Categories
निषेध

जातीभेद गाडून टाका!

जून – २०१३

दि.16 डिसेंबर 2012 रोजी रात्री जामनेर, जि.जळगाव शहरात आणखी दोन निरागस मुलांचा बळी  जातीव्यवस्थेमुळे गेला. याबाबत माहिती अशी की, जामनेर शहरामध्ये एक शेतकरी मध्यमवर्ग कुटुंब आनंदाने राहत होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा होता. त्यापैकी एका मुलीचे लग्न झालेले असून ती सुखी आहे. दोन नंबर मुलीचे शिक्षण बी.फार्म झालेले होते व ती शहरात जॉबही करत होती व भाऊ जळगावला डिप्लोमा करीत होता. जामनेर शहरामध्ये आर.एस.एस. पगडा. मुलगा नियमित शाखेवर जात असे. अशातच मुलीचे(मुलगी ओ.बी.सी.) एका दलित मुलाबरोबर सूत जुळले. तिने भावाला याविषयी सांगितले आणि इथेच तिची फसगत झाली. भावाला मित्राप्रमाणे समजणार्‍या बहिणीची चूक झाली. भाऊ धार्मिक कामासाठी सुट्टीवर आला. देवीचा दिवसभर भंडारा वगैरे आटोपला. रात्री दोघेही आपापल्या रूममध्ये गेले. भावाच्या मनात बहिणीच्या वर्तणुकीबद्दल चीड होतीच त्याने बहिणीला झोपेतच वार करून संपविले व स्वत: फाशी घेतली. 17 डिसेंबरला सकाळी दोघांचाही प्रतिसाद न मिळाल्याने ही गोष्ट समोर आली. परंतु भावाने बहिणीचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याने पुरावाच नष्ट झाला व जातीव्यवस्थेने आणखी दोन बळी घेतले.

            संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येते की, जातीअंताच्या लढ्यासाठी काहीही मदत लागल्यास जवळच्या शाखेशी संपर्क करावा.

-संजय बारी, पुणे