पिंपरी–चिंचवड परिसरात सतराशे पुरणपोळ्या दान
सण-समारंभ साजरे करताना कालबाह्य रूढी-परंपरांना मूठमाती देऊन होणारे आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय नुकसान टाळायला हवे हाच अंनिसचा उद्देश राहिला आहे. आता तर पर्यावरण संरक्षण हा विषय तर शालेय अभ्यासक्रमाचा भाग झाला आहे. त्यास सर्वजण उत्तम प्रतिसाद देत आहेत. याचा प्रत्यय या वर्षीचा होळी सण साजरा करताना आला.
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात दरवर्षी लाखाच्या आसपास लहान मोठ्या घरगुती व सार्वजनिक होळ्या होतात. त्यात लाखो पोळ्या नैवेद्य म्हणून जाळून खाक होतात. नैवेद्य म्हणजे देवाला दाखवून वाटून खायचा पदार्थ, पण सण साजरे करण्याच्या आनंदात त्याचा विसर पडतो आणि अक्षरश: पोळ्या जाळल्या जातात. या अंधरूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी गेली 15 वर्षेमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ‘होळी लहान, पोळी दान करा’ हा उपक्रम अतिशय यशस्वीपणे राबविला आहे.
या वर्षी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अंनिसच्या संघटनांनी सहभागी होऊन हजारो पोळ्या जमा करून दान केल्या आहेत. त्यातली ही काही बोलकी उदाहरणे –
पिंपरी चिंचवड शाखेच्या कार्यकर्त्यांनी भक्ती-शक्ती चौकात एकत्र येऊन, झेंडेमाळा, चिंचोली, माळवाडी इ. ठिकाणी जाऊन, अंनिसच्या होळी लहान करा, पोळी दान करा या आवाहनाला ग्रामस्थांनीच दिलेल्या प्रतिसादामुळे जवळपास 700 पोळ्या गोळा करून आणल्य आणि देहूरोड येथील कुंचीकोरवी वस्तीतील गोरगरीब लोकांना त्याचे वाटप केले. या उपक्रमात मअंनिसचे प्रधान राज्य सचिव मिलिंद देशमुख, पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या सचिव अरूणा यशवंते, कार्याध्यक्ष सुभाष सोळंकी, राधा वाघमारे, दिलीप कामत, विवेक सांबरे, संजय बनसोडे, सुधीर मुरूडकर, रवीकर पाठक इ.नी सहभाग घेतला.
पुणे शहरातील अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जंगली महाराज रस्ता, वानवडी, ताडीवाला रोड, सदाशिव पेठ इ. ठिकाणाहून जवळपास 900 पोळ्या गोळा करून त्याचे पुणे स्टेशन परिसरातील गोरगरीब लोक व प्रत्यक्ष रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांना पोळ्यांचे वाटप केले. या उपक्रमात पुणे शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव, श्रीमती परळीकर, सुरेश सपकाळ, राकेश सिंग, उदय कदम, हसन बारटक्के, जावेद शेख, शशिकांत डोईफोडे, अरविंद रोकडे, सुहास हिरोळ, डॉ.रामण फळसपगार, डॉ.सचिन वळीवकर, स्वरूपा सावंत इ. कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
चिंचवडगावातील दुर्वांकूर कॉलनीत गेली 6-7 वर्षे पोळी दान करण्याचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे राबवला जातो. या वर्षीपण या कॉलनीत 50 पोळ्या जमा करून नचिकेत बालग्राममध्ये त्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय प्रत्यक्ष पर्यावर्णीय होळी साजरी करून जादूटोणा विरोधी कायद्यातील कलमाचे सचित्र प्रदर्शनही भरविले.
तुकाई माध्यमिक विद्यालय, नेरे या शाळेतील 9 वीच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील घराघरातून 45 पोळ्या जमा करून विटभट्टीच्या वस्त्यांमधून त्याचे वाटप केले. या कामी शाळेचे मुख्याध्यापक टी.डी.पवळे व सहशिक्षिका अरूणा यशवंते यांनी सहकार्य केले.
अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील चाकण, लोणावळा, भोर, बारामती इ. ठिकाणच्या अंनिसच्या संघटनांनीपण हा उपक्रम राबवून हजारो पोळ्या जमा करून त्याचे गरजूंना वाटप केले.
प्राचार्य डॉ. राजेंद्र कांकरिया, पिंपरी चिंचवड
चंद्रपूर येथे ऊर्जानगरात पर्यावरणपूरक होळी संपन्न
चंद्रपुरातील ऊर्जानगर वसाहतीत दरवर्षी 200-250 होळ्या पेटविल्या जात होत्या. त्यात प्रामुख्याने लाकडे, टायर, प्लॅस्टिकचा वापर होत असल्यामुळे पारंपारिक होळीचा सण साजरा करत असताना चंद्रपुरातील प्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जाऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र अंनिस शाखा ऊर्जानगरच्या वतीने व व्यवस्थापनाचे सहकार्याने पर्यावरणपूरक सार्वजनिक होळीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी पर्यावरणावर संबंधित घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. राजू बुरडे साहेब मुख्य अभियंता सी.टी.पी.एस.यांचे हस्ते होळी पेटवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सौ.लिना चिमूरकर यांनी पर्यावरण गीत सादर केले. मार्गदर्शक बंडू धोतरे यांनी पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन प्रदूषण कमी करणारा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. होळीच्या पौराणिक कथेचा संदर्भ देऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक होळीचा आयेजित केलेला आगळा वेगळा कार्यक्रम हा राष्ट्रहिताचा असल्याचे मत राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. फाल्गुन महिन्यात झाडाच्या पानांची पतझड होत असल्यामुळे यापुढे कचर्याची होळी पेटवून पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संदेश कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू बुरडे यांनी दिला. याप्रसंगी उपमुख्यअभियंता तेलंग, सवाईतूल, हरणे, सुरक्षा विभागाचे सहा.संचालक कोंडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
–पी.एम.जाधव, चंद्रपूर
सातार्यात दुर्गुणांची होळी
सावित्रीबाईंचा विजय असो, म.फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छ.शाहू महाराज, विवेकवादी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा विजय असो अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र विवेकवाहिनी यांच्या वतीने पर्यावरणपूरक होळी साजरी केली गेली.
पारंपारिक सण, उत्सवाला पर्याय म्हणून होळीच लाकडे व गोवर्या जाळण्याऐवजी, परिसर स्वच्छ करून कचर्याची होळी करण्याचे आवाहन समितीतर्फे गेली अनेक वर्षेकरण्यात येते. बोंब मारणे, शिव्या देणे या पद्धतीला फाटा देत स्त्री सन्मान व समाजसुधारकांच्या सन्मानाच्या घोषणा दिल्या गेल्या. कार्यकर्त्यांनी जमा झालेल्या पोळ्या व इतर पदार्थ गरजू व्यक्तींना दिले.
यावेळी सहयोग हॉस्पिटल परिसरात व्यसन, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, हिंसा, कॉपी या दुर्गुणांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले गेले व आपण या वाईट गोष्टींपासून दूर राहू व समाजातून या प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करू असा संकल्प करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माधव बावगे, डॉ.हमीद दाभोलकर, श्री व सौ मंडपे व विवेकसाथी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
– उदय चव्हाण, सातारा
धुळे येथे पोलीस प्रशासन व अंनिसच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणीय होळी
होळीनिमित्त होणारी वृक्षतोड थांबवावी या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिस प्रशासनातर्फे धुळे येथे पोलीस कवायत मैदानावर कचर्याची होळी करण्यात आली.
पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाही तो राबविण्यात आला त्यानुसार पोलीस मैदानावर साठलेला कचरा जमा करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. यावेळी सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय पाटील, प्रा.मुकेश गायकवाड, रंजना नेवे, प्रेमकुमार अहिरे, दिलीप साळुंखे व अंनिस कार्यकर्तेउपस्थित होते.
– प्रदीप सोनवणे, धुळे.
चाकण येथे हजार पोळ्या दान
चाकण अंनिस व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चाकण शहरामध्ये पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. होळी, धुलीवंदनासाठी पाण्याचा वापर करू नका, पुरणपोळी होळीत टाकण्याऐवजी अनाथाश्रमात दान करा, असे आवाहन या संस्थेचे मनोहर(बाप्पू) शेवकरी, धनंजय शेवकरी, छाया परदेशी, पल्लवी सवाखंडे, जाधव, अपर्णा कानडे, राजेंद्र जनगाडे, प्रा.कवडे, प्रा.राजेंद्र खाडे व त्यांच्या सहकार्यांनी केले होते. नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत होळीत टाकण्यात येणारे पोळीचे तब्बल एक हजार नैवेद्य(पोळ्या) जमा करून येथील अनाथाश्रमात देण्यासाठी दान केले. वसुंधरा बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकार्यांनी होळीत न टाकत जमा केलेल्या पोळ्या अनाथाश्रमात वाटण्यात आल्या.
– अतुल सवाखंडे, चाकण, पुणे
तासगाव येथे विद्यार्थ्यांची प्रबोधन फेरी
‘होळी लहान करा, पोळी दान करा’ अशा घोषणा देत अंनिसने तासगाव शहरातून विद्यार्थ्यांची होळीच्या पूर्वसंध्येला प्रबोधन फेरी काढली. या फेरीमध्ये विद्यानिकेतन व भारती हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी शहरातून दोन हजार पोळ्या जमा केल्या व गरजूंना त्याचे वाटप करण्यात आले.
– सुधीर नलवडे, तासगाव, जि. सांगली