20 ऑगस्ट, 2013 रोजी डॉक्टरांच्या अखेरच्या दर्शनासाठी सातार्याकडे गाडी धावत होती. अश्रूंना वाट देता देता विचारचक्र सुरू होते. त्यांच्या चितेचे दर्शन घेऊन माझ्या भावनांना वाट करून दिली.
या क्रूर आणि भ्याड घटनेचा तीव्र निषेध करत डॉक्टरांच्या जाण्याचे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. डॉक्टरांसारख्या कुशल आणि प्रतिभावान नेतृत्वामुळेच अंनिस आज एवढी मोठी जनचळवळ झाली आहे. आपल्या सर्वांची स्वत:चे वडीलच गमावल्याची भावना आहे. डॉक्टरांच्या उंचीचे नेतृत्व पुन्हा होणे शक्य नाही. पण सामुहीक नेतृत्वातून एकमेकांना हात आणि आधार देत हा विवेकाला वारसा पुढे नेऊ या. कोणीही खचून न जाता, सैरभैर न होता अंधश्रद्धा निर्मूलनाचे हे काम जोमाने पुढे नेऊ या, हीच डॉक्टरांना खरी आदरांजली ठरेल. असे मी बोललो. पण सर्वांना ते भावले होते. निर्धार घेऊन कार्यकर्ते पांगत होते. जातांना भेटत होते. वेदना जरूर होती पण खचलेले कोणीच नव्हते. संतप्त होते पण हिंसक अजिबात नव्हते. हे चित्र नेतृत्व म्हणून माझ्यासाठी खूपच आश्वासक होते.
डॉक्टरांच्या खुनाची घटना एवढी अकाली आणि अनपेक्षित होती आणि त्यानंतर इतक्या गोष्टी येऊन अक्षरश: आदळत होत्या की, शांतपणे बसून विचार करायला, संघटनेबाबत कामाची दिशा ठरवायला, एकमेकांशी मुक्त संवाद करायला देखील उसंत नव्हती. एकतर या घटनेमुळे महाराष्ट्रच नव्हे देश-विदेशातील सर्व पुरोगामी चळवळी-संस्था संघटनांचे लोक, विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंत प्रचंड अस्वस्थ होते. विशेषकरून देशभरातील सर्व माध्यमांनी हा विषय चांगलाच लावून धरला होता. त्यातून जो माहोल तयार झाला होता त्याची प्रचंड मागणी होती. देशभरातील मराठी-हिंदी-इंग्रजी माध्यमांना लेख हवे होते, कोणाला मुलाखती हव्या होत्या. विविध टी.व्ही. चॅनल्सवाल्यांना चर्चेत सहभाग हवा होता. कोणाला ’बाईट’ हवे होते. समविचारी संस्था-संघटनांकडून चर्चासत्र, मोर्चा, निषेधसभा, परिषदा यासाठी संबोधित करण्यासाठी मागणी होती. परराज्यातून सारखे फोन यायचे. त्यांना अंनिसचे काम सुरू करायचे होते. पहिले दोन-तीन महिने तर या सगळ्या मागणीला कसे पुरे पडावयाचे यात अक्षरश: माझी व दाभोलकर कुटुंबियांची दमछाक होत होती. जमेल तसे प्रत्येक ठिकाणी कामे वाटून घेऊन आम्ही प्रमुख कार्यकर्ते म्हणजे मी, बावगे सर, सुशीलाताई, मिलिंद, संजय बनसोडे, हमीद, मुक्ता, शैलाताई आणि त्या-त्या विभागातील प्रमुख सहकारी-पदाधिकारी सामोरे जात होतो. त्यात दिवसभर सातारला घरी कोणीतरी मोठा राजकिय नेता, पक्षप्रमुख, मंत्री मंडळातील मंत्री, विविध संस्था संघटनांचे मान्यवर पदाधिकारी भेटायला, सांत्वन करायला येत असत. त्यांच्याशी बोलणे, बसणे, चर्चा करणे हे देखील नाही म्हटले तरी काम होतेच. त्यात तपासासंदर्भात पोलिस अधिकार्यांकडून सारखे फोन, भेटीला बोलावणे, माहिती घेणे भरपूर व्हायचे.
हा सर्व परिस्थतीचा रेटा इतका जबरदस्त होता की, शांतपणे वेळ काढून स्वत:शीच बोलायला, विचार करायला होत नव्हते तेव्हा कार्यकर्त्यांशी बोलायची खूप इच्छा असूनही शक्यताच नव्हती. प्रमुख सहकार्यांशी संवाद व्हायचा तो देखील कामे वाटून घेणे, नियोजनच्या सूचना या पलिकडे नाही. पण अशाही परिस्थितीत प्रत्येक ठिकाणचा लहानात लहान कार्यकर्ताही काहीना काही कृती स्थानिक पातळीवर क्षमतेनुसार करीत होता. केलेल्या कामाबद्दल कळवित होता. हेच संघटनेतले जिवंतपण होते.
आम्ही सारे दाभोळकर ही घोषणा सार्थ करीत होता. माणूस मारला-विचार मारता येणार नाही, दाभोळकरांनंतर अं.नि.स चे काम नेटाने सुरूच राहील
या स्वरूपाचा माध्यमांनी लेखक-विचारवंतांनी व्यक्त केलेला विश्वास खरा करत होते. वेळ, पैसा, श्रम, आरोग्याची तमा न बाळगता, कोणतीही तक्रार न करता स्वयंप्रेरणेने विवेकाचा आवाज बुलंद करीत होते. डॉक्टर नेहमी म्हणत, समर्पित भावनेने काम करणारे प्रामाणिक कार्यकर्तेहीच खरी संघटनेची ताकद आहे हे मी शब्दश: अनुभवत होतो. या सर्व कार्यकर्त्यांबद्दल मला अभिमान आणि कृतज्ञताभाव वाटत होता. त्यांच्याशी त्या-त्या ठिकाणी जाऊन बोलावे वाटत होते. पण सवड होत नव्हती.
अक्षरश: महिना-दीड महिना मी घरी देखील गेलो नाही. कधी-कधी, दोन-दोन-चार-चार दिवस कुटुंबियांशी बोलणे, विचारपूस करणे देखील होत नव्हते. पण त्यांनी हे सारे मनापासून स्वीकारलेच आहे. त्यांच्या समंजसपणाची ऊर्जा देखील कामाला बळ देणारी आहे.
पहिल्या महिनाभरातच संघटनेने दोन महत्वाचे निर्धारीत कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडले. पहिला म्हणजे दि. 1 सप्टेंबर 2013 चा सातारा येथील अभिवादन मेळावा.
डॉक्टरांच्या अंत्यदर्शनाला पहिल्या दिवशी येऊ शकले नाहीत असे असंख्य कार्यकर्तेहोते. त्यांना कुटूंबियांना भेटायचे होते, परस्परांना भेटून गळ्यात पडून रडून दु:ख हलके करायचे होते. एकमेकांना आधार आणि विश्वास द्यायचा होता. त्यासाठी अभिवादन मेळावा घेतला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून एक हजारावर कार्यकर्तेआले. सातारा-इस्लामपूरच्या अंनिस व विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रशांत पोतदारने सर्व संयोजन केले. एक हाती निधी जमविला. वार्तापत्र विभागाने अवघ्या 10 दिवसांत अत्यंत संग्रहणीय आणि सर्वस्पर्शी विशेषांक अहोरात्र मेहनतीने तयार करून सर्वांना उपलब्ध करून दिला.
दुसरा म्हणजे जातपंचायतीला मूठयाती अभियाना अंतर्गत जळगांव येथील जातपंचायत विरोधी परिषद दि. 8 सप्टेंबर, 2013. ही परिषद पूर्व नियोजित होती. डॉक्टर असतांनाच त्याच्या तारखा ठरल्या होत्या. कोणत्याही परिस्थितीत परिषद रद्द करायची नाही. डॉक्टरांचे काम पुढे न्यायचे असा आग्रह स्वत: हमीदने यायचे कबूल केले. शैलाताईंना देखील उपस्थित राहण्याची ईच्छा व्यक्त करून आग्रह धरला. पण आम्हीच सर्वांनी नको म्हटले. 500 जणांच्या उपस्थितीत परिषद यशस्वी झाली. जळगांव जिल्हा अनिस सोबत कृष्णा चांदगुडे आणि जळगांव येथील महिला फेडरेशनच्या वासंतीताई दिघे व सहकार्यांनी परिश्रम घेतले.
या सर्वात एक अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे दाभोलकर कुटुंबियांची भूमिका, एवढे प्रचंड दु:ख असूनही सर्वजण शैलाताई, हमीद आणि मुक्ता अत्यंत संतुलीत होते. घटनेनंतरच्या काही तासातच हमीद आणि मुक्ताने टी.व्ही. चॅनलपुढे दिलेल्या प्रतिक्रियेतून त्यांचे विवेकी, संयमी वागणे संपूर्ण जगाने अनुभवले होते. या सर्वांनी सर्वप्रथम माझ्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास दाखवून संघटनेत आम्ही सर्वजण सामान्य कार्यकर्तेम्हणून काम करू अशी जाहीर इच्छा व्यक्त केली. हा खरेतर त्या सर्वांच्या मनाचा मोठेपणा होता. डॉक्टर असतांना त्यांना संघटनेत सक्रियपणे काम करता आले नव्हते. पण ते कुटुंब सांभाळत म्हणूनच डॉक्टर एवढी संघटना उभी करू शकले. आता डॉक्टरांनंतर हे आमचेदेखील काम आहे आणि आम्ही त्यात सक्रियपणे यथाशक्ती सहभागी होऊन काम करू. एवढी नम्र भूमिका घेऊन हे तीनही जण जणू पूर्णवेळ कार्यकर्ता असल्यासारखे काम करीत आहेत. त्यामुळे मला मोठाच आधार आणि पाठबळ मिळाले आहे.
दर 20 तारखेला खुनाच्या तपासाला गती मिळावी आणि अद्याप खुनी सापडले नाहीत म्हणून राज्यपातळीवर आणि स्थानिक ठिकाणी कार्यक्रम होत होते. कधी धारातिर्थी आंदोलन, कधी धरणे, कधी मोर्चा वगैरे यात 2 डिसेंबर, 2013 ला मुंबईत अंनिसच्या पुढाकाराने विविध संस्था संघटनांच्या सहभागाने भव्य मोर्चा निघाला. असे अनेक लहान-मोठे कार्यक्रम राज्यभर घडत होते. कार्यकर्तेच जबाबदारी घेऊन सर्व पार पाडत होते एखाद-दुसरी गरजेनुसार पूर्वतयारीची भेट, फोनसंपर्क आणि काही सूचना, वक्त्यांची उपलब्धता करून देणे एवढेच काय ते काम मला करावे लागे. पण तरी देखील महाराष्ट्रभर कोठेना कोठे एकाच दिवशी कार्यक्रम होत होते. त्यामुळे प्रत्येकाशी थोडे-थोडे शेअर करण्यात देखील दिवस संपून जाई.
डॉक्टरांच्या जाण्यानंतर जाणवलेली ही फार महत्वाची बाब आहे की, आता डॉक्टर नाहीत, त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. आणि मला जाणिवपूर्वक काम केलेच पाहिजे अशा कर्तव्यबुद्धीने कार्यकर्तेकाम करीत होते. विशेष म्हणजे पूर्वी थांबलेले, शैथिल्य आलेले अनेक कार्यकर्तेदेखील या घटनेनंतर पुन्हा सक्रिय झालेत यात अनेक समविचारी संस्था हिरीरीने मदत करीत होत्या. यातून एक कृतीशील, उपक्रमशील संघटना ही समितीची ओळख अधोरेखीत होत होती. हे सर्व सुरू असतांना धक्क्यातून हळूहळू बाहेर पडत होतो. कामाच्या रेट्याची सवय झाली होती त्यातूनही वेळ काढून विचार करू लागलो. सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे डॉक्टरांच्या खुनानंतर लगेचच जनमताचा आणि माध्यमांचा दबाव लक्षात घेऊन शासनाने कायद्याचा वटहुकूम काढला होता. येत्या अधिवेशनात या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर होणे गरजेचे होते. अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती होती आव्हान होते त्यासाठी वातावरण ढवळून काढण्याचे. त्यासाठी राज्यभरातील जवळपास प्रत्येक जिल्हात सह्यांची मोहीम संकल्प परिषदा संयोजित झाल्या. प्रमुख कार्यकर्ते कुटूंबीय यांच्यासह मी असे आमच्यापैकी कोणीतरी उपस्थित राहीलो. यासाठी अधिवेशनापूर्वी मुंबईत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, मुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांच्या उपस्थितीत एक दिवसीय परिषदही संयोजित केली. कायद्याच्या सचित्रपुस्तिका काढून त्या संकल्प यात्रेतून लोकांपर्यंत पोहोचवल्या. जळगांव जिल्ह्यात चाळीसगांवच्या कार्यकर्त्यांनी 15 दिवस सायकल फेरीतून कायद्याचे प्रबोधन करत जिल्हा पिंजून काढला.
दुसर्या बाजूला डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प.श्यामसुंदर सोन्नुर महाराज आणि वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी वारकर्यांच्या विविध गटांशी बोलून कायद्याबाबतचे सत्य व विपर्यास समजावून सांगितले.
यासोबत आव्हान होते राजकीय डावपेचातून मार्ग काढण्याचे, प्रामाणिक विरोधकांशी संवाद करून गैरसमज दूर करण्याचे, ढोंगी विरोधकांचा बुरखा फाडण्याचे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरून कायद्याला समर्थन मिळविण्याचे. अधिवेशन काळाआधी शासनकर्त्यांना भेटीगाठी घेऊन त्यांची राजकीय इच्छाशक्ती जागृत करणे, प्रत्यक्ष अधिवेशन काळात तेथील किल्ला लढविण्याची स्ट्रॅटेजी ठरविणे, दररोजच्या घडामोडींवर लक्ष ठेऊन प्रसंगावधानाने निर्णय घेणे हे ही खूप महत्वाचे होते.
या सर्वांचे अत्यंत सुक्ष्म नियोजन आम्ही केले. डॉक्टरांसोबत अनेक वर्षे मंत्रालयात विधानभवनात जात होतो. त्यामुळे जवळपास सर्वांशी माझा व्यक्तिगत परिचय होता. संबंधीत मंत्री, त्यांचे पी.ए., त्याखात्याचे सेक्रेटरी हे देखील फर्स्ट हॅन्ड मला ओळखत होते. कोण-कोठले आमदार, कोणाकडे कोणाचा उपयोग होईल, कोणाकडे-सामाजिक क्षेत्रातील कोणत्या मान्यवरांचा प्रभाव पडेल याची व्यवस्थित जाण मला होती. ते सर्व डॉक्टरांच्या सोबत राहूनच व्यवस्थित जमले होते. पूर्वी याकामी मी डॉक्टरांनाही मदत करीत होतो. त्याचा खूप फायदा झाला. अशा परिस्थितीतही कोण प्रामाणिक मदत करणारा, कोण आपला, कोण परका, कोण बोलबच्चन, कोण श्रेय घेणारा, कोण खोडा घालणारा याबाबतची पक्की समज होती. कायदा दोन्ही सभागृहात मंजूर करून घेण्याच्या कामात ते सारे उपयोगात आले.
काही बदल करून एकदाचा कायदा झाला. सत्ताधारी, विरोधी पक्ष, प्रशासन, मित्र संघटना, माध्यमे यातील अनेकांची प्रामाणिक मदत, समर्थन मिळविण्यात आम्ही यशस्वी झालो त्यामुळेच कायदा अस्तित्वात आला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रत्येक दिवस आम्ही युद्धभूमीवर असल्यासारखे लढवत होतो. बर्याचदा पुढचे पाऊल पडण्याची अनुभूती असायची; तर काहीवेळा पदरी निराशाही यायची. सर्वोदय केंद्रातील नागपूरमधील सहकार्यांनी केलेल्या व्यवस्थेत दररोज रात्री आढावा व नियोजन बैठक घेण्याच्या शिस्तीमुळे सहभागी कार्यकर्त्यांमध्ये संघटित कार्याचा आत्मविश्वास निर्माण करायला मदत झाली. अनेक प्रकारचे विरोध असतांनाही विधानसभेत 13 डिसेंबरला आणि विधान परिषदेत 18 डिसेंबरला बहुमताने कायदा पारित केला गेला. मुख्यमंत्री, ना.पृथ्वीराज चव्हाणांच्या खंबीर भूमिकेमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे आणि संसदीय कामकाज मंत्री ना. हर्षवर्धन पाटीलांच्या पुढाकारामुळे हे शक्य होऊ शकले. सामाजिक न्यायमंत्री ना. शिवाजीराव मोघे आणि सभापती शिवाजीराव देशमुख, अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व उपसभापती प्रा. वसंत पुरके यांचेही सहकार्य महत्त्वपूर्ण राहिले.
त्या दिवशी मंडपात असलेले आम्ही पुन्हा एकदा खूप रडलो. कारण आज डॉक्टर आमच्यात नव्हते. गड आला पण सिंह गेला होता.
मधल्या काळात सप्टेंबरमध्ये एकदा मी, अनिश पटवर्धन, मुक्ता आणि संजय बनसोडे दिल्लीत जाऊन आलो. तीन प्रमुख मुद्दे होते. डॉक्टरांच्या मारेकर्यांच्या शोधाबाबत पाठपुरावा, डॉक्टरांच्या निधनानंतर देश पातळीवर हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता ती संधी कॅश करून देश पातळीवर कायद्यासाठी काही करता येते का त्याची चाचपणी, आणि विविध राजकीय, सामाजिक, माध्यमातील मान्यवरांशी भेटी-गाठी झाल्या होत्या.
दौरा अत्यंत यशस्वी झाला. स्थानिक व्यवस्था खासदार हुसेनभाई दलवाईंनी केली. माध्यमांचे प्रतिनिधी दिवसभर आम्हाला फॉलो करीत. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाच्या पक्ष प्रमुखांच्या भेटी झाल्या. महाराष्ट्रातील कायद्याबाबत सर्वांची अनुकूलता लाभली. सर्व डाव्या पक्षांच्या प्रमुखांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, संघटनेबद्दल सर्व अपडेट्स पोहचविले.
महत्वाचे म्हणजे दिल्ली सायन्स सेंटर आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ऐनवेळी आवर्जून आमचे भाषण ठेवले. जगातील सर्व रॅशनल चळवळी देवा-धर्माला फुली मारूनच पुढे जातात. मात्र देवा-धर्माबाबतची संविधानाच्या चौकटीतील तटस्थेची भूमिका घेऊनही एवढी मोठी संघटना जवळपास पंचवीस वर्षे चालते आहे याचे प्रचंड अप्रूप आणि कुतुहल सर्वांमध्ये दिसून आले. कायदा अस्तित्वात आल्यानंतर अनेक गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले त्यामुळे या कायद्याची उपयुक्तता, अंमलबजावणी आणी प्रबोधन यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी दोन टप्प्यात प्रबोधन याला काढली. प्रशांत पोतदार याने केलेल्या समन्वय संयोजनामुळे आणि भगवान रणदिवे यांनी पूर्ण वेळ दिल्यामुळे यात्रेने कायदा गावोगावी पोहोचवला.
एवढे सर्व एकापाठोपाठ एक अशा क्रमाने अविरतपणे सुरू होते. संघटनेच्या निर्णय प्रक्रियेसाठी आणि सर्वांनी एकदा भेटून कामाची दिशा ठरविण्यासाठी माळीनगर (सोलापूर) येथे तीन दिवसांची विस्तारीत राज्यकार्यकरिणी घेण्यात आली. डॉक्टरांनतरची ही पहिलीच राज्यकारिणी पण सर्वांच्या सहकार्याने-सहभागाने कार्यकारिणी बैठक पूर्णत: यशस्वी झाली. चर्चा, निर्णयप्रक्रिया पूर्वी एवढ्याच दर्जेदार झाल्या. याआधी पुणे आणि मुंबईत राज्यकार्यकारिणी बैठका झाल्या पण त्याला जोडून कार्यक्रम होते. विस्तारित राज्यकार्यकारिणीमुळे जिल्ह्याच्या पदाधिकार्यांशी थेट बोलता आले.
आता 9 ऑगस्टला संघटनेच्या स्थापनेला 25 वर्षेपूर्ण होत आहेत. पण डॉक्टरांच्या बलीदानाच्या वेदनेची किनार रौप्यपूर्तीला आहे म्हणून सर्व शाखांवर कार्यकर्ता कुटूंब संकल्प मेळावे निश्चित केले आहेत. काही पोस्टर्स, स्टिकर्स प्रचार साहित्य आणि सर्वांना दाखविण्यासाठी सी.डी. वितरीत करीत आहोत.
20 ऑगस्ट, 2014 ला डॉक्टरांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त पुण्यात महर्षी वि.रा.शिंदे पुलावर घटनास्थळी सकाळी चळवळीची गाणी, तेथून सर्व समविचारींसह मोर्चा, जाहिर सभा आणि दुपारी अतुल पेठेंनी परीश्रमपूर्वक तयार केलेल्या महाराष्ट्र अ.निं.स लोकरंग मंचाच्या रिंगण नाट्यांच्या पथकांचे सलग सादरीकरण असे कार्यक्रम निश्चित केले आहेत.
जवळपास हे सगळे वर्ष असे धावपळीते गेलं. कायदा होईपर्यंत तर खूपच ओढाताण होत होती. काही विचार करणेही शक्य होत नव्हते. या सर्व धबडग्यात देखील अनेक आव्हानं होती. काही मनाच्या अंतर्गत होती काही संघटनेत होती. काही संघटनेबाहेरील होती.
तसे राज्य कार्याध्यक्ष हे संघटनेतील सर्वोच्च पद डॉक्टरांनीच माझ्याकडे 4 वर्षांपूर्वी हस्तांतरीत केले होते त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या नेतृत्वाच्या भूमिकेत मी होतोच. पण डॉक्टर संघटनेत पूर्वी एवढेच सक्रिय होते. त्यामुळे मला सर्व जबाबदारी झेपण्याचे आव्हान होते.
नाही म्हटले तरी डॉक्टरांसोबत तुलना केली जाणे स्वाभाविक होती. डॉक्टरांच्या एवढे प्रगल्भ, बहुआयामी आणि संघटन कुशल नेतृत्त्व अं.नि.स. मध्येच काय पण कोणत्याही संस्था- संघटनेत तयार होणे ही तशी अत्यंत विरळ गोष्ट. कोणी एक व्यक्ती ही जागा घेऊ शकणार नाही हे खरेच. पण तरी देखील प्रत्येक वेळी काम करतांना अंतर्मनाच्या पातळीवर तसा दबाव असतो की, काम डॉक्टरांसारखे झाले पाहिजे आणि दुसर्या बाजूला ही देखील भूमिका असते की, प्रत्येक काम काही झेरॉक्स टाईप नको. डॉक्टरांनी ‘राज्य कार्याध्यक्षपद मी सोडणार’ असे काही मोजक्या कार्यकर्त्यांना कळविल्यानंतर पनवेल येथे झालेल्या बैठकीत हे दुसर्या फळीतील माझ्यासारख्या सर्व सहकार्यांनी मान्यच केले होते की, कोणी एक व्यक्ती नेतृत्त्व म्हणून डॉक्टरांची जागा घेऊ शकणार नाही पण येणार्या काळात एक गट किंवा समुह म्हणून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या क्षमता, गुण आणि कौशल्य मिळून ही जागा सामुहिक नेतृत्त्वातून भरुन काढता येईल. तसा प्रयत्नही कार्यकारी समितीच्या रुपाने मागील चार वर्षे करीत होतो. डॉक्टरांच्या निधनानंतर ही टीम लिडरशील आकार घेऊ लागली आहे. तरी देखील यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये समसमान समज विकसित करणे, प्रत्येकाच्या क्षमता आणि कौशल्यानुसार कामाची संधी, अवकाश आणि जबाबदारी उपलब्ध करून देणे यातूनच समुह नेतृत्त्व खर्या अर्थाने सिद्ध होईल हा मला स्वत:पुढचा एक महत्त्वाचा चॅलेंज वाटतो.
या वर्षभरात विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, विचारवंत, लेखक, संपादक, कलावंत, समविचारी संस्था, संघटना, शास्त्रज्ञ, शिक्षण संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष करून माध्यमांनी खूपच सहकार्य केले आहे. पाठबळ दिले आहे. काही मान्यवरांनी अगदी पालकत्त्वाच्या भूमिकेतून काळजी घेतली आहे. डॉक्टरांच्या बद्दलचे प्रेम, आदर आणि त्यांच्या जाण्यामुळे वाटणारी सहानुभूती यामुळे मिळालेले हे सर्व सहकार्य असेच संघटनेला कायम मिळत राहील यासाठी संघटना सतत कृतीशील, विधायक ठेवणे आणि या सर्व समाजातील सज्जनशक्तीचा हात असाच पाठीशी राहील हे बघणे हा देखील नेतृत्त्व म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. जातपंचायतीला मूठमाती अभियान, मानसमित्र आणि संविधान बांधीलकी महोत्सव यासारखे उपक्रम हे दशकाचे उपक्रम म्हणून आपण निश्चित केले आहेत. कारण येणार्या काळात समाजाची ही गरज राहणार आहे आणि ती पूर्ण करण्याची शासन व अन्य सामाजिक स्तरावर आजतरी कोणतीही व्यवस्था नाही. यासोबतच भारतीय संविधानाला अभिप्रेत सुजाण नागरिकत्व विकसित करण्यासाठीचा एक सूत्रबद्ध, सुनियोजित कार्यक्रम आखणे हा एक महत्त्वाचा दीर्घकालीन कार्यक्रम संघटनेला अधिक जास्त उपयुक्त होऊ शकतो. ज्यातून अधिक मूल्याधिष्ठीत, नीतीमान समाज निर्मितीसाठीचे वातावरण तयार होऊन भारतीय लोकशाही बळकट होऊ शकेल. याबाबत सर्वांच्या सहकार्याने चिंतन करणे मला आवश्यक वाटते. मागील वर्षभरात स्वत:ची वाचन लेखन प्रक्रिया जवळपास थांबली आहे. वेळेचे नीट नियोजन करुन स्वत:चे क्षमता विकसन देखील आवश्यक आहे. मागील काही वर्षात संघटनेत एक डेडलॉक आल्यासारखे वाटत होते. संधी असूनही विस्तार होत नव्हता. डॉक्टर असतांना त्यासाठी नवनविन प्रयोग करत होते. नेहमी याबाबत चर्चा करत होते.
मला वाटते संघटनेची आजची प्रतिमा ही शहरी-मध्यमवर्गीय नोकरदार अशी आहे. त्याला ग्रामीण-कष्टकरी-बहुजनवादी असा चेहरा दिल्यास हा विस्तार शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करणे हे देखील आपल्या पुढे नेतृत्त्व म्हणून एक आव्हान आहे.
येणार्या पुढील काही महिन्यात प्रत्येक शाखेवर जाऊन सामान्य कार्यकर्त्यांसोबत बोलून त्यांना समजून घेत संघटना अधिक मजबूत करणे यातून शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा हा वारसा पुढे नेण्याचा सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न राहील.
शब्दांकन– प्रा. परेश शहा, शिंदखेडा