Categories
इतर

काळवंडलेली ती सकाळ…

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ.नरेंद्र दाभोलकरांना गेली 20 वर्षे मी ओळखतो. त्यांची पहिल्यांदा भेट झाली ती विषमता निर्मूलनाच्या निमित्ताने व नंतरची भेट अंधश्रद्धा निर्मूलनाच्या निमित्ताने. या कार्यातच अखंड बुडालेले ते व्यक्तिमत्व होते. त्यानी निष्ठावंत कार्यकर्त्यांची भली मोठी फळी उभी केली आहे. व हे क्रियाशील कार्यकर्ते महाराष्ट्रभर विज्ञानप्रसार व विवेकजागर यांचे कार्यक्रम घेऊन भाषण, प्रबोधन, प्रत्यक्ष प्रयोग या द्वारे जनजागृती करत आहेत.

आयुका येथील फिरते नभांगण घेऊन यांचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात, खेड्यापाड्यात जाऊन त्याचे प्रदर्शन करत असतात. जणू संपूर्ण विश्व व अवकाशच प्रत्येकाच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवत असतात. सामान्यांना विज्ञाननिष्ठ बनवण्याचा हा एक फार मोठा व प्रभावी कार्यक्रम आहे.

या नियमितपणे कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांबरोबरच अनियमित कार्यकर्त्यांचा ताफाही त्यांच्या समवेत आहे. त्यात माझ्यासारखी मंडळी आहेत. आज औरंगाबादला जा, उद्या दुसरीकडे कुठे तरी शाळेत जाऊन भाषण दे, अशी विनंतीवजा आज्ञाच आम्हाला देत असत. एकदा डॉ. श्रीराम लागू गंमतीने दाभोलकरांना उद्देशून ‘आम्ही तुमचे वेठबिगार आहोत!’ असे म्हणाले. त्यांच्यातील प्रामाणिकपणा व बांधिलकीमुळे आमचे संबंध आणखी घट्ट होत होते.

प्रचंड ताकदीच्या व समाजाच्या सर्व थरांना मान्य असलेल्या एका वलयांकित नेत्याला या लढाईने आमच्यापासून हिरावून घेतले. ही एक दीर्घ लढाई आहे व भरपूर काळ चालणारी लढाई आहे. दाभोलकर एका विचारासाठी व त्या विचाराच्या प्रचारासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहिले. व्यक्तीचा अंत होऊ शकतो, परंतु विचारांचा नाही. आता प्रश्न आहे तो त्याच ताकदीने व वेगाने ही चळवळ पुढे नेण्याची. व त्यासाठी त्यांच्या सहवासात आलेले व सहकारी असलेल्या आपल्या सर्वांच्याकडून भरपूर क्षमता, ऊर्जा व बांधिलकींची गरज आहे.

विवेक व सद्विचारांचा प्रकाश विझवून टाकण्याचा हा प्रकार त्या दिवशी घडला. विवेक, विज्ञाननिष्ठा व विचार यांच्याप्रमाणे भक्कम पाया असत्य व अंधश्रद्धा यांना नाही. तुमच्या विरोधात जाणार्‍या प्रतिवादांच्या इतके वाईट काहीही असू शकत नाही. ज्या भ्याडपणाने, षंढपणाने विवेकावर हल्ला झाला त्या हल्ल्याचा सामना संवाद, चर्चा वा प्रतिवाद करू शकत नाही. विवेकाच्या मुळावरच कुर्‍हाड घालण्याचा व त्या विवेकी व्यक्तीलाच मारून टाकण्याचा तो षंढ प्रयत्न होता.

या पाशवी व हिंस्त्र प्रवृत्तीचा सामना आपण आता कसे करणार? विज्ञानाशी संबंधित असलेले व नसलेले आपण सर्वानी गंभीरपणे विचार व कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विज्ञान प्रसारकावर थोडीशी जास्त जबाबदारी आहे. कारण त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबर विज्ञान हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. म्हणून या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही.

डॉ. दाभोलकरानी विज्ञान व विवेकनिष्ठ समाज उभारण्यासाठी आयुष्य वेचले, खस्ता खाल्या व जीवही दिला. ‘आपण सर्व दाभोलकर’ ही घोषणा ठामपणाने, एकत्रितपणे व ऊंच आवाजात म्हणण्याची हीच वेळ आहे. बंदुकीच्या गोळ्यांच्या विरोधातील विवेकाच्या या लढ्यात आपण विवेकाच्या बाजूचे आहोत. हाच निर्धार आपल्या सर्वांचे मित्र, डॉ. दाभोलकर यांना खरी आदरांजली ठरू शकेल.

–नरेश दधीच