Categories
भांडाफोड

 रेवणगाव येथील दोघांची भोंदूगिरी ‘अंनिस’कडून उघड

मे - २०१३

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी रेवणगाव(ता.खानापूर) येथील बुवाबाजी करणार्‍या कृष्णदेव बळवंत साळुंखे व सौ.कलावती दिनकर बाबर यांच्या भोंदूपणाचा पर्दाफाश केला. दोघांनी ‘यापुढे बुवाबाजी करणार नाही, असे विटा पोलीस ठाण्यात लेखी दिले आहे.

            कृष्णदेव गेली अनेक वर्षे घरी व वेताळ मंदिरात करणी व भूतबाधा, मानसिक आजार यावर गळ्यात दोरा बांधून अंगारा व लिंबू देऊन उपचार करीत होते. याच गावच्या सौ.कलावती या देव अंगात आणून भूत, करणी, आजारपणावर उपचार करीत होत्या. लोकांकडून पैसे घेत होत्या. भोंदूगिरी करणार्‍या दोन व्यक्तींनी परिसरात जम बसवला होता. दोघांविरोधात त्याच गावच्या दोघांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विटा पोलिसांकडे फसवणुकीची लेखी तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत समिती कार्यकर्ते संजय बनसोडे, दिलीप क्षीरसागर, प्रा.पी.आर.आर्डे, पी.एच.पाटील हे बनावट व्यक्ती बनून सौ.कलावती यांच्या घरी गेले. ‘क्षीरसागर यांना भूतबाधा झाली आहे. तुम्ही अंगात शिवकळा घेऊन त्यांना काय झालंय ते पहा’ अशी विनंती केली. महिलेने ‘क्षीरसागर यांना विहिरीवरील खवीसाची बाधा झाली आहे, ती फार मोठी आहे, माझ्या हातून लगेच काढणे शक्य नाही, ढालगावचे माझे गुरू व मी उपचार करतो, पैसे खर्च करावे लागतील’ असा सल्ला दिला. प्राथमिक उपचारापोटी अंगारा देऊन एक लिंबू देऊन नंतर येण्याचा सल्ला दिला. समितीच्या कार्यकर्त्यांनी वेताळ मंदिरातील कृष्णदेव महाराजाकडे मोर्चा वळवला. त्यांनी क्षीरसागर वेडसर आहे. त्यांच्यावर उपचाराची विनंती केली. कृष्णदेव ऊर्फ देव दादा यांनी ‘क्षीरसागर यांना मानसिक आजार झाला आहे. भूतबाधा झाली आहे, त्यांना लगेच बोलते करतो’ असे सांगून अंगारा लावला. गळ्यात दोरा बांधून देवाभोवती फेर्‍या काढायला लावल्या. ‘अजून चार वेळा घेऊन या, मी बरे करतो’ असा सल्ला दिला. दोघे फसवणूक करीत असल्याची खात्री पटल्याने समितीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी भोंदुगिरी करणार्‍या दोघांना ठाण्यात बोलावून प्रतिबंधक कारवाई केली. दोघांनी ‘यापुढे बुवाबाजी करणार नाही’ असे लेखी लिहून दिले. मोहिमेत हवालदार विजय पारधी, रमेश साळुंखे, समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, प्रा.आर्डे, वाघेश साळुंखे, चंद्रकांत वंजाळे, राजेंद्र मोटे यांनी भाग घेतला.