संमोहन म्हणजे हिप्नॉटिझम. ‘हिप्नॉटिझम ने उपचार’ अशा मथळ्याखाली अनेक जाहिराती आपण वाचतो. अनेकांनी तर मोठे व्यवसाय यावर उभे केले आहेत.
संमोहनाबाबतीत तीन प्रमुख समजुती समाजात पसरल्या आहेत. एक, संमोहनाने डोक्यातल्या पूर्वीच्या स्मृती बाहेर काढता येतात. म्हणजे सर्वच्या सर्व स्मृती या आपणास समजतात. दुसरे, संमोहनाने बाहेर आलेल्या स्मृती अचूक असतात, तीन संमोहनाने खोटेपणा उघड करता येतो.
1990 मध्ये जॉन फ्रँकलिन यास सुसान नेसनचा खून केल्याबद्दल शिक्षा झाली. शिक्षेचे कारण होते की, त्याच्या मुलीने, एलीनने आपल्या स्मृतीत ही गोेष्ट ही साठवून ठेवली होती की, जॉर्जने हे कृत्य केले आहे. व ती नंतर बाहेर आली. पण 1996 मध्ये जॉर्जच्या दुसर्या मुलीने, जेनीसने हे दाखवून दिले की, एलीन जेव्हा संमोहन शिकत होती तेव्हा ‘या स्मृती’ तिच्या मेंदूत तयार करण्यात आल्या. म्हणजे त्या स्मृती खोट्या ठरल्या. आणि जॉर्जची सुटका झाली.
या केसला खूपच प्रसिद्धी मिळाली. कारण हिप्नॉटिझमने ‘स्मृती निर्माण’ केल्या गेल्या होत्या. म्हणजे संमोहनाने ज्या स्मृती बाहेर काढल्या जातात. त्या खर्याच असतात या समजुतीला मोठा धक्का बसला होता.
आणि ते खरेही आहे.
संमोहनाने वर सांगितलेल्या तीन गोेष्टी होतात हे खरे नाही. संमोहनाचा वापर करून जुन्या स्मृती जाग्या करून पोलीस खात्यात त्याचा वापर करावा असे मत सुमारे 64% कॉलेज विद्यार्थ्यांनी व 70% मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
जर एवढा गोंधळ शिक्षितांमध्येच असेल तर सामान्य लोकांचे सोडूनच द्या. खुद्द 84% मानसोपचार तज्ञ असे मानतात की, ‘आपल्या मनात स्मृती या कायमच्या घट्ट रूतलेल्या असतात पण संमोहनतंत्राने त्या संपूर्ण तपशीलासहीत बाहेर काढता येतात.’ अगदी जन्मापासूनच्या स्मृतीही शोधून काढता येतात अशीही समजूत आहे.
लहानपणी जर लैंगिक छळ झाला असेल तर संमोहनाने तो शोधून काढता येतो असेही सांगितले जाते.
मागील दोन शतकातील प्रमुख मानसतज्ञही यास बळी पडले होते. पिएरे जेनेट नावाच्या मानसतज्ञाची मारी नावाच्या सल्लार्थीची एक केस फेमस आहे. तिच्या लहानपणी तिच्या स्मृतीत काही वाईट स्मृती राहिल्या होत्या त्या जेनेटने संमोहनाने घालविल्या व ती पूर्ण बरी झाली असे सांगण्यात येते.
पहिल्या महायुद्धातील परतलेल्या अनेक सैनिकांत मानसिक बिघाड झालेला होता. त्यांच्या डोक्यातील युद्धातील वेदनादायक स्मृती या ‘हिप्नोअॅनालिसिस’ नावाच्या संमोहन तंत्राने काढून टाकल्या असे सांगण्यात येते.
जोसेफ ब्रुअर, सिग्मंड, फ्रॉईड यांनीही याच मताचा पुरस्कार केला आहे.
‘इन लाईफ फ्लींट’, ‘किस द गर्लस्’, ‘डेड ऑन साईट’, ‘द रिसरेक्शन सिंड्रोम’ या सर्व इंग्रजी सिनेमांतून संमोहनाच्या सामर्थ्याचा प्रचार जोरदारपणे केला गेला.
या सर्व गोष्टी खर्या नाहीत हे आता हळूहळू उमजू लागले आहे. न्यायवैद्यक मानसतज्ञांच्या मते, पूर्वीच्या स्मृती म्हणून ज्या सांगितल्या जातात त्या अचूक नसतात तर काही वेळा त्या पूर्ण बनावटपण सापडतात.
एखाद्या गुन्ह्यात साक्षीदारांकडून प्रत्यक्ष काय घडले हे काढून घेतले जाते. संमोहनाने ते काढून घेतल्यावर उलट तपासणीत हे साक्षीदार जास्त गोंधळतात असे आढळले आहे. कारण संमोहनातून सांगितलेल्या स्मृती या काल्पनिक असतात. आणि वास्तवात घडलेल्या घटनांशी त्या जुळत नाहीत.
संमोहनाने तत्कालीन वयातून पूर्ववयात नेता येते. अगदी बाळ असताना, त्याही पूर्वी आईच्या पोटात असतानाच्या आठवणी काढता येतात असे सांगितले जाते. त्यात तथ्य नाही. एका संमोहन कार्यक्रमाला एका पैलवानांने 3 महिन्याच्या काळातील ‘स्मृती’ जाग्या झाल्यावर लहान बाळासारखे वर्तन केले. गंमत अशी की, त्या वेळी तो रांगून चालत होता. 3 महिन्यात तो रांगू लागला कसा हे कोणाच्याही ध्यानात आले नाही.
पूर्व वयातील स्मृती सांगणारे लोक हे प्रत्यक्षात खर्या स्मृती सांगत नसतात. त्यांचे त्या त्या गोष्टींबद्दल असलेले ज्ञान, समजुती आणि कल्पना या आधारेच ते ‘स्मृती’ व्यक्त करतात. त्या खर्या नसतात.
पूर्व वयातील आठवणी-स्मृती या ‘बर्या’
करण्याच्या समजुतीस ब्रायस वेस या व्यक्तीने खूपच खतपाणी घातले होते. वास्तवात या स्मृती म्हणजे निव्वळ कल्पना, अंदाज असतात. यासाठी एक प्रयोगही झाला. संमोहनकर्त्याने सर्व संमोहितांना अशी सूचना दिली की, तुम्ही वय वर्षे4 मध्ये आहात. त्यांचे सर्व तपशील प्रत्यक्ष 4 वर्षातील घडलेल्या घटनांशी व काळाशी जुळवून पाहिले. एक-दोन टक्क्यांपलिकडे त्यांच्या कोणत्याही ‘स्मृती’ प्रत्यक्ष वास्तवाशी जुळल्या नाहीत.. जर माहिती बर्यापूर्वी जुळली तर ती त्या व्यक्तीची हुशारी समजावी!
संमोहनाचा वापर करून वेदना कमी करता येतात. काही वेळा धुम्रपान सोडता येते असे म्हणतात. ते काही अंशी खरेही आहे. पण त्यामागील वैद्यकीय कारण समजलेले नाही.
पण स्मृतीच्या बाबतीत मात्र संमोहनाची गॅरंटी बाळगू नका हे मात्र निश्चित.
डॉ. प्रदीप पाटील
मोबा. 9890844468