भुसावळ येथे बारा गाड्या अंगावरून गेल्याने हवालदार ठार, अशी दु:खद बातमी वाचायला मिळाली. एका अंधश्रद्धेनेच ड्युटी बजावणार्या रमेश श्रावण कुंभार या हवालदाराचा बळी घेतला. या घटनेतून तरी आपला समाज अंधश्रद्धेच्या या सामुदायिक मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडेल, आणि डोळस होऊन आत्मचिंतन करेल अशी अपेक्षा आहे. बारा गाड्या ओढण्याचं दैवी बळ प्राप्त झालेला भगत हवालदाराचे प्राण वाचवू शकला नाही, एवढेच काय तर स्वत:लाही जखमी होण्यापासून वाचवू शकला नाही. तेव्हा यापुढे अशा प्रकारच्या बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाबाबत समाजानेच चिंतन करण्याची गरज आहे.
बारा गाड्या कशा ओढल्या जातात?
1) बारा गाड्यांची बांधणी ही विशिष्ट प्रकारची असते, त्यातून मागील गाडीचे बळ हे पुढील गाडीला मिळत असते.
2) बारा गाड्या या नेहमी उताराच्या दिशेने लावल्या जातात. गावाच्या लगत वाहणार्या नदीच्या प्रवाहावरून ही दिशा ठरत असते. म्हणून याचा पारंकारिक मार्ग व दिशा ठरलेली असते. ही दिशा उलट जरी केली करी बारा गाड्या ओढल्या जाणार नाहीत. 3) बारा गाड्या ओढण्यामागील शास्त्र हे न्यूटनच्या गतीविषयक नियमांच्या आधारे अधिक स्पष्ट करता येते.
नियम 1 ला – प्रत्येक पदार्थाला आपली विश्राम अवस्था किंवा सरळ रेषेतील समगतीची अवस्था, बाह्य बलाने बदलणे भाग न पडल्यास त्या पदार्थाची ही अवस्था टिकविण्याची मूलभूत प्रवृत्ती असते.
नियम 2 रा – गतीतील पालट किंवा बदल हा लावलेल्या बलाच्या सम प्रमाणात असून बलाच्या दिशेने सरळ रेषेत असतो.
या नियमांवरून बारागाड्या ओढण्याचे शास्त्रीय स्पष्टीकरण मिळते. उताराच्या दिशेने लावलेल्या गाड्यांना केवळ बाह्य बलाची गरज असते. ही गरज शेकडो भक्त मंडळी पूर्ण करतात.
4) केवळ एकटा भगत बारागाड्या ओढत नाही. मुळात त्याला गाड्या ओढण्याची गरजच पडत नाही. शेकडो भक्त मंडळीच भगताचा, खंडेरावाचा अथवा कोणत्याही देवतेचा जयजयकार करत गाड्यांना धक्का देत असतात. नीट निरीक्षण केल्यावर ही बाब सहज लक्षात येते. मग एकदा का गाड्यांना गती मिळाली की, त्या त्याच दिशेने एकसमान गतीत चालत राहतात. त्यासाठी कोणत्या दैवी सामर्थ्याची गरज नसते.
5) या गाड्यांची संख्या कमी करून, केवळ 5 गाड्या नदीत उताराच्या विरूद्ध दिशेने ओढायचे आव्हान गेली 20 वर्षं अंनिसने दिलेले आहे. ते अद्याप कोणी स्वीकारलेले नाही.
6) अशा प्रकारच्या जीवघेण्या, अमानुष अंधश्रद्धेच्या कृत्याना संकल्पित जादूटोणा विरोधी कायदा अंमलात आल्यास बंदी नव्हे तर मर्यादित प्रतिबंध घालता येऊ शकेल.
आता तरी समाजाने डोळस होऊन सामुदायिक, मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडावे, परंपरेच्या नावाने चालत आलेल्या अनिष्ट बाबी टाकून द्याव्यात. विज्ञानाची सृष्टी स्वीकारलेला समाज विज्ञानाची दृष्टी घेण्यास मात्र का कचरतो. आताही शहाणे झालो नाही तर यापुढेही असे अनेक रमेश कुंभार अंधश्रद्धेच्या नावानं बळी जात राहतील.
-विनायक सावळे