Categories
अभिवादन

 असगर अली इंजिनियर सच्चा सुधारक हरपला

जून – २०१३

          असगर अलि इंजिनियर हे मुस्लीम-बोहरा समाजातील कृतीशील सुधारक व विचारवंत. इस्लाम धर्माला त्यांनी उदारमतवादी आशय दिला. त्यांचे 14 मे रोजी सांताक्रूझ येथे दु:खद निधन झाले. एक समविचारी सच्चा मित्र गमावल्याची वेदना व्यक्त करताना त्यांच्या कार्याचा परिचय वाचकांना करून देत आहोत.

            राजस्थानमधील सलंबर येथे दाऊदी बोहरा समाजात असगर अलींचा जन्म झाला. लहान वयातच त्यांनी कुराणाचा सखोल अभ्यास केला. स्थापत्य अभियंता ही पदवी मिळाल्यावर मुंबई महापालिकेत त्यांनी वीस वर्षेनोकरी केली. 1970 मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेऊन आपल्या समाजातील रूढी व परंपरा दूर करण्याचे सुधारकी कार्याला त्यांनी वाहून घेतले.

            धर्माच्या आधारे समाजसुधारणा करण्याची भूमिका त्यांनी समर्थपणे मांडली. ‘इन्स्टिट्युट ऑफ इस्लामिक स्टडीज’ आणि ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अ‍ॅण्ड सेक्युलॅरिझम’ या दोन संस्थांची स्थापना त्यांनी केली. सुधारणावादी बोहरा चळवळीचे नेतृत्व आणि इस्लामचा उदरमतवादी दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याची मांडणी या दोन्ही चळवळींचे नेतृत्व त्यांनी शेवटपर्यंत केले. दाऊदी बोहरा समाजात अनुयायांना वेळोवेळी वेगवेगळ्या रूपाने सैयदनासाहेबांना कर द्यावा लागतो. हे कर देण्याचे नाकारणार्‍यांना जमातीतून बहिष्कृत केले जाते याच्या विरोधात गेली अनेक वर्षेसंघर्ष सुरू आहे. नोमानभाई कॉन्ट्रॅक्टर व त्यांच्या सहकार्‍यांनी चालवलेली ही लढाई असगर अलींनी नोमानभाईंच्या मृत्यूनंतर समर्थपणे चालवली. असगर अलींची दुसरी भूमिका म्हणजे जागतिक पातळीवर मुस्लिम समाजात उदारमत रूजवण्यासाठीची धडपड, ‘कुराणमध्ये वांशिक समता आहे. त्यात स्त्रियांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत आणि सर्वार्थाने कुराण हा समतावादी तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ, तर इस्लाम हा समतावादी धर्म आहे’, अशी त्यांची मांडणी होती. धर्माच्या नावाखाली होणारा हिंसाचार व इस्लामच्या नावाने ‘जिहाद’ या शब्दाच्या आधारे होणारे दहशतवादी हल्ले हे कसे धर्माच्या विरोधी आहेत, हे ते सांगत. तीन वेळा ‘तलाक’ शब्द उच्चारून घटस्फोट देणे, बहुपत्नीत्व इ. मुद्द्यांवरही ते आग्रहाने त्यांची बाजू मांडत. शहाबानो प्रकरणात पोटगीच्या विरोधात असलेल्या मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी त्यांनी वैचारिक संघर्ष केला. त्यांचा इस्लामवरचा अभ्यास हा जागतिक पातळीवर मान्य झाला होता. जातीय दंगली हा आपल्या देशासमोरचा मोठा प्रश्न आहे. असगर अलींनी या प्रश्नाचा अभ्यास केला. दंगली होऊ नयेत, म्हणून सर्व पातळ्यांवर प्रयत्न करण्यात ते आघाडीवर असत. विविध धर्मियांमध्ये संवाद निर्माण व्हावा, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.

            धर्मामध्ये चालत आलेल्या परंपरा, पद्धती यांचे केवळ अंधानुकरण करण्याला असगर अली इंजिनियर यांचा ठाम विरोध होता. या विषयावर विचार व चर्चा करून वर्तमानाशी त्याची सांगड घालून इस्लामची तत्वे आचरण्यावर त्यांचा विशेष भर होता. तीन विद्यापीठांनी त्यांना ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल करून गौरविले होते. समाजसुधारणेसाठी अथकपणे काम करणार्‍या इंजिनियर यांचे 52 ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. ‘द इस्लामिक स्टेट’, ‘इस्लाम अ‍ॅण्ड मुस्लीम-ए क्रिटिकल रिअ‍ॅसेस्मेंट’, ‘इस्लाम इन साऊथ अ‍ॅण्ड साऊथ ईस्ट एशिया’, ‘इंडियन मुस्लीम-ए स्टडी ऑफ मायनॉरिटी प्राब्लेम्स इन इंडिया’, ‘इस्लाम इन इंडिया-द इम्पॅक्ट ऑफ सिव्हीलायझेशन’, ‘प्रॉब्लेम्स ऑफ मुस्लीम वुमेन’, ‘द शहाबानो कॉन्ट्राव्हर्सी’ आणि इतर अनेक ग्रंथांनी समाजाला वैचारिक दिशा देण्याचे काम त्यांनी केले. इंडियन जर्नल ऑफ सेक्युलॅरिझम या मासिक पत्रिकेचे संपादनही त्यांनी केले आहे. त्यांच्या समााजिक कार्याच्या सन्मानार्थ अमेरिकेतील यु.एस.ए. इंटरनॅशनल स्टुडंट असेंब्ली आणि यु.एस.ए. इंडियन स्टुडंट असेंब्लीच्या वतीने 1987 मध्ये त्यांना विशेष सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 1990 मध्ये त्यांना सामाजिक सौहार्दाबद्दलचा दालमिया पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘अ लिव्हिंग फेथ : माय स्क्वेस्ट फॉस पीस, हार्मनी अ‍ॅण्ड सोशल चेंज’ या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या व्यापक कार्याचा परिचय होतो.

            असगर अली आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे साहित्य व त्यातून व्यक्त झालेले विचार आपल्या सोबत आहेत ते सदैव मार्गदर्शक ठरतील. या देशात भविष्यात धार्मिक दंगली होऊ नयेत यासाठी आपण कटीबद्ध होणे हे त्यांच्या मैत्रीला जागणे ठरेल.

-सुभाष थोरात