. देव आणि धर्म जाहीरपणे नाकारणार्‍या भाईजींनी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सेवा शिबीरात “आपण नास्तिक का आहोत?” याचे भावपूर्ण विश्लेषण केले. भाईजींनी आस्तिक-नास्तिक, देव, धर्म, देवपूजा याबद्दल भरपूर लिखाण केले. आपली भूमिका स्पष्ट करताना भाईजी म्हणतात, “पुरोहित, मुल्ला-मौलवी, पाद्री हे स्वार्थी लोक असून देव म्हणजे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. देवाच्या नावावर ते गरीबांना लुटतात. त्यातून श्रीमंत अधिक श्रीमंत तर सामान्य माणूस अधिक गरीब बनतो. सामान्य माणसाच्या दयनीय अवस्थेचे मूळ कारण देव ही संकल्पना आहे. मानवता हाच खरा धर्म आहे. तेव्हा प्रत्येकाने मानवी मूल्यांचे जतन करावे. बंधुत्व वाढीस लावावे. नास्तिकांची ही उद्दिष्टे होत. श्रीमंत व शोषक लोकांनी शेतकरी व कामगार यांच्यावर ‘देव’ ही संकल्पना लादली आहे.”

            भाईजी हाडाचे सत्यशोधक होते. सत्यशोधक समाजाच्या परिषदांमधून मत मांडताना त्यांनी जाहीरपणे सांगितले. मूर्तीपूजा करू नका, जो देवदर्शनाला पंढरपूरला जातो तो सत्यशोधक नव्हे. जेथे अन्याय असेल तो दूर करण्याचा सत्यशोधकाने प्रयत्न करायला हवा. समाजातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा दूर करण्याचे कार्य सत्यशोधकांनी करावे. सत्यशोधक समाजाची मूलभूत तत्वे ‘मार्क्सवादात’ मिळतात. मार्क्सवाद हा विषमता नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सत्यशोधनाने राष्ट्रीयत्ववृद्धी, अनिष्ट प्रथा व अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊ शकते. स्वर्ग, नरक, पूर्वजन्म, देव, धर्म या आधाररहित काल्पनिक गोष्टी आहेत. खरे सत्यशोधक व्हा.”

उमेश सूर्यवंशी