पाणी रे पाणी तेरा रंग कैसा या चित्रपट गीतातील पाण्याच्या रंगाचा सवाल महत्वाचा नाही. पण पाण्याच्या बाबतीत सध्या जे भीषण संकट घोंघावते आहे त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. नुकताच एक बापू नागपूर व मुंबईत पाण्याचे फवारे शक्तीमान यंत्राने आपल्या भक्तावर उडवून गेला. त्याच्या पाण्याच्या फवार्याने भक्तांचे आजार पळून जाणार आहेत म्हणे! दुष्काळी भागात पाण्याविना पशू-पक्षी व माणसे तडफडायला लागलीत. परवाच पाण्याविना तहानेने तडफडून मरण पावलेल्या मोरांची छायाचित्रे प्रसारमाध्यमात पहायला मिळाली. अध्यात्मिक गुरू जगाच्या कल्याणाची काळजी(निदान त्यांच्या प्रवचनात) दाखवितात. पण त्यांची खरी चिंता ते व त्यांचे अज्ञानी भक्त हीच असते. त्यांच्या संवेदना बोथटच असतात. पण आपल्याला असं संवेदनाहीन राहून चालणार नाही. कारण दुष्काळ दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे व त्यावरचे उपाय व कारणे यांची वैचारिक घुसळण सर्वत्र सुरू झाली आहे.
दुष्काळ अस्मानी की सुलतानी इथंपासून ते पाण्याबाबत विविध अंगांनी मतमतांतरे मांडली जात आहेत. या विचार मंथनातून जलसाक्षरतेची मोहीम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वार्तापत्राने मे चा अंक ‘दुष्काळ व जलसाक्षरता विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध करण्याचे ठरविले.
9 मार्चच्या सकाळमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जलसाक्षर समाजच भविष्यात विकासाकडे झेप घेऊ शकतो असे विधान प्रसिद्ध झालंय. पण विकास म्हणजे नेमके काय? काहींचा विकास व इतरांचे शोषण? शहरांचा विकास व ग्रामीणांची होरपळ? विकास म्हणजे मोठी धरणे, मोठे उद्योग, वस्तू व बाजारपेठेची रेलचेल? विकास म्हणजे काहीच्या चेहर्यावर हास्य व बहुजनांच्या डोळ्यात अश्रू? विकासाची कल्पना व वास्तव आपण नीट समजून घ्यायला हवे.
निसर्ग संपत्तीची वारेमाप लूट, त्यासाठी हार्ड तंत्रज्ञानाचा वापर व त्यातून निर्माण झालेली ‘हपापा’ संस्कृती पाण्याच्या दुर्भिक्षासाठी जबाबदार आहे असा विचारवंतांचा निष्कर्ष आहे. हपापा संस्कृतीची बकासुरी भूक व राक्षसी तहान भविष्यात भीषण परिस्थिती निर्माण करील. तेव्हा वेळीच सावध होऊन कृतीशील पाऊल टाकायला हवे. असा इशारा जलवैज्ञानिक देत आहेत.
या विशेषांकात दुष्काळ व पाण्याची उधळपट्टी याबाबतची मीमांसा मांडणारे विविध लेख समाविष्ट केले आहेत. त्या लेखातून मांडलेले वास्तव झोप उडविणारे आहे. हपापा संस्कृती आपणाला श्रीमंत बापाच्या बारबालावर पैसे उधळणार्या दिवाळखोर मुलाप्रमाणे बनवित आहे. हार्ड तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे महाराष्ट्रात ग्रामीण शेतकरी व शहरी पांढरपेशा यांच्यामधील विषमता वाढत चालली आहे. वस्तूंच्या रूपात पाण्याचा प्रचंड ओघ ग्रामीण भागातून शहराकडे वाहू लागला आहे. टिकून रहाण्यासाठी शेतकरी विहिरी खोल करू लागलेत, बोअर्सनी 1000 फूटाच्या खाली पातळी गाठलीय. लाखो वर्षांपासून भूगर्भात साठून असलेले पाणी उपसायला सुरवात झाली आहे. पावसाच्या पडणार्या एकूण पाण्यापेक्षा विविध तंत्रांनी वापरलेले पाणी अती होऊ लागलंय. परिणामी जलाशय व धरणे कोरडी पडू लागली नाहीत तरच नवल.
पाण्याचा अतिरिक्त वापर ग्रामीण जनतेच्या विस्थापनाला कारण ठरत आहे. मुंबई, पुणे, नाशिक अशा सुवर्ण पट्ट्यात झोपडपट्ट्या वाढू लागल्यात. यात काम करायला येणार्यांना डुकरापेक्षाही हीन जिणे जगावे लागत आहे.
पाण्याचे सुयोग्य नियोजन झाले नाही तर व हपापा संस्कृतीचा माज असाच चालू राहिला तर आंटार्क्टिकावरील हिमनगातील सगळं बर्फ महाराष्ट्रात आणून ओतले तरी दुष्काळ हटणार नाही.
विचारवंत व वैज्ञानिक असा इशारा देताहेत की, आपण पर्यावरणप्रेमी, समुचित सॉफ्ट तंत्राचा वापर केला तर, आपण खरेखुरे जलसाक्षर झालो व जलखुळचटपणा टाकून दिला तरच केवळ दुष्काळ व पाण्याचा प्रश्नच मिटेल असं नाही तर मोठ्या संख्येने रहाणार्या खेड्यातील जनतेला जीवन आनंदी व सुसह्य बनविता येईल. यासाठी पाण्याचे विज्ञान समजून घेणे व त्यानुसार कृतीशील होणे हाच उपाय आहे. तकलादू उपाय नको तर कायम स्वरूपी उपाय भान ठेवून समजावून घ्यावे लागतील व बेभान होऊन ते अंमलात आणावे लागतील.