Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१२
हे तरूणा....
तू तरी टाक अज्ञानरूपी निद्रेला झटकून
अन्यायाचे स्वरूप तू घे समजावून
जे आहेत झोपलेले, निष्क्रिय बसलेले
त्यांना उद्युक्त करण्यास संकोच हे कसले?
केलेस तसे वर्तन तरच तू तरशील
नाहीतर अवनीतीच्या पुरात वाहून तू जाशील
जुन्या रूढीच्या मगरमिठीतून
तू शोध आपला नवा मार्ग
नाहीतर होतील तुझे विलक्षण हाल
अज्ञानी लोकांतून ज्ञाती लोक निर्माण कर
अन् दुबळ्यांचाही सशक्त समाज होऊ दे तयार
होऊ दे त्यांना जगातील खर्‍या आनंदाची ओळख
दूर कर तू त्यांचा रोजचा अपमानाचा काळोख
फेकून दे आता स्वत:तला न्यूनगंड
मग अन्यायी लोकांनाही होईल पश्चात्ताप अखंड
रूढी, परंपरा हे सोडून दे संकुचित विचार

दाखव भावी पिढीला उन्नतीचा मार्ग....

- नवनाथ चौगुले, पंढरपूर, जि.सोलापूर

दगड कोरता आकार येतो
अदृश्य देव दृष्टीस पडतो
अद़ृश्य भावनांचा बांध फुटतो
            बघता बघता कळस चढतो
            आजूबाजू खांब आकार घेतो
            सजावट पताका तोरण दारी
            सांज सकाळी दिवा लागतो
येता संकट धाव घेतो
अंतरी इच्छा प्रकट करतो
मनी पूर्णत्वाचा भास होता
नवस फेडण्या विचार करतो
‘म्हणे’ नवसाला हा दगड पावतो
प्रचार चोही दिशा गाजतो
चारही दिशेने भक्तांचे लोंढे
अकाली नवसाला पूर येतो
            इच्छेनुसार प्रसाद चढतो
            खाटीक तेथे सज्ज असतो
            मुक्या जीवांना ठाऊक कुठे
            चढणार त्यांचा बळी असतो
म्हणत याला जीवन ऐसे नाव
प्रथा चालते पायंडा पडतो
श्रद्धा अंध की डोळस
गहन प्रश्नच बळी पडतो

- राजन लाखे, पुणे

हे धर्म कसले...             दांभिकतेचे नगारे
ढोल वाजविती फुकाचे...       माणूस इथे कुठे!

हे आचार्य कसले...           बुरखे अध्यात्माचे
आचारी तरी भले...           जेवू घालिती

पताका, झेंडे, देवळे...        म्हणजे का धर्म असतो!
माणूस नाही जिथे...           तिथे का धर्म असतो?

पूजा-पाठ अर्चा...            भरल्या पोटी सुचती
अर्धपोटी माणसे, नागडी पोरं...  अन्नान्न फिरती

अरे, काय सांगता राव,...      संस्कृतीच्या गप्पा
इथल्या श्रुती-स्मृतींनी,...        पेरला माणसा-माणसांत कप्पा

आम्ही सोडली कधीच...        देव-देवळे आता
धर्म तुमचे लखलाभ तुम्हा...     निघालो आम्ही मंगळावरी!

- प्राचार्य सीतामाराम गोसावी

नेणत्या वयात मला.
मुरळी सोडली गंऽऽऽ
खोप माझ्या जिंदगीची, कुणी बया मोडलीगं?

सकाळंच होतं उन,
त्यात भंडार पिवळा
माझ्या चंदनी देहाला
कुणी धुंडीतो राऊळा?
कुण्या रांगड्या पणानं, कळी बया खुडली गं

मधी दगडी काळीज
बाजू म्हाळसा-बाणाई
माझ्या सहीत गं त्याला
कशी लागं माझी माझी माई?
घाटी-दिमडीच्या नादं जिंदगी मी फेडली गं

भर ज्वानीच्या मध्यान्ही
टंच देह थरारला
माझ्या देहीच्या शिवारी
कुणी जोंधला पेरला?
भरजरी पैठणीची घडी, कुणी मोडली गं

नको तोंड दावू तुझं
कशी येऊ मी गडाला?
गावखुरी बोराटीनं
माझा शिवार फाडला
देहाची ह्या झाली मोळी, तडातड तोडली गं

शाना माझा सूर्याबाळ
त्याला शाळंला धाडील
मोठ्यापणी बाळ माझा
पांग मायेचं फेडील
आता भोग-भंडाराची, गाठ मीच सोडली गं

“कसं करू रे मास्तरा”
शाळंमधी कसं ठेवू?
सांग तुझ्या दप्तराला
नाव कुणाचं मी घेऊ?
कोणकोणत्या द्वाडांनी, पाटी माझी फोडली गं

आता झाली सवसांज
कोण दाखविल दिवा?
अग बया दारामंधी
माझ्या भिमाईचा भीवा!
बोट धरून बाळाचं वेस त्यानं फोडली गं.

-आनंद त्रिभुवन, बेलापूर(बदगी), जि.नगर
जगतात अधांतरी
पाहतात सरासरी
ग्रहस्थिती

संकटकाळी
मांडतात कुंडली
थांबतात होईपर्यंत
परिस्थिती अनुकूल
पण पडतात फासे
....प्रतिकूल

लोक जगतात
नक्षत्रांच्या भरवश्यावर
मोजतात पत्रिकेतले
गुणावगुण
कर्ज काढून
वाढवतात ऋण

लोक जगतात
आशेवर
चढतात पायरी
ज्योतिषाची
वहातात काळजी
भविष्याची

लोक जगतात
भीत भीत
शनीला, मंगळाला
राहूकेतूला
महादशेला
साडेसातीला

-मुबारक शेख, सोलापूर

उत्साह पोळ्याचा होता घराघरात।
गोडधोडाने सुस्तावलेले पडले होते घोरत॥
            मध्यरात्री अनेकांचे मोबाईल खणाणले।
            चमत्कारिक बातमीने धाबे त्यांचे दणाणले॥
भीतीदायक संदेश फोनवर आला।
अफवांचा बाजार गरम झाला॥
            कुठे देवी रडत होती डोळ्यातून अश्रू आले।
            कुठे मूर्ती खोल गेली, तोंड तिचे काळे झाले॥
कुठे व्हायरस पसरला तोंडातून रक्त आले।
कुठे धरणीकंप झाला काही झोपेतच मेले॥
            विपरित घडल्याच्या धडकल्या वार्ता।
            मेढीतल्या विषानं दगावला कर्ता॥
चमत्कार एकमेकांना सांगत सारे सुटले।
चोहीकडे अफवांचे पेवच पेव फुटले॥
            प्रत्येक आपल्या अकलेचे तारे होते तोडत।
            अफवांच्या वाकळीला ठिगळ होते जोडत॥
हितचिंतक सांगत होते-कोप देवीचा होणार आहे।
जागणारे वाचणार अन् झोपलेले मरणार आहे॥
            मंदिरात सुरू झाले होमहवन पूजन।
            कुठे आरत्या-प्रार्थना कुठे रातभर भजन॥
मरणाच्या भीतीनं भयभीत झाले।
जथ्येच्या जथे घराबाहेर आले॥
            चिमुरड्यानाही जागण्यास भाग त्यांनी पाडले।
            जीवाच्या आकांताने घराबाहेर काढले॥
‘जागते रहो’चे नारे चोहीकडे गाजले।
सानथोर बाया बापडे रातभर जागले॥
            साथीच्या मानसिक रोगात अडकून फसले।
            एकच एक विषय सारे चघळत बसले॥
बिनधास्त झोपले तेच खरे जागे होते।
रातभर जागणारे कित्येक पिढ्या मागे होते॥
            अंधश्रद्धाळूंचे झाले भयानक हाल।
            मोबाईल कंपन्या झाल्या मालामाल॥
चिकित्सेअभावी हा झाला होता ड्रामा।
दुसर्‍या दिवशी कळले आपला झाला होता ‘मामा’॥

-प्रा.रमेश वरघट, कामरगाव, जि.वाशिम