अंनिसने गतनिवडणुकांप्रमाणे यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अचूक भाकीत सांगणार्या ज्योतिषांकरिता 21 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे; परंतु गेल्या वेळीप्रमाणे यावर्षीही कोणत्याही ज्योतिषाने अंनिसचे आव्हान स्वीकारलेले नाही. यावरून खरे तर ज्योतिषांचा धंदा हा फसवणुकीचा व जनसामान्यांचे शोषण करणारा आहे, हे स्पष्ट झालेले आहे. तरीसुद्धा अनेक लोक ज्योतिषांकडे जाऊन त्यांना स्वत:चे कष्टाचे पैसे देऊन आपले भविष्य (अंधपणाने) पाहतात व ज्योतिषी देखील त्या लोकांना आपण स्वत: जणू काही ‘शास्त्रीय’ दृष्टिकोनातून भविष्य सांगत आहोत, असे ढोंग करून लोकांचे आर्थिक शोषण करतात. ज्योतिष हे शास्त्र नाही हे त्रिकालाबाधित सत्य असूनसुद्धा या धंद्यातील लोक समाजातील मनाने कमकुवत असणार्या लोकांच्यामध्ये तेच बिंबवण्यासाठी हल्ली संघटित होऊन वार्षिक अधिवेशन वगैरे प्रकार करीत आहेत आणि अशा ज्योतिषांच्या वार्षिक अधिवेशन वगैरे कार्यक्रमांच्या व्यासपीठावर आपल्याकडील राजकीय नेतेमंडळी स्वार्थासाठी जात असतात; परंतु जर ज्योतिषी हे त्यांचा धंदा हा ‘शास्त्रीय’ आहे, असे म्हणत असतील, तर ज्योतिष धंदा ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येतो.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 प्रमाणे ग्राहक म्हणजे जो पैसे देऊन वस्तू (कॉम्प्युटर, फ्रीज, गाडी, कपडे, बी-बियाणे वगैरे) किंवा सेवा (वैद्यकीय, बससेवा, वीज, पाणीपुरवठा, बँकिंग, विमा वगैरे) खरेदी करतो व या कायद्यानुसार ग्राहकाला 1) सुरक्षेचा हक्क 2) माहितीचा हक्क 3) निवड करण्याचा अधिकार 4) तुमचे म्हणणे मांडण्याचा हक्क 5) तक्रार करण्याचा व निवारण करून घेणेचा हक्क 6) ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार असे सहा अधिकार प्रत्येक भारतीयाला मिळालेले आहेत. तसेच कोणत्याही विक्रेत्याने अनुचित व्यापार पद्धतीचा (Unfair trade practice) अवलंब केला अथवा सेवापुरवठाधारकाने सेवेमध्ये त्रुटी (Defficiency in service) असलेल्या पीडित ग्राहकाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात नुकसान भरपाईसाठी तक्रार करता येते. म्हणूनच वर नमूद केलेल्या हक्कांचा विचार करता ज्योतिषी धंदा हा या कायद्याच्या कक्षेत येतो. ज्योतिषी हे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल तथाकथित शास्त्रानुसार ठामपणाने भाकीत सांगत असतात. वैद्यकीय सेवेबाबत एखादा डॉक्टर ज्याप्रमाणे रुग्णाची तपासणी करून त्याचे रोग-आजाराबाबत निदान करतात व औषधोपचार करतात. त्याचप्रकारे ज्योतिषी देखील तथाकथित शास्त्रानुसार भविष्य सांगत असतात. अनेकवेळा ज्योतिषांकडून जन्मकुंडली काढणे हा प्रकार असतो. यामध्ये जन्मकुंडली ही लिखित स्वरुपात असते; परंतु ही जन्मकुंडली किंवा सांगितलेले भविष्य खोटे ठरले, तर संबंधित ज्योतिषाविरुद्ध नुकसान भरपाईसाठी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दाद मागता येऊ शकते; परंतु यासाठी ग्राहकाकडे ज्योतिषी फीबाबतची पावती असणे आवश्यक आहे. बर्याचवेळा ज्योतिषी हे त्यांनी घेतलेल्या फीबद्दल ‘ज्योतिष फी’ अशी पावती न देता देणगी फी म्हणून पावती करतात. म्हणून ग्राहकांनी जागरूकपणाने संबंधित ज्योतिषाकडून तशी ज्योतिष फी असे स्पष्टपणाने नमूद करून पावती घ्यावी, तरच संबंधित ग्राहकाला ज्योतिषांच्या विरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्याखाली दाद मागता येऊ शकेल.
– अॅड. सुहास माळी (अध्यक्ष, अ.भा. ग्राहक पंचायत वाळवा तालुका)