Categories
प्रतिसाद

वाचणारे म्हणतात

जून – २०१३

भोंदू बाबांना विरोध केला पाहिजे.

            आपल्या वार्तापत्रात ‘ऐसे कैसे झाले भोंदू’ या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रासंगिक लेखात आसाराम बापूंवर अत्यंत कठोर असा प्रकाश टाकलेला आहे. आसारामबापूंच्या भजनी लागलेल्या महाराष्ट्र भूमीतील लोकांची मला कीव करावीशी वाटते की, जो माणूस दुष्काळी परिस्थितीतही तहानलेल्या लोकांची जाण न ठेवता आपले बुवाबाजीचे प्रयोग सरकारच्या निर्णयाची पर्वा न करता करीत राहतो हे चिंतास्पद आहे. आपले शासनही अशा वेळेस लोकहितासाठी कारवाई करताना का दिसत नाही? निव्वळ काही लोकांना विशेष वागणूक दिल्याने राज्याचे फार मोठे नुकसान होत आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. डॉ.दाभोलकरांनी सर्वच मुद्यांची चर्चा केलेली आहे, त्यांची तळमळ योग्य आहे. सर्वच जनतेने अशा भोंदू बुवांच्या कार्याला विरोध केला पाहिजे.

-दिलीप सुरवाडे, भुसावळ, जि.जळगाव


पत्नीच्या नावे घर करणारी मोहीम महत्त्वाची

            माहे मार्च 2013 चा वार्तापत्राच्या अंकातील पान न् पान वाचनीय, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणारा, अंधश्रद्धा पसरविणार्‍यांचा भांडाफोड करणारा आहे. पती पत्नींच्या नावे घर-वास्तू करण्याची अ‍ॅड.पगार-गवांदे यांची कृती महिलांना हक्काची जाणीव करून देणारी. आर्थिक लाभाची आहे. शेत जमीनीच्या संदर्भात 7/12 च्या उतार्‍यावरही नोंद होणे जास्त गरजेचे आहे. यासाठी महसूल खात्यातील तलाठी वा गाव कामगाराचे सहकार्य मिळवणे महत्वाचे.

-रमेश थेटे, चिंचवड, पुणे


मृत्यूनंतरची कर्मकांडे केली नाहीत.

            अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची मी नियमित वाचक आहे. केवळ वाचक न राहता प्रत्यक्ष त्याप्रमाणे कृतीही करीत आहे. अर्थात याचे श्रेय जाते ते माझे वडील कै.कृष्णा सहदेव बोभाटे ह्यांना. आमच्या बालपणापासूनच त्यांनी आमच्यावर कर्मसंस्कार केले. आमच्या घरी(माहेरी) कोणतीही पूजा, धार्मिक कर्मकांड करण्यात आली नाहीत. माझ्या आईचे आणि भावाचे निधन झाल्यानंतर कोणत्याही अंत्यसंस्काराशिवाय त्यांचे दहन केले. अर्थात वडिलांचेही अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. लाकडांचा अपव्यय करायचा नाही म्हणून विद्युत दाहिनीत दहन केले. दशक्रिया विधी किंवा बारावं, तेरावं असे कोणतेही विधी केले नाहीत. पितृपक्षात वाडीही ठेवली नाही. अर्थात त्याकरिता नातेवाईकांचा थोडासा रोष पत्करावा लागला. तथापि, तत्वांशी तडजोड केली नाही. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांचे नेत्रदानही केले. त्यांच्या आजारपणामुळे त्यांची लेखी परवानगी घेता आली नाही. तथापि, मी माझ्या लेखी संमतीने त्यांचा नेत्रदानाचा निर्णय अंमलात आणला. मीही कोणत्याही कर्मकांड करण्याच्या पूर्णत: विरोधात आहे. अर्थात त्यामुळे आयुष्वात काहीच अडलं नाही. उलटपक्षी सर्व निर्णय तारतम्याने घेतले गेले आणि पुढील पिढीकडे तोच वसा सोपवला आहे. एक स्त्री म्हणूनही सार्‍या रूढींविरोधात खंबीरपणे उभे राहता येते हेच माझ्या भगिनींना कळावं म्हणून हा पत्रप्रपंच.

-सौ.विनित विनय चव्हाण, मुंबई


आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्राचे काम अभिनंदनीय!

            गुरूवार दि.30 एप्रिल 2013 रोजी सायंकाळी सांगली येथे आपल्या आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राच्या उद्घाटन समारंभास उपस्थित रहाण्याची संधी मला मिळाली. कार्यक्रम फारच चांगला झाला. त्याबद्दल आपणा सर्व संयोजकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

            पुढील काळात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करणार्‍या जोडप्यांचे स्नेहसंमेलन व्हावे. उन्हाळ्याचे दिवस सोडून संपूर्ण दिवसात अनुभव कथन, चर्चा, परिसंवाद, विचारांची देवाण-घेवाण, सांस्कृतिक कार्यक्रम, जेवण इ.व्हावेत. त्यासाठी मोठा हॉल घ्यावा. चांगल्या विचारांचे प्रायोजक नेमता येतील तसेच उपस्थितांकडून वर्गणी घेता येईल. ते आनंदाने देतील. त्यामुळे पैशाचा भार पडणार नाही. अशी माझी विनंती वजा सूचना आहे. कृपया पहावे. सहाय्यता केंद्राच्या कामात माझी समुपदेशक म्हणून जरूर मदत घ्यावी. ती मी आनंदाने देण्यास तयार आहे. सहाय्यता केंद्र चालविणार्‍या कार्यकर्त्यांना माझा सादर नमस्कार व हार्दिक सदिच्छा!

प्रा.एस.बी.माणगावकर, सांगली.

            (आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्राचे उपक्रम गतीमान करण्यासाठी वरील प्रकारच्या विधायक सूचनांचे स्वागत आहे. वाचकांनी आपले विचार व सूचना कळवाव्या. – संपादक)