बाबा आमटे यांच्या आनंदवनातील महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर 2002 मध्ये एक प्रशिक्षणार्थी म्हणून डॉ. दाभोलकरांसोबत पहिली ओळख झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 2004 मध्ये 18 व 19 सप्टेंबरला चंद्रपुरातील मातोश्री सभागृहात जिल्हास्तरीय दुसरे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये डॉ. दाभोलकरांचे विज्ञाननिष्ठ व विवेकवादी विशेष व्यक्तीमत्व मला जवळून अनुभवता आले. त्यांच्या प्रभावी व्यक्तीमत्वामुळेच मी प्रभावित झालो आणि जिल्ह्यामध्ये चळवळीच्या कार्याचा प्रसार व प्रचार करण्याची जबाबदारी स्वीकारली.
2005 पासून दरवर्षी झालेल्या राज्यकार्यकारिणीच्या प्रत्येक बैठकीमध्ये जिल्ह्याच्या कामकाजाबाबत विचारपूस करून डॉक्टर मार्गदर्शन करायचे. 2004 मध्ये अंनिवाचे वर्गणीदार नगण्य होते व जाहिरातदार नव्हतेच. त्यांच्या सततच्या संपर्कामुळे व मार्गदर्शनामुळे जिल्ह्यामध्ये 200 च्या वर वर्गणीदार आहेत व 2013 च्या वार्षिक अंकामध्ये एक लाख रूपयेच्या जवळपास जाहिराती मिळाल्या.
दरवर्षी होणार्या राज्य कार्यकारिणीच्या तीन बैठकीच्या निमित्ताने वर्षातून 3-4 वेळा डॉक्टर सोबत भेटी व्हायच्या. तसेच जिल्ह्यातील त्यांच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यामधील विविध पैलूंचं अनुभव मला अनुभवता आले. रात्री माझ्या निवासस्थानी कार्यकर्त्यासोबत चर्चा झाल्यानंतर भोजनाचा कार्यक्रम घरीच पार पडला व मुक्कामही घरीच झाला. माझ्या दोन मुलींच्या कुटुंबासोबत रात्री कौटुंबिक चर्चाही झाली. या दिवशी पुणे ते चंद्रपूर प्रवासादरम्यान वर्धेचा सकाळचा कार्यक्रम आटोपून चंद्रपुरातील विविध कार्यक्रमामध्ये न थकता सतत मार्गदर्शन केल्यानंतर रात्री कार्यकर्त्यासोबत व माझे कुटुंबासोबत हसत खेळत चर्चा करणारं हसरं व्यक्तीमत्व आम्ही सार्यांनी अनुभवलं.
12 ऑगस्ट 2013 ला पुणे येथे संपन्न झालेल्या “मला प्रभावित करून गेलेला सिनेमा” या साधना साप्ताहिकाच्या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभामध्ये माझ्या कुटुंबियांची डॉक्टरांसोबतची शेवटची भेट ठरली. यावेळी त्यांच्या सहकार्यासोबत हे चंद्रपूरचे सक्रीय कार्यकर्ते असल्याचा परिचय करून देताच मला फार आनंद झाला. आणि लगेच एक हप्त्यांनी 20 ऑगस्ट 2013 ला सकाळी डॉक्टरांचा निर्घृण खून झाल्याची वार्ता ऐकताच माझे कुटुंब सुन्न झाले. घरच्या कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणेच चंद्रपूर दौर्याचे वेळी माझ्या निवासस्थानीच मुक्काम असायचा. साहित्यिक व समाजसेवेच्या क्षेत्रात नामांकित व प्रभावी व्यक्तीमत्व असलेली ही व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबामध्ये मिळून, मिसळून वागते, आदरातिथ्य गोड मानून घेते याचे मला अप्रूप वाटे. समाजसेवेच्या कार्यात व जीवनात उपयोगी पडणार्या अनेक गोष्टींची प्रेरणा मला त्यांच्यापासून मिळाली. त्यांच्यापासून मिळालेल्या या प्रेरणेमुळेच व त्यांच्या सहकार्यामुळे अंनिवाचा शतकवीर पुरस्कार तीनदा डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र जाधव नामांकित साहित्यिक अच्युत गोडबोले यांचे हस्ते डॉक्टरांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मिळाला. याचे प्रमुख श्रेय डॉ. दाभोलकरांनाच जाते.
– पी. एम. जाधव, चंद्रपूर.