Categories
इतर

त्यांच्या मांडणीचे सूत्र माणसाच्या उत्क्रांतीशी जोडलेले असायचे!

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

1980 च्या दशकात जेव्हा विज्ञान चळवळ उभी राहिली तेव्हा मी लोकविज्ञान चळवळीतील एक कार्यकर्ता होतो. त्या काळात डॉक्टर दाभोलकरांसोबत मी अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. त्यावेळेस मला जाणवलेले त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये एक प्रकारचा मोकळेपणा होता, ऋजुता होती, कार्यकर्त्यांच्या प्रती एक जिव्हाळा होता. ते मांडत असलेल्या विविध प्रश्नांच्या प्रती असलेला त्यांचा अभ्यासूपणा, तळमळ जाणवत होती.

दाभोलकरांच्या कामाचा गाभा जरी अंधश्रद्धा निर्मूलन हा असला तरी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या व्यापक हितसंबंधांची त्यांना चांगली जाण होती. समाजामध्ये असलेल्या आर्थिक विषमतेच्या प्रश्नांचीही मांडणी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत होत राहिली याचे कारण डॉक्टर दाभोलकरांना असणारी ही व्यापक हितसंबंधांची जाणीवच होती. या आर्थिक हितसंबंधांची धर्मकल्पनांशी कशी सांगड असते त्याची कल्पना ब्रेख्तने गॅलिलिओवर लिहिलेल्या नाटकातील एक प्रसंग देतो. चर्चने नेमलेल्या चौकशी मंडळाचा प्रमुख पोपला सांगतो की, समजा गॅलिलिओ जे सांगतात त्यावर लोक विश्वास ठेवू लागले तर ते असे म्हणतील की, ‘बायबलमधील लिहिलेले खोटे आहे’ आणि मग पुढे ते असेही म्हणतील, ‘हे खोटे असेल तर मग चर्चला कर कशासाठी द्यायचा?’ चर्चला सर्वात जास्त भीती आपल्या आर्थिक स्तोत्राची होती आणि त्यासाठी त्यांना गॅलिलिओची भीती होती.

डॉ.दाभोलकर दुसर्‍याचे ऐकून घ्यायचे. त्यांच्या मांडणीतून आपल्याला काही मिळेल का हे ते सतत शोधत असायचे. पुण्यामधील एका कार्यक्रमात मी वैज्ञानिक दृष्टिकोनावर बोलत होतो त्यावेळी ते टिपणे घेत होते. खरे तर त्यांच्या मांडणीपेक्षा मी वेगळे काहीच बोलत नव्हतो म्हणून नंतर मी त्यांना विचारले की, ‘तुम्ही कशाला टिपणे काढत होतात?’ तर ते म्हणाले की, ‘हे तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने मांडता, काही वेगळी उदाहरणे देता ते लिहून घेत होतो कारण ती मला बोलताना उपयोगी येतील.’

डॉ. दाभोलकरांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली पण त्यांच्या भाषणाचा सूर मी काय सांगतोय ते ऐका कारण ते तुम्हाला माहीत नाहीये असा कधीच नव्हता. त्यांच्या मांडणीचे सूत्र माणसाच्या उत्क्रांतीशी जोडलेले असायचे. माणसाचे वेगळेपण हे त्याच्या मेंदूच्या रचनेशी, त्याच्या आकारमानाशी त्यावरील सुरकुत्यांशी आहे, त्याच्या चिकित्सक पद्धतीने विचार करायच्या क्षमतेशी आहे. आपल्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढायच्या प्रवृत्तीशी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे माणसाकडे असलेल्या उपजत क्षमतेचा वापर करणे. त्याचा संबंध केवळ अंधश्रद्धांशी नाही तर सामाजिक प्रश्नांचा विचार करण्याशीही आहे. आज समाजात कोणत्याही प्रश्नावर तो मुळातून समजून घेऊन, माहिती मिळवून, त्याची चिकित्सा करून बोलले जात नाही तर केवळ शेरेबाजी स्वरूपाने, भावनिक आव्हाने करून बोलले जाते. ते आपण टाळले पाहिजे. दाभोलकरांनी अशी शेरेबाजी टाळली. अशा शेरेबाजीकडे दुर्लक्ष करून त्या त्या प्रश्नाकडे मुळातून बघायला पाहिजे, त्याची वास्तवातील माहिती जमवून, त्याचे विश्लेषण करून तर्कसंगत निष्कर्ष काढले पाहिजेत. दाभोलकरांची पद्धत अशीच तंतोतंत होती. अलिकडेच दाभोलकरांनी लिहिलेल्या एका लेखाचे शीर्षक होते, “जातीअंताच्या लढ्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन.”

डॉ. हेमू अधिकारी