Categories
मानसमित्र

मानसमित्र कशासाठी?

मे - २०१३

            नसिक आजाराचा शिक्का बसला की, त्या रूग्णाची मानसिक स्थिती अधिकच बिकट होत जाते. मनोरूग्ण होणे हेच स्वीकारणे मुळात कठीण जाते. बाकीचे आजार मनोविकाराच्या तुलनेने बरे वाटू लागतात. माणसे निदान सहानुभूतीपूर्वक वागतात तरी. कुष्ठरोग, एडस्सारखा आजार सोडल्यास, माणसे निदान रूग्णापासून बिचकून दूर तरी पळत नाहीत. डायबेटीस, रक्तदाब तर काहीजणांना वेगळीच प्रतिष्ठा मिळवून देतात. श्रीमंती आजारांचे वलय लाभते या व हृदयविकारासारख्या रोगाने त्रस्त माणसांना! स्पाँडेलायटीस झालेले गळ्यात कॉलर घालून ‘ताठ’ मानेने वावरताना दिसतात. गलेलठ्ठ श्रीमंताना कौतुकाने ‘अंमळ प्रकृती सुधारल्यासारखी दिसते हल्ली’ एवढेच दर्शवले जाते. कॅटरॅक्ट(मोतीबिंदू) झाल्यावर माणसे डोळ्यातले नवे भिंग(80 हाजाराची लेन्स बसविली बरे का!) न चुकता सांगतात, अन्यथा ते लक्षात कसे यायचे?

            पण मनोविकार लपवावासा वाटतो, कुणाशी-डॉक्टरांशी सुद्धा-त्याविषयी बोलावेसे वाटत नाही. उलट कुणाला समजेल की, समजलेय कां हे प्रश्न रात्रंदिवस छळतात. गडी आतल्या आत झुरत जातो. कलंक वाटतो मनोविकार! जगणे आधीच आजारामुळे नकोसे वाटते, वर या ‘सामाजिक’ कलंकामुळे मरण हवेसे वाटू लागते. अनिश्चित दीर्घकाळ उपचार तसे इतर आजारातही चालतात. पण मनोविकारांवरचे उपचार कधी एकदा बंद होतील, असे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वाटू लागते. ‘उपचार बंद करा, गोळ्या थांबवा’, ‘बाहेरचे बघा, पूजा घाला’, ‘जमेल त्याचा बळी-विधी’ करा, नाशिक, शिर्डी, तिरूपती ते बुद्रुक खेडेगावातला बंगाली बाबा बघा, असे सल्ले-घातक सल्ले देणारे बेजबाबदार दिव्य सल्लागार कुटुंबात व शेजारी उपस्थित असतातच. दोन रट्टे घाला, फुकटची नाटकं करतो ु ला, नखरे जास्त झालेत असेही हिटलरी सल्ले रूग्णाच्या आईवडिलांना दिले जातात. अगदीच हितसंबंधी सल्ले रूग्णाच्या आईवडिलांना दिले जातात. अगदीच तर ‘लग्न लावून टाका(समोरच्या मंडळींना आजाराबद्दल न सांगता?) असा फुकटचा बेकायदेशीर, फ्रॉईड आणि सेक्स विषयीच्या अज्ञानाने परिपूर्ण सल्ला देतात. त्यात एकाच दगडाने आपण कित्येक पक्षी वर पोहचविण्याचा आवेश असतो. आपल्या सल्ल्यानुसार वागण्याने रूग्णाची वाट लागल्यास त्याचं दुर्दैव. आम्ही त्याच्या चांगल्यासाठीच सल्ला दिला होता’ असं वर म्हणून हे सर्व सल्लागार हात झटकून मोकळे होतात. रूग्णाला समजून घेण्याऐवजी त्याच्याविषयी त्याच्याभोवती संशयाची, संतापाची, भीतीची भुताल काळजी पसरविली जाते. माणसाचे जिवंतपणी भूत करून टाकले जाते, या अज्ञानी व घातक सल्ल्यांनी!

            मनोरोग, मनोरूग्ण, त्याची कारण मिमांसा, त्यावरील आधुनिक विज्ञानाने खडतर परिश्रमाने शोधून काढलेल्या प्रभावी उत्तरांची एकतर काहीच माहिती नसते, किंवा त्याविषयी भरपूर गैरसमज असतात. ही औषधे कायमची घ्यावी लागत नाहीत, औषधांसोबत स्वीकार, आधार, सहकार्य, बोलून उपचारपद्धती, बरे होण्यासाठी लागणारे प्रोत्साहन, कामावर व संसारात पुन्हा उभे रहाण्यासाठी उत्तेजन व मार्गदर्शन; आजारातील प्रगतीविषयी अभ्यास, निरीक्षण, देखरेख, इतर वैज्ञानिक उपचार या सार्‍यांची मनोविकार ग्रस्ताला बरे करायला व त्याचे समाजात पुनर्वसन करायला खूप मदत होते.

            मनोविकाराने ग्रस्त माणसाचे माणूसपण जपण्यासाठी अशावेळी संयत, संवेदनशील, उत्साही मनोविकारांविषयी पुरेशी माहिती घेऊन सामाजिक बांधिलकी समजून वागणार्‍या ‘मानसमित्राची’ खूप खूप मदत होते. ही मदत उभी झाली तर मनोरूग्ण पुन्हा आयुष्यात उभे तर राहतीलच पण स्वत:च स्वत:चे व इतरांचे मानसमित्र बनू शकतील. आधाराचे शब्द, खांद्यावर आश्वासक हात, नजरेत कणव, हालचालीत आत्मविश्वास, मनात नेमके काय काय करायला हवे त्याचे सुस्पष्ट नियोजन हे मनोविकार तज्ज्ञात दिसते तेव्हा मनोरूग्ण बर्‍यापैकी सावरतात, स्वनाशाचे विचार सोडतात, जीवनाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पहातात. हे सारे मनोविकारतज्ञांना जमते त्याचे कारण त्यांच्या खांद्यावर आधुनिक मानसशास्त्राचा आश्वासक हात असतो.

            हे सारे मानसमित्रालाही जमणे जराही कठीण नाही. मनोविकारांविषयी नीट माहिती घेणे, त्याचा उपयोग मनोरूग्णाचे व्यक्तिमत्व, त्याच्यासमोरचे प्रश्न, त्यावर सद्य:स्थितीत शक्य ते उपचार याविषयी मनात स्पष्ट कल्पना(माहितीच्या मदतीने) घेऊन मदतीसाठी धावणे सहज शक्य आहे.

            मला आठवते 1993 ची सास्तूर, राजेगाव, एकोंडी, चिंचोली रेल्वे आदी गावात व एकंदर सास्तूर ते लातूरमध्ये, पनवेल, उरण, मुंबईमधील 10 ते 12 अंनिस कार्यकर्त्यांच्या मदतीने भूकंपग्रस्तांसाठी आम्ही राबविलेली मानसोपचार मोहीम! जवळ जवळ 8 महिने-दरमहा 3-5 दिवस जाऊन; विपत्तीनंतर उद्भवणारे सर्व मनोविकार-अस्वस्थता, निद्रानाश, वैफल्य, अपार दु:ख, मनात भविष्याविषयक अंधार, मनोकायिक आजार, वैफल्यातून व्यसनग्रस्तता, मनोभंग-अशा कित्येक आजारांची घरोघरी(तंबूचे तात्पुरते निवारे) नोंद व दखल घेत, औषधे पुरवित आपण हे काम करून दाखविले. विपत्तीनंतरच्या व्यवस्थापनात प्राथमिक मानसोपचारांची मदत शासनाने उपलब्ध करून द्यायला हवी, ही दुरूस्ती विधानसभेत मांडली, भूकंपग्रस्त विभागात सरकारतर्फे प्राथमिक मानसोपचाराची व्यवस्था सुरू करून देऊन मग आपण सर्व मानसमित्र तेथून समाधानाने परतलो.

            भूकंपानंतर त्वरीत प्रशिक्षण घेऊन आपल्या केवळ 10 ते 12 अंनिस स्वयंसेवकांनी 8 महिने आपले वैयक्तिक आयुष्य दर महिन्याला 3 ते 5 दिवस बाजूला ठेवून हे करून दाखविले. त्या संवेदनशील, सजग, विज्ञानवादी कार्यकर्त्यांनी ‘मानसमित्र’ म्हणजे काय हे काही अंशी 1993 मध्येच महाराष्ट्रात आपल्या कार्याद्वारे दाखविले.

            आज मनोरूग्णाच्या मनातून आजाराविषयीची भीती, संशय, वैताग, निराशा आणि हा आजार लपविण्यासाठी त्याची होत असलेली तगमग, समाजाचा त्याच्याकडे पहाण्याचा गढूळ दृष्टिकोन, त्याचे अंधश्रद्ध उपायांद्वारे चाललेले शोषण व त्याच्या पुनर्वसनात येणारे अडथळे या सार्‍या अडचणींशी सशक्त, निरोगी सामना द्यायला व मनोरूग्ण आपल्यात पुन्हा एकदा सामावून घ्यायला आपल्या भारतात तज्ज्ञांबरोबर आधिकाधिक मदत लागणार आहे मानसमित्रांची! पुढील प्रशिक्षणाआधी आपली मनोभूमिका आपण प्रथम नीट तयार ठेवू या. यासाठी ही अक्षरे!!

डॉ. प्रदीप पाटकर

patkar.pradeep@gmail.com