शाखा भेटीच्या निमित्ताने डॉक्टरांचा मराठवाडा दौरा होता. सुमारे 18-19 वर्षांपूर्वीचा काळ असेल सोलापूर येथील कार्यक्रम आटोपून डॉक्टर उमरगा येथे आले होते. दिवसभराच्या कार्यक्रमांचे नियोजन ठरले होते. काही प्रमुख शिक्षण संस्था, हितचिंतक, जाहिरातदार भेटी दरम्यान डॉ.दामोदर पतंगे, राजू सगर, डॉ.मल्लिनाथ मलंग, प्राचार्य भांडेकर आदी मंडळींची भेट घेतली. शहर शाखेस मदत-जाहिराती आदींची आश्वासने घेऊन आम्ही घरी पोहोचलो. डॉक्टरांसोबत गप्पा गोष्टी करीत आम्ही सगर कुटुंबियांनी कार्यकर्त्यांसह सहभोजन घेतले. दिवसभर सोबत करणारे कार्यकर्ते घरी परतले. प्रा. सर्जेराव माळी, सुभाष वैरागकर, अमोल पाटील आदींसह डॉक्टरांच्या कार्यकर्ते कुटुंबभेटी पार पडल्या होत्या.
शिरस्त्याप्रमाणे माझे वडील कॉ. विठ्ठल आण्णा सगर आणि डॉक्टर यांच्या कॉ. गोविंद पानसरे, नागनाथ आण्णा नायकवडी, एन. डी. पाटील, मेधा पाटकर आदींसह डाव्या पुरोगामी राजकारणाच्या, समाजकारणाच्या गप्पा झाल्या.
मी डॉक्टरांना विश्रांती घेण्यासंबंधी सुचविले पण डॉक्टरांनी पुन्हा माझ्या कामाविषयी चर्चा सुरू केली. बातम्याची कात्रणे, कार्यक्रमांचे फोटोज, शाखा कामाच्या नोंदी रजिस्टर त्यांच्या पुढ्यात ठेवले. डॉक्टरांनी त्यावर बारकाईने नजर फिरवली. बोलता बोलता ते म्हणाले, ‘अरे शाखा बैठकीच्या वेळेस तू परिवर्तन मंचचा अध्यक्ष म्हणून काम करतो असा उल्लेख आला. त्यात तुम्ही काय स्वरूपाचं काम करता?” तेव्हा मी मंचच्यावतीने होणार्या कामाविषयी सांगितले. तो साधारण सप्टेंबर महिन्याचा काळ होता. त्यावेळी आम्ही ‘फटाकेविरोधी मोहिमेची पत्रके’ काढली होती. ती डॉक्टरांना दाखवली.
डॉक्टरांनी ती पत्रके काळजीपूर्वक वाचल्याचं मला लक्षात आलं. अधून मधून ते प्रश्न विचारत होते. शेवटी ते म्हणाले, ‘ही पत्रके घेऊन तू राज्यकार्यकारणीला येण्यासंबंधी सांगितले.’ मी हो म्हणालो. मी शाखा पातळीवर काम करणारा कार्यकर्ता होतो. राज्यकार्यकारणीला जिल्हापदाधिकारी जायचे. हे काम मागे पडले. पुढे मी जिल्हा संघटना बांधणी सचिव म्हणून निवडला गेलो आणि मग राज्यकार्यकारणीला गेल्यावर डॉक्टरांना परिवर्तन मंचाची प्रबोधन पत्रके दाखविली. यावर डॉक्टरांनी उपक्रमाची पूर्वतयारी ते एकूण उपक्रम या विषयी सविस्तर सांगण्याची संधी दिली.
तेव्हा मी विविध उपक्रम राज्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासमोर ठेवले. डॉक्टरांनी सांगितलेला ‘फटाकेविरोधी मोहिमेचा’ उपक्रम विस्ताराने सांगितला. सर्वांना उपक्रम आवडल्याचं जाणवलं. याच कार्यकारिणीत ‘फटाके विरोधी अभियान’ उपक्रम राज्यभर चालविण्याचा निर्णय सर्वानुमते चर्चेअंती घेण्यात आला. याविषयी सविस्तर लेख अंनिस वार्तापत्रासाठी लिहण्याची डॉक्टरांनी सूचना केली. पण मला ते अन्य कामात जमले नाही. पुढे ‘फटाकेविरोधी अभियान’ या नावाने राज्यभर हा उपक्रम सुरू झाला. आजपावेतो तो सुरू असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. याला जोडूनच आणखी एक आठवण….
नंतरच्या काळात मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या औरंगाबाद येथील केंद्रीय कार्यकारणीचा सदस्य म्हणून निवडला गेलो. तसेच प्रतिष्ठान या वाङ्मयीन नियतकालिकाचा संपादक मंडळ सदस्य म्हणून काम करण्याची संधी प्राप्ती झाली. याचाच एक महत्वाचा भाग मराठीच्या संवर्धन संगोपनासाठी ‘वाचन संस्कार’ हा प्रकल्प हाती घेतला गेला. उमरगा येथे वाचनीय पुस्तकांचे स्थायी स्वरूपाचे दुकान नव्हते. आजही नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मराठवाडा साहित्य परिषद, उमरगा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही फटाके दुकानाच्या शेजारी भारत विद्यालय प्रवेशद्वारात पुस्तकांचा स्टॉल लावला जात असे. या उपक्रमासंबंधीही आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली. या उपक्रमाचे डॉक्टरांना कौतुक वाटले. ‘फटाकेविरोधी अभियाना’प्रमाणेच याही उपक्रमाची चर्चा होऊन संपूर्ण राज्यभर शक्य त्या शाखांनी हा उपक्रम राबवावा असा निर्णय झाला. आता मागील काही वर्षांपासून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.
माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे योग्य ते उपक्रम बारकाईने ऐकणे, समजून घेणे व व्यापक प्रमाणात राबविण्याची काळजी घेणे हा डॉक्टरांचा गुणविशेष होता. राज्यकार्यकारणीत, गावोगाव हिंडतांना दौर्यात छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याची दखल घेणं, त्याला प्रोत्साहित करणं, कार्यकर्त्यांच्या कुटुंबियाविषयी आस्थेवाईकपणे चौकशी करणे, जमल्या पद्धतीने तन-मन-धनाने मदत करणे ही डॉक्टरांची विशेष गुणवैशिष्ट्ये होती. कमावत्या नसलेल्या गरजू कार्यकर्त्यास बैठकीस येण्या जाण्याचा खर्च देणं, होतकरू कार्यकर्त्यांचे विमे उतरविणं, अंनिसचं काम वाढविण्यासाठी महाराष्ट्रभर अहोरात्र सतत महिन्यातले 24-24 दिवस फिरत राहणं. या गोष्टी आम्हा कार्यकर्त्यांना शिकण्यासाठी आणि अंगीकारण्यासाठी प्रेरणादायी आहेत. हे गुण आम्ही कार्यकर्त्यांनी अंगीकारले तर निश्चितपणे डॉक्टरांना अपेक्षित असलेलं त्यांच्या स्वप्नातलं काम पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही हे काम करणारच!
– प्रा. किरण सगर