Categories
जात पंचायत

जातपंचायतीपेक्षा न्यायव्यवस्था सक्षम कराव्यात

जून – २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘जात पंचायतीला मूठमाती अभियान’ सुरू आहे. महाराष्ट्र अंनिस जात ही अंधश्रद्धा मानते. जात पंचायती या समांतर न्याय व्यवस्था चालवितात याचीही जाणीव अंनिसला आहे. तरीदेखील गेली दोन वर्षे जात पंचायतीला मूठमाती देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातूनच अंनिसकडे जातपंचायतीच्या मनमानीविरूद्ध तक्रारी येऊ लागल्या.

अंधश्रद्धा निर्मूलन समतीच्या कोल्हापूर शाखेत सहभागी असणार्‍या किरण गवळी यांच्याकडे गडमुडशिंगी येथे राहणार्‍या संगीता पुजारी हिने एक तक्रार अर्ज दिला. जातपंचायतीच्या पंचांनी संगिता पुजारी हिला बहिष्कृत केले होते. सन 2000 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे न राहण्याचा समाजाचा निर्णय न मानल्यामुळे संगिता पुजारी यांच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले. त्यातच सन 2008 मध्ये संगिता पुजारीच्या पतीचे निधन झाले. संगिताचा समाजाच्या धार्मिक व इतर सार्वजनिक कार्यक्रमात अवमान करण्यात आला. तसेच तिला मिळणारा पुजेचा अधिकारही नाकारला. त्यामध्ये बिरदेवाच्या भाकरीचे पीठ नाकारले, समाजात परत घेण्यासाठी संगिताचे वडील प्रयत्नशील होते, त्यांच्याकडे पैशाची (रू.1,50,000/-) मागणी पंच मंडळींनी केली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या साप्ताहिक मिटींगमध्ये सदर तक्रार अर्ज व तक्रारदार महिलेचे म्हणणे ऐकले. यावेळी अंनिसच्या वतीने संगिता पुजारी हीस जातीतून बहिष्कृत करता येत नाही, तिला तिचा पुजेचा अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, तसेच विधवा महिलेच्या मागे महाराष्ट्र अंनिस उभी राहील असा विश्वास देण्यात आला. यासंबंधी अंनिसने तंटामुक्ती समिती, धनगर समाजातील पंच मंडळींशी संपर्क केला. याबाबत लेखी निवेदन तंटामुक्ती समिती व गांधीनगर पोलीस ठाणे यांचेकडे देण्यात आले.

पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र अंनिस व धनगर समाजातील पंच मंडळी यांची एकत्रित बैठक घेतली. महाराष्ट्र अंनिस राज्यसचिव प्रशांत पोतदार, कृष्णात कोरे, जात पंचायती संदर्भात काम करणारे शंकर कणसे, सीमा पाटील, शहर कार्याध्यक्ष सुजाता म्हेत्रे, पोलीस उपनिरिक्षक संभाजी गायकवाड, पंच मंडळी हजर होती. पोलीस प्रशासनासमोर अंनिसने आपली भूमिका मांडली. जातीतून बहिष्कृत करण्याचा अधिकार पंचांना नाही, पंच मंडळी समांतर न्याय व्यवस्था चालवित आहे. यावर पंचमंडळी निरूत्तर झाली. सविस्तर बैठक गावामध्ये बोलवावी असे सुचविण्यात आले. यावेळी अंनिसच्या कोल्हापूर शाखेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे यांनी या बैठकीस गावच्या महिलांनाही बोलवावे असे सुचविले. पंच मंडळी खवळली. आम्ही महिलांना बोलवत नाही(खरोखर आपण कोणत्या काळात वावरतोय) असे सांगून दि.29/4/2015 रोजी सायंकाळी 9 वाजता बिरदेव मंदिरात बैठक होईल असे सांगितले.

दि.29 एप्रिल रोजी सायंकाळी 9 वाजता बिरदेव मंदिर, गडमुडशिंगी येथे बैठकीस महाराष्ट्र अंनिस राज्यसरचिटणीस प्रशांत पोतदार, राज्य युवा कार्यवाह कृष्णात कोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी, जात पंचायती संदर्भात काम करणारे शंकर कणसे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड, सरपंच तानाजी पाटील, डेप्युटी सरपंच, संगिता पुजारी, नातेवाईक, धनगर समाजातील पंच, नागरीक उपस्थित होते.

यावेळी युवा कार्यवाह कृष्णात कोरे यांनी संगिता पुजारी यांनी दिलेल्या तक्रारी सांगितल्या तसेच आपल्या देशात जातपंचायतींना न्यायदान करण्याचा अधिकार नाही, देशात संविधानाने नेमलेली न्यायालयेच न्यायदान करू शकतात. असे असताना कुणी जाणीवपूर्वक असे न्यायनिवाडे करू नयेत. धनगर समाजातील पंच मंडळींनी आमच्याकडे असे प्रकार होत नाहीत असे सांगितले. संगिता पुजारी हिला सन्मानाने या पुढे वागणूक दिली जाईल. पंच मंडळावर संगिता पुजारी हिने दिलेल्या तक्रारी मागे घेतल्या. संगिता पुजारी ही जिल्हा परिषदेमध्ये सध्या नोकरी करत आहे. त्यांनी निर्भयपणे जात पंचायतीच्या मनमानी विरूद्ध तक्रार दिली, त्यामुळेच तिला रास्त न्याय देण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या कोल्हापूर शाखेने प्रयत्न केले.

कायदा व पोलीस प्रशासनाचा नाद गरीबाला जाळतो असे मत धनगर समाजातील ज्येष्ठाने व्यक्त केले, कायद्याचा नाहक त्रास होतो, म्हणूनच जात पंचायती न्यायनिवाडे करू लागली. न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन प्रभावी होणे आवश्यक आहे तर या जात पंचायती दुर्बल होतील. जातपंचायतीचे प्रभावी हत्यार बहिष्कृत करणे हे कायद्याद्वारे काढून घेतले तरच जातपंचायती मोडून पडतील. त्यासाठी ‘महाराष्ट्र जात पंचायत कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम’ शासनाने मंजूर करण्याचा निश्चय केला आहे ही अभिनंदनाची गोष्ट आहे. कायदा व जनप्रबोधन यातूनच हा प्रश्न नक्कीच सुटेल.

यावेळी अंनिस कोल्हापूर शाखेचे कार्यकर्ते शहर कार्याध्यक्षा सुजाता म्हेत्रे, सीमा पाटील, विनायक चव्हाण, हर्षाली पोतदार, संघसेन जगतकर, विजय अकोळकर, रमेश वडणगेकर, सचिन ओतारी, रविराज पाटील, दत्तात्रय घुटुकडे आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस नाईक दिपक रेडेकर, गांधीनगर पोलीस स्टेानचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. गडमुडशिंगी गावचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच अशोक दांगट, गणपती पुजारी, बाबासो रानगे, विलास पुजारी, महादेव वाघमोडे, मोठ्या संख्येने धनगर समाजातील युवक ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्यत: दोन व्यक्तीमधील भांडणाच्या निवारण्यासाठी तिसरी व्यक्ती किंवा लवाद नेमतात. पण ते प्रकरण संपल्यावर लवादाचे काम ही संपते. नवीन प्रश्न आल्यावर नवीन लवाद नेमला जातो. पण जात पंचायतीत पूर्वापार चालत आलेल्या व्यक्ती असतात. स्त्रियांना यात स्थानच नाही. जात पंचायती समांतर न्यायव्यवस्था चालवितात.

संकलन रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे मो. 9764836994

जातपंचायतीत महिलांना स्थान नाही……

अंनिस कार्यकर्त्यांनी सदरच्या बैठकीस महिलांना आवर्जून बोलवावे असे जात पंचायतीच्या पंचांना सांगितले. पण बैठकीस धनगर समाजातील कोणीही महिला आली नाही, उपस्थित राहू दिली नाही. अजूनही पुरूषी अहंकार दिसत आहेच. महिलांवर त्यामुळे अन्याय वाढतच आहे.