1990 साल डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा लेख वाचनात आला. लेख वाचल्यानंतर डॉक्टरांच्या विचारांनी प्रेरित झालो आणि त्यावेळी डॉक्टरांच्या बरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करण्याचा माझा विचार पक्का झाला. त्यानंतर गेली 24 वर्षे मागे वळून न पाहता डॉक्टरांच्या विचाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करत आलो आहे. डॉक्टरांचा प्रत्येक कार्यकर्त्यांवर असलेला दृढ विश्वास मला अनुभवास आला.
एप्रिल 2013 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा इचलकरंजी घेण्यात आला होता. त्यावेळी स्वत: डॉ. दाभोलकर हजर होते. मेळाव्याच्या शेवटच्या सत्रात द्विवार्षिक जिल्हाकार्यकारिणीची निवड करण्यात येणार होती. त्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून अर्ज भरून घेतले गेले. परंतु मेळाव्याच्या सुरवातीस डॉक्टरांनी मला सांगितले होते की, तुम्ही जिल्हाध्यक्ष व्हायचे आहे. म्हणजे तुमची जिल्हाध्यक्षपदी निवड निश्चित केली आहे. ते शेवटी जाहीर होईल. यावरून डॉक्टरांचा कार्यकर्त्यांवरील विश्वास दिसून येतो.
डॉक्टरांची आणि माझी शेवटची भेट 17 जुलै 2013 रोजी कोल्हापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये झाली. त्यादिवशी जादूटोणा विरोधी कायद्याबद्दलच्या काळ्या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. त्या शिबीरामध्ये डॉक्टरांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मार्गदर्शन करताना सांगितले होते की, अंनिस कार्यकर्त्यांनी पाच ‘प’ पासून दूर रहावे. प्रशंसा, पद, प्रसिद्धी, पैसा आणि पुरस्कार. हा अत्यंत मोलाचा संदेश डॉक्टरांनी कार्यकर्त्यांना दिला होता.
31 मे 2013 रोजी देवदासी मेळावा गडहिंग्लजमध्ये आयोजित केला होता. सदर मेळाव्यास सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना निमंत्रित केले होते. परंतु त्या काही अपरिहार्य कारणामुळे येऊ शकल्या नाहीत. ऐनवेळी संयोजकांनी डॉक्टरांना फोन करण्यास मला सांगितले. डॉक्टरांना फोन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न होता डॉक्टरांनी सदर मेळाव्यास येऊन मार्गदर्शन केले. डॉक्टर केव्हाही गोव्याला जाताना किंवा येताना केसेस संदर्भात गडहिंग्लजला येऊन माझ्या घरी चहापान करून जायचे. प्रसंगी मुक्काम करायचे. इडली-चटणी डॉक्टरांना खूप आवडायची म्हणून डॉक्टर येणार म्हटले की, आमच्या घरी इडली चटणी तयार असायची.
अशा तर्हेने डॉक्टर कोणत्याही कार्यकर्त्याच्या घरी अगदी सामान्य माणसासारखे रहायचे.
दाभोलकर गेले तरी त्यांचे कार्य आपल्याला पुढे नेण्यासाठी डॉक्टर गेल्याचे दु:ख पचवून पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घ्यावाच लागेल, डॉक्टरांची खुनाची बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पसरली, भ्याड, निर्दयी मारेकर्यांच्या धिक्काराच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून येत होत्या. डॉक्टरांनी संपूर्ण आयुष्य हजारो कार्यकर्त्यांना अंधविश्वास नाहीसा करून विवेकाच्या वाटेवर जाण्याचा मार्ग दाखविला. म्हणून जिवंतपणाला स्फूर्ती देणारं शक्तीस्थळ म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर होय. डॉक्टरांची विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणी अंगीकारून जीवनाची वाटचाल करणे हीच खरी दाभोलकरांना आदरांजली ठरेल.
– प्रा. प्रकाश भोईटे, गडहिंग्लज