डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण हत्येची बातमी काही तासातच जगभरच्या प्रसार माध्यमापर्यंत 20 ऑगस्ट 2013 रोजी वार्यासारखी पसरली. वार्ताहरच बातमी ऐकून सुन्न झाले होते. 21 ऑगस्टच्या अंकात मुद्रित माध्यमांनी आपापल्या वृत्तपत्रात टिप्पणीसहित ठळक मथळे देत या बातमीला प्रसिद्धी दिली. केवळ मुद्रित माध्यमच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक माध्यमं, ब्लॉग्स, टीव्ही, इंटरनेट, फेसबुक, ट्वीटर, इत्यादी संपर्क माध्यमाद्वारे दाभोलकराबद्दल, त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याबद्दल जगातील कानाकोपर्यापासून प्रतिक्रिया उमटत होत्या. माध्यमाप्रमाणे अनेक मान्यवरांनी व दाभोलकरांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे ओळखणार्यांनी त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले व नजीकच्या माध्यमापर्यंत पोचविले. इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या अशाच काही निवडक प्रतिक्रियांचे संकलन अं.नि. वार्तापत्रांच्या वाचकांसाठी देत असून त्यावरून डॉ. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्वाविषयी जागतिक पातळीवर काय भावना होत्या हे कळू शकेल.
अमेरिकेच्या New York Times ची एलिन बेरी व तिचे सहकारी डॉ. दाभोलकरांच्याविषयीच्या लेखासाठी पुण्यात आल्या होत्या. अंनिसच्या कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली व आवश्यक ती माहिती गोळा करून Battling Superstition, India Paid with His LIfe हा लेख त्यानी प्रसिद्ध केला. खेड्या-पाड्यात पायपीट करत डॉ दाभोलकरांनी तथाकथित आध्यात्मिक जगाच्या विरोधात गेली तीन दशके वैयक्तिकरित्या जणू काही युद्धच पुकारले होते. कुठलाही बुवा, बाबा चमत्काराचा दावा करून जनसामान्यांना भुरळ पाडत असताना डॉक्टर व/वा त्यांचे सहकारी त्याच जागेत तोच चमत्कार दाखवत त्यांना खोटे पाडत होते, त्यांचा पर्दाफाश करत होते. डॉ दाभोलकरांची हत्या याच वैमनस्यातून सनातनी विचारांच्या एखाद्या माथेफिरूनी केली असेल असे त्या वार्ताहराना वाटले असेल. पारंपरिक सनातनी आणि विवेकशील पुरोगामी यांच्यातील आव्हान प्रतीआव्हानाचेच फळ डॉक्टरांना भोगावे लागले. दाभोलकरांच्या शत्रूंची यादी वाढतच होती. काही हिदूं सनातन्यांनी त्यांना जिवेनिशी मारण्याची धमकीही दिली होती. जात पंचायतींचा पुरस्कार करणारेही त्यांच्या विरोधात सामील झाले होते. या परंपरावाद्यांना येऊ घातलेला कायदा नको होता. या कायद्यासाठी डॉक्टर जिवाचे रान करत होते. गेली 14 वर्षेते त्यासाठी लढत होते. खरे पाहता परंपरावाद्याना राग येण्यासारख्या कुठल्याही गोष्टींचा उल्लेख कायद्यात नव्हता. प्राणीहत्या सर्पदंश, मंतरलेले खडे, दिव्यरत्न, गंडे, ताईत, तावीज सारख्या गोष्टींना विरोध करणारी कलमं कायद्यात होती. तरीही विरोध होत होता. सनातन संमोहनतज्ञ, डॉ. जयंत आठवले कुठेतरी दवाखान्यात पडून राहण्यापेक्षा हे (दुर्मऱण) केंव्हाही चांगले. या तिखट उद्गाराचाही या लेखात उल्लेख होता.
डॉ. दाभोलकरावर हल्ला झालेल्या पुण्यातील ओंकारेश्वर पुलाच्या एका टोकाला फुटपाथवर एक हस्तरेषातज्ञ गेली 30-35 वर्षे धंदा करत आहे. हस्तसामुद्रिक, फलज्योतिष, न्यूमरालॉजी, हे सर्व विज्ञानच असून त्यांना कुठलाही कायदा थोपवू शकणार नाही, त्याची ही टीकासुद्धा लेखाच्या शेवटी आहे.
Washington Post या अमेरिकेतील अजून एका वृत्तपत्रानी डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर भारतीय वैज्ञानिकांच्यात उमटलेल्या प्रतिक्रियेचा उल्लेख केला आहे. दाभोलकरांच्या या हत्येमुळे विज्ञानविरोधाला बळकटी मिळेल असे या वैज्ञानिकांना वाटते. परमेश्वराच्या नावाने गरीबांचे शोषण करणार्याना डॉक्टरांनी उघडे पाडले. क्रॉनिक आजार बरे करतो म्हणून दैवी चमत्काराचे उपचार करणारे, हातचलाखी करून चमत्कारांचे दावे करणारे, इतर कुठल्याही रोगापेक्षा भयंकर आहेत, असे डॉक्टरांना वाटत होते. डॉ. दाभोलकर कुठल्याही राजकीय पक्षाचे पुरस्कर्ते नव्हते. जन्माने हिंदू असले तरी हिंदू धर्माच्या कुठल्याही रूढी परंपरा ते पाळत नव्हते. विचार करा व सामंजस्यानी इतरांशी वर्तन करा हेच डॉक्टरांना म्हणायचे होते.
Wall Street Journal च्या सप्तर्षी दत्ता व अशुतोष जोशी यांनी Indian Rationalist Shot Dead हे शीर्षक देऊन दाभोलकरांच्या मृत्युची बातमी दिली होती. भारतातील अंधश्रद्धांचा उल्लेख करताना एखाद्याला विषारी साप चावल्यामुळे शरीरात विष भिनल्यास त्यानी त्या सापाला पकडून चावल्यास शरीरातील विष उतरून जाते. हे उदाहरण दिले होते. याचप्रमाणे एक बाबा मंत्रशक्तीने बाईच्या अंगावरील पांढरे कोड काढून टाकू शकतो असा दावा करत होता. गोर गरीबांना फसवणार्या बुवा बाबांच्या विरोधात डॉ. दाभोलकर लढत होते. दाभोलकरांचा धर्माला विरोध नसला तरी परमेश्वराच्या नावाने होत असलेल्या शोषणाला त्यांचा विरोध होता. डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा विरोधी कायद्यासाठी लढत होते. या कायद्याच्या विरोधात वारकरी पंथ, सनातनवादी एकत्र झाले होते. शिवसेनेनेही त्यांना साथ दिली होती असा उल्लेख लेखात होता.
ब्रिटनच्या The Economist या साप्ताहिकाने 22 ऑगस्टच्या अंकात बातमी व 14 सप्टेंबरच्या अंकात मृत्युलेख छापला होता. दाभोलकरांच्या मृत्यूच्या बातमीसाठीचे शीर्षक He`s not the son of God होता. डॉ दाभोलकरांच्या मुत्यूमुळे नुकत्याच उदयास येत असलेल्या नास्तिकतेचा अकाली मृत्यू झाला. इतर दक्षिण एशियातील देशाप्रमाणे भारतातही नास्तिकवादाला फार मोठी किंमत मोजावी लागते. या देशातील जैन व बौद्ध धर्मांना परमेश्वराचे अस्तित्व मान्य नसले तरी व आताचे अनेक राजकीय नेत्यांचा देवावर विश्वास नसला तरी हिंदू फंडामेंटलिस्टांचा प्रभाव वाढत असून त्यांचा डॉ.दाभोलकरांच्या विचारांना व कार्याला विरोध होता. रोगोपचारासाठी मंतरलेले राशी खडे, ताईत, गंडे दोरे यांचा सर्रासपणे वापर होत असतो या च्या सुमित्र पद्मनाभन यांच्या मताचा उल्लेखही या बातमीत होता.
च्या डॉ. दाभोलकरांच्या मृत्युलेखात त्यांच्या एकूण कार्यांचा आढावा घेतला होता. अवकाशात यशस्वीरित्या रॉकेटचे प्रक्षेपण करणार्या या देशात प्रक्षेपणापूर्वी गंध व फुलानी पूजा केली जाते व हा विरोधाभास कुणाच्याही लक्षात येत नाही याचे आश्चर्य वाटते. या देशात शनिवार हा शुभ दिवस नसतो. नशीब आणि देवाच्या हातीच आपले भविष्य आहे असे आयटीच्या मध्यमवर्गीयांना वाटते. कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवणारे अनेक आहेत.
डॉक्टर केवळ उपदेश करून स्वस्थ बसणारे नव्हते तर स्वतःच करून दाखविणारे होते. गांधीजींच्यावर त्यांचे अती प्रेम होते. जरी डॉक्टरांचा देवावर विश्वास नसला तरी त्यांची संघटना परमेश्वराला नाकारत नव्हती. त्यांचा अहिंसेवर विश्वास होता. त्यांचे टीकाकार त्यांना धर्मबुडवे म्हणत असले तरी देवदेवतांच्या मूर्तींचा त्यांनी कधीच अपमान केला नाही. ते मूर्तींचा आदर करत होते. या शब्दात डॉक्टरांचे वर्णन मृत्युलेखात आलंय.
ब्रिटनच्या या पत्रिकेने खपवळरप Indian anti-superstition activist Narendra Dabholkar Shot Dead या जाड ठश्यातील मथळ्याखाली डॉक्टरांच्या मृत्युची बातमी दिली होती. या वृत्तसंस्थेने आपल्या बातमीत कायद्यामध्ये कुठेही परमेश्वर वा धर्म यांचा उल्लेख नाही. भारतीय घटनेने बहाल केलेल्या उपासना स्वातंत्र्य कुणीही हिसकावून घेणार नाही या डॉक्टरांच्या विधानाचा उल्लेख केला होता. जो काही कायदा आहे तो शोषणाच्या विरोधातला आहे.
पाकिस्तान येथील Dawn या वृत्तपत्राने डॉ. दाभोलकरांच्या हत्येची दखल घेत वैज्ञानिकांची व रॅशनॅलिस्टचे कुणाशीही भांडण नसते परंतु धर्माच्या नावाने युद्धे होतात हे न शोभणारे आहे, असा उल्लेख केला होता.
Times of India या वृत्तसंस्थेची भागीदार कंपनी Times New Network (TNN) असून ही कंपनी टाइम्स ग्रुपच्या सर्व वृत्तपत्रांना वृत्त पुरवत असते. या च्या वार्ताहरांनी दाभोलकरांच्या संबंधी वार्तांकन करून इतरांना बातमी पुरवली होती. विवेक वाघमोडे व राधेश्याम जाधव यांनी कोल्हापूरच्या कॉ गोविंदराव पानसरे व डॉ श्रीराम लागू यांची डॉक्टरांच्या बद्दलच्या प्रतिक्रियाची बातमी छापली होती. सय्यद मोहम्मद यानी या संबंधात हैदराबाद येथे तांत्रिक मांत्रिक रुग्णांची कशाप्रकारे लूटमार करतात याची सर्व माहिती दिली होती. मिहिर टंकसाळे यानी डॉक्टरांचे बंधू, दत्तप्रसाद दाभोलकरांच्या मुलाखतीच्या तपशीलाची बातमी दिली होती. DNA या दैनिकाने सातारा येथील दाभोलकरांचे कुटुंबीय व इतर मित्र परिवाराला भेटून बातमी तयार केली होती. दक्षिण भारतातील अती खपाच्या Deccan herald व The Hindu दैनिकात विवेक मोंटेरो व कुमार सप्तर्षी यांचा लेख होता. दाभोलकरांचे कार्य पुढे नेणे हीच डॉक्टरांना आदरांजली या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
संध्या गोखले व अमोल पालेकर यांनी The Hindu साठी Sorry Doctor, We didn`t deserve you! या शब्दात आपला खेद व्यक्त केला होता. सचिन तेंडूलकर, डॉ एपीजे कलाम यासारखे सेलिब्रिटी जेव्हा सत्य साईबाबासारख्यांचा उदात्तीकरण करतात, त्याच्या पाया पडतात तेव्हा जनसामान्यात कुठला संदेश पोचतो याचा कधी विचार केला जातो का, हा प्रश्न अमोल पालेकरानी लेखात उपस्थित केला होता.
डॉ. दाभोलकरांच्या खुनामागच्या कारणांचा शोध घेताना डॉक्टरांचे प्रतिगामी वृत्ती असलेल्यांच्या बरोबरचे भाडण अहिंसक असले तरी त्यांचे शब्द, विचार व त्या अनुषंगाने केलेले चळवळीतील लढे सत्तेतील राजकारण्यांना व रूढी -परंपरांच्या पाईकांना सतत बोचत असावेत व हा मारा सहन न झाल्यामुळे डॉक्टरांना संपवला असेल, असे त्यांचे मत होते. सैद्धांतिक मतभेद असलेल्या इतर विचारवंतासारखे डॉ. दाभोलकर निष्क्रिय न राहता व केवळ शब्दांच्या मार्यावर विसंबून न राहता प्रत्यक्ष फील्डवर जावून आव्हान देत होते.
दाभोलकर तळागाळात जाऊन कार्य करणारे कायकर्ते होते. म्हणूनच अंनिससारखी संघटना त्यांनी उभी केली व वाढवली. तरीसुद्धा अण्णा हजारे किंवा दिल्लीतील निर्भया गँग रेप प्रकरणाला ज्या प्रकारे करोडोंचा पाठिंबा मिळाला तसा पाठिंबा डॉ. दाभोलकरांना ते हयात असताना मिळाला नाही हे मान्य करायला हवे. कदाचित डॉक्टरांची अंधश्रद्धा विरोधी भूमिका किंवा अमानवी कृत्यांचा निषेध हे समजून घेण्याइतकी वैचारिक प्रगल्भता जनसामान्यात नसावी वा मानसिक जडण घडण झाली नसावी. यासाठी किमान वैचारिक मानसिकतेची गरज असते. श्रद्धेचे अमूर्त स्वरूप हे भ्रष्टाचार किंवा लैंगिक अत्याचारासारखे दृष्य स्वरूपात दिसून येत नसेल हेही त्यामागचे कारण असावे, असे पालेकरांना वाटते. सिद्धीविनायकच्या दर्शनासाठी तास न तास रांगेत उभे राहणार्या तरुण वर्गाची काय मानसिकता असू शकते, हा प्रश्न या संदर्भात पालेकरांनी विचारला होता.
Tehalka या साप्ताहिकात कुमार केतकर यांचा प्रतिक्रियावजा लेख होता. डॉ. दाभोलकरांच्यावरील खुनी हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील पुरोगामित्व व आधुनिकता यांचा बुरखा फाडला जावून या समाजाचे खरे स्वरूप जगासमोर आले अशी केतकरांची तिखट प्रतिक्रिया होती. डॉक्टर, बुवा-बाबा, तांत्रिक मांत्रिक यांच्या शोषणापासून जनसामान्यांना संरक्षण देण्याच्या प्रयतकत होते. एवढेच नव्हे तर स्त्रियावरील पुरुषी जुलमाच्या विरोधातही ते सहभागी होते.
श्रद्धेच्या बुरखा पांघरून पाळल्या जात असलेल्या अंधश्रद्धाबद्धल डॉक्टरांना मनस्वी चीड होती असा उल्लेख डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी Countercurrents.org या ब्लॉगसाठी लिहिलेल्या लेखात केला होता. सानेगुरुजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्यातील उदारवृत्ती त्यांना कधीच टोकाची भूमिका घेऊ देत नव्हती. इतर किरकोळ बुवा बाबांच्या इतकेच आसाराम बापू वा सत्य साईबाबा यांच्या विरोधातही बोलण्यास त्यांना भीती वाटत नव्हती. हिंदू राष्ट्राचे पुरस्कर्ते व संघ परिवार त्यांच्या विरोधात नेहमीच आग ओकत होते.
Indian Express, Indian Today, India times, Hindustan Times या वृत्तपत्रांनीसुद्धा दाभोलकरांच्यावरील हल्ल्याची बातमी वाचकापर्यंत पोचवली होती.
Jonathan DeHart यांनी The Diplomat साठी Indian Anti-Superstition Activist Narendra Dabholkar Killed in Pune हे शीर्षक देवून लेख लिहिला होता. डॉ. दाभोलकरांनी चमत्कांरानाच आव्हान दिले होते. त्यांची संघटना शाळा कॉलेजमधून अंधश्रद्धांच्या विरोधात प्रचार व प्रसार करत होती. अंधश्रद्धा विरोधी कायदा पास करणे हीच त्यांच्यासाठी आदरांजली ठरेल असे त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता.
Skepchick या ब्लॉगसाठी Rebecca Watson हिने Indian Rationalist Narendar Dabholkar Murdered हा मथळा देऊन लिहिलेल्या लेखात अंधश्रद्धा विरोधी कायद्यातील कलमांचा उल्लेख केला होता. अभय वैद्य यानी first post : India साठी लिहिलेल्या Narendra Dabholkar`s battle was against superstition not religion या लेखात पनवेल येथे डॉक्टरांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत विवाह समारंभातील उधळपट्टीविषयी उल्लेख केला होता. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे लाख विवाह सोहळे होत असतात. व त्यामध्ये 45 लाख किलो तांदळाची अक्षतेच्या नावाखाली नासाडी होत असते. अभय वैद्य यांना डॉक्टरांना कुसुमाग्रजांच्या कविता मुखोद्गत असत याचे कौतुक वाटते.
Hindustan Times पत्रिकेने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा फक्त हिदूंधर्मातील अंधश्रद्धांच्या विरोधात असून इतर धर्मातील अनिष्ट रूढी परंपराबद्दल काही बोलत नाही, म्हणून या कायद्याला विरोध आहे या विधानाचा उल्लेख केला होता. Hindustan Times च्या मुंबईच्या वार्ताहरांनी दाभोलकरांच्या हत्येनंतर राज ठाकरे, गोपीनाथ मुंडे याच्या केलेल्या विधानांचा उल्लेख केला होता. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे अंधश्रद्धेच्या विरोधात लढत होते. दाभोलकरांचा विरोध देव धर्माला नव्हता तर समाजातील वाईट प्रथांच्या विरोधात होता असे विधान राज ठाकरे यांनी केले होते.
याच पत्रिकेच्या सत्यजित जोशी या वार्ताहराने दाभोलकरांची तुलना गोपाळ गणेश आगरकर व महादेव गोविंद रानडे यांच्याशी केली होती. Asian Age या पत्रिकेने Antisuperstition activist Narendra shot dead हे शीर्षक देत अंधश्रद्धा विरोधी कायद्याला वारकरी पंथाचा विरोध आहे हा उल्लेख केला होता. The Telegraph साठी जयदीप हर्डीकर यानी लिहिलेल्या Black magic claims blood या लेखात कायद्याच्या विरोधात सनातन संस्था व हिंदू जागरण समिती आहेत असे विधान केले होते. Freethouthtblog साठी लिहिलेल्या PZ Myers च्या Naredra Dabholkar assassinated in India या लेखात अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा आढावा घेतला होता. सत्तेवर असलेले व नसलेले सर्व राजकीय नेते कायदा पास न होण्यास कारणीभूत आहेत असा उल्लेख त्या लेखात होता. गौहर रझा, दिनेश अब्रोल, अमिताभ पांडे, प्रो. इर्फान हबीब, डॉ. सुबोध मोहंती, डॉ. वेंकटेश्वरन, डॉ. सुरजीत सिंग व डॉ. राम पुनियानी इत्यादी विचारवंतानी एक पत्रक काढून वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधाला वेळीच आवर घालायला हवा असा इशारा या निमित्ताने दिला होता. टोकाची असहिष्णुता असलेल्या या गढूळ वातावरणातसुद्धा डॉक्टरांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल या सर्वानी कौतुक केले होते.
Nirmukta या rationalism विषयक ब्लॉगवरसुद्धा डॉ. दाभोलकरांच्या जीवनकार्याचा विस्तृत आढावा घेतला होता. डॉ. केवळ आपल्या संघटनेपुरतेच नव्हते तर मेधा पाटकर, बाबा आमटे, बाबा आढाव आणि बंग पती-पतक्ींच्या कार्यातही त्यांचा कृतीशील सहभाग होता, असा उल्लेख त्यांच्या मृत्युलेखात होता.
FERA चे कार्याध्यक्ष, डॉ. नरेंद्र नायक लेखाची सुरुवात डॉ. दाभोलकरांचा उल्लेख भाऊ करून FERA च्या कार्यातील त्यांच्या सकारात्मक कार्य तत्परतेमुळे FERA वाढली असे प्रशंसोद्गार काढले होते.
International-The News साठी प्रफुल्ल बिडवाई यांनी A martyr to the cause of Reason हा लेख लिहिला होता. दाभोलकरांची हत्या महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतीला मागे नेणारी आहे. त्यांची ही अमानुष हत्या देशाला लांछनास्पद आहे. गेल्या 15 वर्षात भारतात 2500 स्त्रियांची हत्या झाली असून या स्त्रियांना चेटकीण ठरवून केलेल्या त्या हत्या आहेत. शाहू महाराज, ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, रानडे, रमाबाई, व डॉ आंबेडकरांचा वैचारिक वारसा सांगत असताना ही हत्या अत्यंत निंदनीय आहे. या शब्दात त्यांनी आपला खेद व्यक्त केला होता. दाभोलकरांच्या चळवळीमुळे देव धर्मांचा बाजार मांडलेल्यांच्या हितसंबंधांना धक्का बसला व त्यातूनच ही हत्या झाली असावा असे बिडवाईना वाटते.
DNA Pune Edition च्या 5 सप्टेंबर 2013 अंकातील Asaram`s arrest vindicates Narendra Dabholkar या लेखात प्रफुल्ल बिडवाई यांनी आसाराम बापू उघड उघड करत असलेल्या अत्याचारावरील टिप्पणीत डॉ. दाभोलकरांच्या स्मृतींना उजाळा देतात.
Economic & Political Weekly या साप्ताहिकाने Keeper of Maharashtra`s Conscience म्हणून डॉ. दाभोलकरांचा उल्लेख केला होता. दाभोलकरांच्या वक्तृत्वशैलीवर टिप्पणी करताना इतर राजकीय पुढार्याप्रमाणे त्यांच्या भाषणात कधीच नाट्यमय घोषणांची आतिशबाजी नसे. त्यांच्या भाषणाची सुरुवात नेहमीच एखाद्या संताच्या वा कवीच्या अभंग वा कवितेतील ओळीने होत असे व एखाद्या शिक्षकाने घेतलेल्या पाठासारखे संथगतीने देव-धर्मासंबंधी टिप्पणी केली जात असे. असा उल्लेख केला होता.
विज्ञान प्रसार या संस्थेचे डॉ. टी. व्ही वेंकटेश्वरन यानी The Dilemmas and Challenges faced by the Rationlist Indian या निमित्ताने लिहिलेल्या त्यांच्या लेखात विवेकवादासमोर असलेल्या आव्हानांचा एक विस्तृृत आढावा घेतला होता.
आर्य समाजाचे स्वामी अग्निवेश व दिल्लीच्या स्टीफन कॉलेजचे प्रिन्सिपाल वॉल्सन थंपू यानी Times of India मध्ये An age of disbelief : Can men thrive under the garb of religion? हा लेख लिहिला होता. गांधीजींच्या प्रमाणे खर्या ईश्वरास सामोरे जात श्रद्धा अंधश्रद्धांच्या जंजाळातून बाहेर पडणे हीच डॉ. दाभोलकरांसाठी आदरांजली ठरेल असा उल्लेख त्यांनी केला होता.
Cuttlefish या ब्लॉगमध्ये या पूर्वीच दाभोलकरांचा व त्यांच्या कार्याचा परिचय व्हायला हवा होता अशी हळहळ ब्लॉगलेखकानी व्यक्त केली होती. Alter Net या ब्लॉगसाठी लिहिणार्या Greta Christina लासुद्धा दाभोलकरांच्या हत्येनंतरच त्यांच्या कार्याचा परिचय झाला होता. तिने लिहिलेल्या A Martyr of Modern Skepticism : The Assasination of Prominent Atheist Narendra Dabholkar या लेखात भारतासारख्या विविध संस्कृतीच्या व मोठ्या जनसंख्येच्या देशात अशा प्रकारच्या कार्याला वाहून घेणे हीच आश्चर्याची गोष्ट आहे असे नमूद केले होते.
डॉ. दाभोलकरांच्या मृत्युनंतर अनेक पुरोगामी संघ-संस्थानी आपला खेद व्यक्त केला होता. Odisha Rationlist Society चे पीके रथ International Humanist and Ethical Union चे बाबू गोगिनेनी, बिहारच्या Budhiwadi Samaj and Bhdhiwadi Foundation चे रमेंद्र व कवलजीत Tripura Yuktibad Bikas Mancha चे प्रदिप्ता रॉय Shri Lanka Rationalist Association चे श्रीलाल परेरा, विजयवाडा येथील नास्तिक केंद्राचे डॉ. विजयम, IUCAA चे डॉ. नरेंद्र दधीच आणि अरविंद गुप्ता, विज्ञान बोध वाहिनीचे डॉ. मधुकर देशपांडे इत्यादीनी व्यक्तीशः व आपापल्या संस्थेच्या वतीने डॉक्टरांना आदरांजली वाहिली होती. या संघ संस्थेप्रमाणे दिलीप पाडगावकर, कुंदा प्रमिला नीलकंठ, मद्रास क्रिश्चियन कॉलेजचे पी दयानंदन, आय आय टी मद्रासचे व्ही बालकृष्णन, श्रीधर प्रभू, टी गंगाधरन, वसंत शिवलकर, डॉ. इन्नैय्या, स्वाती वैद्य, एम नागेश्वरराव, दुबई येथील केशव शेट रेवणकर, सुषमा सामंत, इंजिनीयर एस मलिक, मिनिसोटा, अमेरिका येथील नाथन बॅटन इत्यादीनी डॉक्टरांच्या मृत्युनतर आपापल्या शब्दात हळहळ व्यक्त केली होती.
इंग्रजी भाषेव्यतिरिक्त इतर युरोपियन व एशियन भाषेतील नियतकालिकांमध्येसुद्धा डॉ. दाभोलकरांच्याबद्दल लेख लिहिले गेले असतील व त्या त्या देशातील लोकापर्यंत डॉक्टरांचे चरित्र व कार्याबद्दलचा माहिती नक्कीच पोचली असेल. यावरून डॉ. दाभोलकर हे फक्त महाराष्ट्राचे वा मराठी भाषिकांचेच कार्यकर्ते नव्हते तर ते एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिचित व्यक्ती होते याबद्दल दुमत नसावे!
- प्रभाकर नानावटी