Categories
व्यक्तिविशेष

संघटनेत व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्याला मान्यता

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

सुमारे 18-19 वर्षांपूर्वीची गोष्ट असावी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभरातल्या कार्यकर्त्यांचा कुटुंब मेळावा सातारा येथे आयोजित केला होता. मी कुटुंबीयांसह सातार्‍याला निघालो होतो. रस्त्यात सोलापूरला लातूरचे कार्यकर्ते प्रा. ओमप्रकाश मदनसुरे कुटुंबियासह भेटले. मी, पत्नी, दोन मुली, मदनसुरे यांच्या पत्नी, त्यांची दोन मुले असे आम्ही सोलापूर-सातारा बसमध्ये रात्री 10 वाजता बसलो. पहाटे 3 वाजता बस सातार्‍याला पोहोचणार होती. निमंत्रण पत्रिकेसोबतच्या सूचनेनुसार सकाळी 6 नंतर रिक्षा सुरू होणार होत्या. आम्ही ठरविले की, 2-3 तास स्टँडवर काढू. आम्ही कोणत्या बसने येणार हे आम्ही डॉ. दाभोलकरांना कळविले होते. डॉ. दाभोलकर आम्हाला घ्यायला अपरात्री स्टँडवर येतील असे अजिबात वाटले नव्हते. तशी अपेक्षासुद्धा नव्हती. म्हणून आम्ही स्टँडवर उतरलो की, पथारी लावण्यासाठी जागा शोधत होतो. 2-3 तास आराम करावा असे आमचे मत होते. म्हणून बायको स्टँडवर एका ठिकाणी बेडशीट अंथरत होती. तेवढ्यात डॉ. दाभोलकरांची हाक कानावर पडली. डॉ. स्वत:ची कार घेऊन आम्हाला न्यायला आले होते. एवढेच नव्हे तर बस येण्याच्या नियोजित वेळी ते येऊन गेले होते. त्यांनी दोन फेर्‍या करून आम्हा सर्वांना आमची उतरण्याची सोय केली होती तेथे सोडले. विशेष म्हणजे पुन्हा ताजेतवाने सकाळी 9 ला कुटुंब मेळाव्याला हजर झाले. वयाने, पदाने, एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला घ्यायला अपरात्री स्टँडवर येतो. हे त्यांचे मोठेपण होते. आजही तो प्रसंग आठवला की, डोळ्याच्या कडा ओलावतात.

पूर्वी मी शासकीय नोकरीत होतो. माझ्या मनोवृत्तीला आणि प्रकृतीला नोकरी मानवणारी नव्हती. एका क्षणी मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या हा निर्णय अत्यंत सुरक्षित होता. या दरम्यान मी डॉ. दाभोलकर यांना माझा हा निर्णय आणि त्याचे आर्थिक गणित सांगितले. पुढच्या प्रवासासाठी माझ्यासाठी बरेच पर्याय होते. त्यापैकी एक होता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ काम करेन. डॉ. दाभोलकरांनी माझे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मला वाटत होते. ते मला अंनिसचे पूर्णवेळ काम कर असे सुचवतील. पण तसे घडले नाही. त्यांनी सांगितले अंनिसचे पूर्ण वेळ काम करायचे किंवा नाही याचा निर्णय तू स्वत:च करावयाचा आहे. त्याबद्दल मी आग्रह तर धरणार नाहीच पण तसा सल्ला देणारही नाही. एक सल्ला मात्र जरूर देतो. तुझे आर्थिक गणित छान जमेल. पण वेळ घालविणे फारच कठीण काम आहे. मी स्वत: जेव्हा वैद्यकीय व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा वेळ कसा घालवायचा हा प्रश्न माझ्यापुढे उभा होता. वेळ घालविणे जमले नाही तर विपरीत घडते. त्यांचे म्हणणे शंभर टक्के खरे होते. मी वकिली सुरू केली आज माझ्या समोर वेळ कसा घालवू असा प्रश्न नाही. मुख्य म्हणजे, खरे सांगतो, त्यांनी अंनिसचे पूर्णवेळ काम करण्याचा आग्रह धरला असता किंवा नुसते तसे सुचित केले असते तरी मी त्या कामात आनंदाने सहभागी झालो असतो. पण कार्यकर्त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा, मतस्वातंत्र्याचा मान राखायचा त्याच्यावर नैतिक सुद्धा दबाव टाकायचा नाही. ही डॉ. दाभोलकरांची काम करण्याची शैली या प्रसंगातून अनुभवाला आली. त्यानंतर अनेक प्रसंगात त्याचा अनुभव आला. आज विचार करता डॉ. दाभोलकरांनी आग्रह केला नाही. सूचित केले नाही याची रूखरूख वाटते. पण आता वेळ निघून गेली आहे.

अ‍ॅड. देविदास वडगावकर