महाड येथील चवदार तळ्यावरून यात्रेची सुरुवात
डॉ.बाबा आढावांनी दाखविला हिरवा झेंडा!
८५ दिवस, ३४ जिल्हे आणि २५० पेक्षा जास्त कार्यक्रमांधून होणार प्रबोधन.
‘जादूटोणा विरोधी कायदा- प्रभावी अंमलबजावणी मोहीम’ 9 मार्च 2014 पासून ‘चवदार तळे, महाड(जि.रायगड)’ येथून सुरू झाली, कष्टकर्यांचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून 31 मे अखेरपर्यंत 85 दिवसांत महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमधून 250 पेक्षा जास्त प्रबोधन कार्यक्रम करण्याचे महत्वाकांक्षी नियोजन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. महाड येथील चवदार तळ्यावर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून व भारतीय संविधानाचा मूल्यआशायाचा जागर करून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. मोहिमेचे उद्घाटन महाराष्ट्रातील कष्टकर्यांचे ज्येष्ठ नेते डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते चवदार तळ्यातील पाण्याने दिवा पेटवून करण्यात आले. माजी पोलीस आयुक्त अशोक धिवरे यांची व डॉ.शैलाताई दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाबा आढाव म्हणाले की, समाजातील अंधश्रद्धा, विषमतेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे. आज समाजाजवळ डोळे आहेत; परंतु डोळसपणा नाही, याचे दु:ख आहे. अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली पाहिजे, त्यासाठी आता तरूणांनी पुढाकार घ्यावा.
अं.नि.स.चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले की, “महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कर्तृत्वातील महत्वाचा प्रसंग ज्या ठिकाणी घडला त्याच चवदार तळ्यावर कायदा अंमलबजावणी मोहिमेची सुरवात करण्यात आली. कारण ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी अस्पृश्यतेची अमानवी व अपमानास्पद अशी अघोरी प्रथा झुगारण्यासाठी चवदार तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन प्राशन केले. त्याचप्रमाणे अघोरी, अमानुष व अनिष्ट प्रथेच्या विरोधात निर्माण झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीची मोहीम चवदार तळ्याच्या पाण्याने आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून सुरू करावी अशी महाराष्ट्र अंनिसची आग्रही भूमिका होती. तसेच भारतीय संविधानाच्या मूल्य आशयाचा वारदा चालविण्याचा संकल्पदेखील यानिमित्ताने महाराष्ट्र अंनिसतर्फे पुन्हा एकदा करण्यात आली.
कायद्यासाठी अनुकूल मानस तयार करण्याच्या हेतूने राज्यव्यापी जनसंवाद यात्रा दरम्यान 31 मे, 2914 अखेरपर्यंत 9 टप्प्यातून 85 दिवसांत महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांतून किमान 250 कार्यक्रम आयोजित कर्रयात येणार आहेत. त्यामद्ये प्रामुख्याने कायद्यचाया बद्दल हेतुपुरस्सर निर्माण करण्यात आलेल्या गैरसमज व अफवांच्या निरारकरणासाठी जनसामान्यांशी विविध पातळ्यांवर संवाद करण्यात येणार आहे. कायद्याच्या अनुसूचीतील कलमांची चित्रमय स्वरूपातील दृकश्राव्य सादरीकरण आणि त्यांच्याशी सुसंगत बुवाबाजी चमत्कारांचे बहारदार सादरीकरण यात्रेदरम्यान प्रशिक्षित कार्यकर्तेकरतील. कायद्याचा मसुदा व कायद्याची वाटचाल व्यक्त करणारी आकर्षक चित्रमय पुस्तिका, विधायक व कृतिशील होण्याचा संदेश देणारे स्टीकर्स, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध विषयांवरील पुस्तके व सी.डी.आदी प्रचार साहित्य सवलतीच्या विक्री उपलब्ध राहणार आहे. तसेच कायद्याविषयीचे व संत समाजसुधारकांचा वारसा सांगणारे चित्रमय पोस्टर्स प्रदर्शन यात्रेदरम्यान सर्वत्र लावण्यात येईल. यात्रेच्या दरम्यान दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये शहरी व ग्रामीण भागातील विविध जनसमुहांना संबोधित करण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी व खाजगी क्षेत्रातील गटांच्या सोबत कार्यक्रमांची आखणी जिल्हानिहाय नियोजित दौर्याच्या तारखांदरम्यान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या शहरात विविध प्रशासकीय प्रमुख अधिकारी व माध्यमांशी संवाद करण्याचा प्रयत्न राहील. यात्रेचे संयोजन व समन्वयाचे काम मध्यवर्तीतर्फे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार(सातारा) हे बघतील.

जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी महाराष्ट्राचे समाजमन अनुकूल करण्याच्या हेतूने महाराष्ट्र अंनिसतर्फे महत्वाकांक्षी अशी राज्यव्यापी मोहीम राबविली जात आहे. त्यामध्ये आयोजित ‘जादूटोणाविरोधी कायदा अंमलबजावणी जनसंवाद यात्रा’ राज्यातील 34 जिल्ह्यांमधून 85 दिवसांत अडीचशे पेक्षा जास्त कार्यक्रम सादर करणार आहे, त्यामध्ये आखलेला दौरा असा राहील – दि. 9 ते 12 मार्च-रायगड जिल्हा, दि.13 व 14 मार्च-मुंबई जिल्हा, दि.15 ते 18 मार्च ठाणे जिल्हा, दि.19 ते 21 मार्च- नाशिक जिल्हा, दि.22 ते 24 मार्च- नंदूरबार जिल्हा, 25 व 26 मार्च धुळे जिल्हा, 27 ते 30 मार्च – जळगाव जिल्हा, 31 मार्च-बुलडाणा जिल्हा, 1 व 2 एप्रिल-अकोला जिल्हा, 3 व 4 मार्च एप्रिल -वाशिम जिल्हा, 5 ते 7 एप्रिल-अमरावती जिल्हा, 8 व 9 एप्रिल – वर्धा जिल्हा, 10 व 11 एप्रिल- नागपूर जिल्हा, 12 एप्रिल – भंडारा जिल्हा, 13 एप्रिल-गोंदिया जिल्हा, 14 व 15 एप्रिल गडचिरोली जिल्हा, 16 ते 18 एप्रिल चंद्रपूर जिल्हा, 19 ते 21 एप्रिल यवतमाळ जिल्हा, 22 एप्रिल-हिंगोली जिल्हा, 23 ते 26 एप्रिल-नांदेड जिल्हा, 27 व 28 एप्रिल- परभणी जिल्हा, 29 एप्रिल ते 2 मे – लातूर जिल्हा, 3 व 4 मे-उस्मानाबाद जिल्हा, 5 ते 7 मे बीड जिल्हा, 8 व 9 मे-जालना जिल्हा, 10 व 11 मे- औरंगाबाद जिल्हा, 12 ते 14 मे- अहमदनगर जिल्हा, 15 ते 17 मे – पुणे जिल्हा, 18 ते 20 मे सोलापूर जिल्हा, 21 ते 23 मे- सांगली जिल्हा, 24 व 25 मे- सातारा जिल्हा, 26 व 27 मे – रत्नागिरी जिल्हा, 28 मे- सिंधुदूर्ग जिल्हा, 29 ते 31 मे- कोल्हापूर जिल्हा, प्रबोधन यात्रा समारोप कार्यक्रम रविवार दि.1 जून 2014 रोजी कोल्हापूर येथे सामाजिक न्यायकर्ते राजर्षी शाहू महाराजांना अभिवादनाने केला जाणार आहे.
महाराष्ट्राच्या महसूल विभागनिहाय ‘जादूटोणा विरोधी कायदा- स्वागत व अंमलबजावणी मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी किमान 3 तासांच्या मेळाव्याची आखणी करण्यात येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये त्या महसुल विभागातील जिल्हा व शाखानिहाय समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि समविचारी संस्था, संघटनांमधील कार्यकर्ते सहभागी होणे अपेक्षित आहे. तसेच त्याशिवाय इतर जनसमूहांचे प्रतिनिधीत्व करणार्या व्यक्तींचा सहभाग मोठ्या संख्येने मिळेल असे विशेष प्रयत्न करावेत. कायदा स्वागत व अंमलबजावणी बाबत महसुल विभागनिहाय मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच कायदा अंमजबजावणीसाठी अंनिस व समविचारी कार्यकर्त्यांसह समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करणार्या व्यक्तींचे प्रशिक्षक प्रशिक्षण शिबीरे राज्याच्या 6 महसूल विभागनिहाय घेण्यात येणार आहे. महसूल विभाग निहाय दीड दिवसांचे प्रशिक्षक प्रशिक्षण शनिवार व रविवार दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये पूर्वनोंदणी करून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सहभागी होणे अपेक्षित आहे.
–माधव बावगे
लेखक संपर्क : 9404870435