स्वातंत्र्य मिळून काही वर्षेच झाली होती. गावोगावी नळ पाणी योजना अजून झाल्या नव्हत्या. प्रत्येक गावात एक सार्वजनिक विहीर असे, त्यावर सर्वजण पाणी भरत असत. आताच्या पिढीतील युवकांना खरे वाटणार नाही, पण या विहिरीचे पाणी भरण्यास अस्पृश्यांना कडक मनाई असे आणि ती कठोरपणे पाळली जाई. अस्पृश्य भगिनी आपली घागर(बहुधा मातीची) घेऊन लांब उभ्या रहात आणि कोणी सहृदय महिला आपल्याला घागरभर पाणी देईल का याची वाट पहात त्यांच्या मिनत्या करत रहात. काही गावात अस्पृश्यांचेकरता स्वतंत्र विहीर असे.
डॉ.बाबा आढाव यांनी या अन्याय प्रथेविरूद्ध चळवळ उभारली. चळवळीचे नाव ‘एक गाव-एक पाणवठा’. भेदाभेद न मानता सर्व नागरिकांनी एका विहिरीवर पाणी भरावे ही साधी मागणी. पण त्यालाही विरोध झालाच. काही प्रगतीशील गावांनी या उपक्रमाला लगेच मान्यता दिली, पण अनेक सनातनी हटून बसले. ‘आता पंचायतीत, असेंब्लीत, हॉटेलात, एस.टी.त आम्ही मानतो का शिवाशिव? पण हे एक पाणवठा म्हणजे लैच झाले. अख्खा गाव बाटणार नाही व्हय?’ असा त्यांचा युक्तीवाद असे.
मला त्यावेळी खरोखर वाटले होते की हिंदू धर्मावर असणारा हा अस्पृश्यतेचा कलंक धुऊन काढण्याची केवढी मोठी संधी स्वत:ला हिंदू धर्माचे तारणहार समजणार्या संघटनांना लाभली आहे. त्यांनी गावोगाव जाऊन बाबांच्या चळवळीला पाठींबा द्यावा. पण असे करण्याची आणि त्या निमित्ताने आपले कार्य खेड्यापाड्यापर्यंत पोचवण्याची मोठी संधीही या लोकांनी गमावली. कारण बाबा आणि त्यांच्या समाजवादी विचारांनाच हे लोक अस्पृश्य मानत असत. एका संघ कार्यकर्त्याला मी याबाबत विचारले सुद्धा. तो म्हणाला ‘संघस्थानावर आम्ही अस्पृश्यताच काय जातीभेदही मानत नाही. अन्य ठिकाणी तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि त्याहीपेक्षा आमचे म्हणणे असे की, उगाच आपल्याच धर्मियांच्यात वाद कशाला उकरून काढायचे?’
म्हणजे दोन भिन्न धर्मात वादच काय दंगली, रक्तपात झाले तरी चालतील, पण आपल्या धर्मियात वाद होऊ नयेत म्हणून काहींनी पिढ्यान् पिढ्या अन्याय सहन करत रहायचे? खासा न्याय!
याही पूर्वी काही वर्षे, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरूजींनी उपोषण सुरू केले. बडवे मंडळींनी या मागणीला कडाडून विरोध तर केलाच पण गुरूजी रात्री चोरून जेवतात असला अश्लाघ्य प्रचारही त्यांनी आरंभला. एका बडव्याने अस्पृश्यांना प्रवेश देऊ नये या मागणीसाठी प्रति उपोषण सुरू केले. मला वाटले होते की, आता गुरू गोळवलकर, सर्व शंकराचार्य, हिंदू महासभेचे नेते, हे पंढरपूरला धावून जाणार, बडवे लोकांची समजूत काढणार आणि गुरूजींच्या सारख्या एका सज्जन हिंदूचे प्राण वाचवणार. पण कसचे काय? यातील कोणीही तिकडे फिरकले सुद्धा नाहीत. सज्जन झाला तरी तो काँग्रेसवाला! सनातन हिंदू धर्मात ढवळाढवळ करू पाहणारा माणूस मेलेलाच बरा.
तुम्ही म्हणाल, या पुराण्या गोष्टी झाल्या; आताचे काय ते बोला. बोलतो. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील मिनाक्षीपुरम् या गावी सवर्ण गावकर्यांचेकडून होणार्या अपमानास्पद वर्तनाला कंटाळून काही दलित हिंदूंनी इस्लाम धर्म स्वीकारला. झाले. तमाम सनातन हिंदू मंडळींचा प्रचंड संताप झाला. सार्या देशभर हिंदू जनजागृती अभियान पेटवण्यात आले. पुण्यात तर या विषयावर सभा चालू असताना दोन मुस्लीम मालकांची हॉटेलही पेटवण्यात आली. पण कोणीही संघवाला, जनसंघवाला, विश्व हिंदूवाला, मीनाक्षीपुरमच्या सवर्णांची समजूत घालायला वा अस्पृश्यांची माफी मागायला गेला नाही. मग लकी रेस्टॉरंट आणि कॅफे सनराईझच्या मालकांची माफी मागणे दूरच. हां, तुम्ही पुन्हा हिंदू व्हा, तुम्हाला म्हणाल तेवढे पैसे देतो अशा ऑफर्स धर्मांतरित दलितांना देण्यात आल्या. पण हे लोक बधले नाहीत. त्यांना पैसे नको होते, आत्मसन्मान हवा होता. तो दिला तर सनातन हिंदू धर्म मेलाच की!
यानंतर काही वर्षांची गोष्ट. राजस्थानात रूपकंवर नावाची एक स्त्री सती गेली. सर्व सहृदय समाज हळहळला. पण त्यानंतर असलेल्या बातम्या जास्त भयानक होत्या. ती महिला सती जात असताना शेकडो लोक तिथे उपस्थित होते. पण एकानेही या प्रकाराला विरोध केला नाही. उलट आपल्या कुटुंबाचे आणि गावाचे महत्व वाढेल या आशेने उपस्थित सर्वांचा या अघोरी प्रकाराला छुपा पाठींबाच होता. सर्व देशभर उसळलेला क्षोभ लक्षात घेता शासनाने या गावात माध्यमे आणि अन्य जिज्ञासूंना प्रवेश बंदी घातली आणि तिथे जमाव बंदी पुकारली. तरीही 13 व्या दिवशी या गावातील आणि आसपासच्या गावातील तरूणांनी पिवळी वस्त्रे नेसून नंग्या तलवारी नाचवत या ठिकाणी सतीस्थलाची पूजा आणि स्थापना केली. हिंदू धर्म परंपरा राखण्यापायी झालेल्या या मनुष्य वधाची सर्व हिंदुत्वनिष्ठांना खरे तर शरम वाटायला पाहिजे होती. तसे त्यांनी लोकलज्जेस्तव सुयोग्य आवाज काढले, पण परिवारातील अनेक वृत्तपत्रांनी ‘झाली गोष्ट वाईट झाली, पण नवर्यावरील निस्सीम प्रेमापायी असे पराकोटीचे पाऊल या महिलेने उचलले याबद्दल तिचा निषेध कसला करता, अभिनंदन करा’, असे अग्रलेख लिहिले होते. पुरीच्या शंकराचार्यांनी तर जाहीर सभेत या स्त्रीचे कौतुक करून उपस्थित महिलांना ‘तुम्हाला तुमची मुलगी रूपकंवर झालेली आवडेल की सिनेमात नाचणारी नटी?’ असा पूर्णपणे असंबद्ध प्रश्न विचारला होता, आणि महिलांनीही आवाज उंचावून ‘रूपकंवर’ असा पुकारा केला होता.
खरे तर असल्या कालबाह्य, अमानुष आणि अत्यंत अन्यायी प्रथांचेबद्दल जनप्रबोधन करण्याची केवढी संधी हिंदुत्वनिष्ठ परिवाराला या वेळी होती. त्यांनी त्या गावाला भेट दिली असती, लोकांची सभा घेऊन त्यांना या रूढीमधली निरर्थकता आणि क्रौर्य समाजवून सांगितले असते, तर हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी आणि प्रथा नष्ट व्हाव्यात असे त्यांना खरोखर वाटते आहे अशी सर्वांची खात्री पटली असती. पण खरी गोष्ट अशी आहे की, कुठल्याही धर्मनिष्ठ गटाला वा राजकीय पक्षाला समाज रूढीप्रिय आणि अंधश्रद्धाळू असणेच फायद्याचे असते. नव्हे तसे ते रहावेत असा त्यांचा जाणूबुजून प्रयत्न चालू असतो. कर्नाटक राज्याच्या भाजपा शासनाने नुकतेच पाऊस पडावा म्हणून तिथल्या देवळातून वरूणदेवाची प्रार्थना करण्यासाठी 72 कोटी रूपयांची खिरापत वाटली हा त्याचा अगदी आजच्या जमान्यातला ढळढळीत पुरावा.
हिंदू समाजातील अनिष्ट रूढी आणि परंपरांबद्दल जनजागृती करून त्या नष्ट व्हाव्या यासाठी समाजातील पुरोगामी विचाराचे अनेक नागरिक आणि संस्था प्रयत्न करीत असतात. कर्नाटक आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी असणारी मुलीला जट आली की तिला देवाला वाहण्याची प्रथा, ‘देवदासी’ या सोज्वळ नावाखाली मुलींना वेश्याव्यवसायाला लावण्याची प्रथा, कर्नाटकात एका गावी असणारी नग्नावस्थेत स्त्रियांनी देवाला अभिषेक आणि पूजा करण्याची प्रथा या हटवण्यासाठी प्रसंगी समाजाला रोष पत्करून जे अथक प्रयत्न झाले त्यात किती आर.एस.एस. वा विश्व हिंदू वा हिंदू महासभावाले सहभागी होते? एकही नव्हता.
सध्या कुपोषित बालकांचा प्रश्न ऐरणीवर आहे. कुपोषण वाईटच आणि ते दूर करण्याकरता सर्व प्रयत्न केले पाहिजेत यात वादच नाही. पण केवळ कुपोषित बालकांना प्रथिनयुक्त आहार देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्याकरता त्याच्या मूळ कारणाकडे लक्ष द्यायला हवे आणि ते आहे अद्यापही भारतात सर्वत्र होणारे बालविवाह. आधी आपल्याकडे- विशेषत: गरीब घरात- मुलीच्या आरोग्याकडे आणि पोषणाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. त्यातून 13-14 व्या वर्षी तिचे लग्न झाले आणि 14-15 व्या वर्षी तिला मूल झाले तर ते गुटगुटीत निपजणे कसे शक्य आहे? तुम्ही म्हणाल, ‘हे बालविवाह वगैरे आता इतिहासजमा झाले; आदिवासी टोळ्यात वगैरे होत असतील असे थोडे विवाह.’ तर त्याचा अर्थ तुम्ही सदाशिव-नारायण-शनिवार पेठांच्या बाहेरचे जग पाहिलेले नाही. नुकतीच ‘वीक’ या साप्ताहिकाने या विषयावर मुखपृष्ठ कथा केली. त्यानुसार, जगातील अल्पवयीन वधूपैकी 40 टक्के भारतातील असतात; आणि भारतातील 25 टक्के विवाह बालवधूंचे होतात. आणि हे आकडे आहेत 1992 ते 2008 या काळात विवाह झालेल्या मुलींचे. यावर तुम्हाला वाटेल, हे प्रकार चालत असतील बिहार, राजस्थान अशा ‘बिमारू’ राज्यात. तिथे ते सर्रास चालतातच पण अगदी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा प्रगत राज्यातही हे प्रमाण चिंताजनक आहे.
युनिसेफच्या 2011 च्या बालकल्याण अहवालानुसार बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातील काही प्रदेशात बालविवाह हा अजूनही नित्याचाच प्रकार आहे. तर राजस्थानातील 82 टक्के मुलींचा विवाह 18 वर्षेपूर्ण होण्याआधीच होतो. राजस्थानात काही वर्षे भाजपाचे राज्य होते. त्यांनी या विषयी काही जनजागृती वा प्रतिबंधक उपाय केले काय? शून्य भोपळा! उलट मान्यवर घराण्यातील अशा विवाहाकरता या पक्षाचे केंद्रीय नेते दिल्लीहून येत असत.
वास्तविक हिंदू समाजाचे भले व्हावे असे मनापासून वाटत असेल तर या संघ, परिषद वा सभांनी, मोठी चळवळ उभारून काही वर्षांत स्त्रियांचेवर अन्याय करणारी आणि कुपोषित बालकांचे करता कोट्यावधी रूपये खर्च करायला भाग पाडणारी ही बालविवाहाची अमानुष रूढी नष्ट करावयास हवी. निदान हिंदू बलवान व्हावेत म्हणून तरी करावयास हवी. खरे तर या रूढीस अमानुष वा पाशवी म्हणणेही चूक आहे. कारण कोणीही पशू नर मादी वयात आल्याशिवाय एकत्र येत नाहीत.
सध्या प्रचलित असणारा आणखी एक ज्वलंत सामाजिक प्रश्न म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. यात हिंदू 99% असतात. याचे तोटे मी सांगत बसत नाही आणि कारणे तर सर्वज्ञात आहेत. असेच चालू राहिले तर काही वर्षांनी पांडवांचेप्रमाणे पाच भावात एक बायको करून आपल्या महान संस्कृतीचा वारसा जपावा लागेल. पण आधुनिक विज्ञानाचा गैरफायदा घेऊन संपूर्ण समाजाची घडी विस्कटून टाकणार्या या पद्धतीविरूद्ध कोणी हिंदुत्वनिष्ठ संघटनेने आवाज उठवल्याचे मी तरी ऐकलेले नाही.
स्त्रीभ्रूण हत्येला अनेक पापभीरू माणसेसुद्धा तयार होतात याचे कारण मुलीला लग्नात द्यावा लागणारा हुंडा आणि लग्नाचा खर्च. या हुंड्याविरूद्ध कोणी हिंदुप्रेमी संघजन वा जनसंघ उभे राहिले आहेत असे कधी झाले आहे काय?
मुलगा हवाच हा हट्ट खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्र बाळगला जातो. कारण मरते समयी तोंडात पाणी घालायला मुलगा नसेल तर सद्गती मिळत नाही ही अंधश्रद्धा. पण ‘ही पूर्णपणे खुळी समजूत आहे. तुम्ही आयुष्यभर काय चांगल्या वाईट गोष्टी केल्यात त्यावर परमेश्वर तुम्हाला गती देईल. मरताना कोणी पाणी दिले असल्या क्षुल्लक गोष्टीवर नाही’ असे कोणी साधू-संत, शंकराचार्य, संघनेते सांगताना तुम्ही ऐकले आहे का? शक्यच नाही. कारण तसे करायचे म्हणजे ‘पुं नाम नरक: तस्मात त्रायते इति पु:’(पुं नावाचा नरक असतो, त्यापासून तारतो तो पुत्र) या शास्त्र वचनावर अविश्वास दाखवणे होय! पुरातन हिंदू संस्कृती जपणे हे ध्येय असणार्या लोकांनी शास्त्र वचन नाकारणे म्हणजे गहजब होणार नाही काय?
आमच्या लहानपणी विधवा स्त्रियांना ‘गंगा भागीरथी’ म्हणत असत. त्यातल्या बहुतेक सर्वजणी तेजोहीन, तारूण्याचा बहर ओसरलेल्या आणि मरण येईल तर बरे अशी मानसिकता असणार्या असत. भारतातल्या गंगा नदीलाही गंगा भागीरथी म्हणता आणि तिची अवस्थाही आज या दुर्दैवी स्त्रियांसारखीच झालेली आहे, नव्हे ती मृत्यू पावलेलीच आहे, अग्रवाल नावाचे एक 80 वर्षांचे परिसर अभियंते या नदीचे प्रदूषण दूर करण्याकरता शासनाने काहीतरी निश्चित पावले उचलावीत या मागणीकरता तिसर्या वेळी उपोषण करीत आहेत. सुरवातीला स्फटीकाकारखे निर्मळ पाणी असणारी गंगा, कानपुरात आल्यावर, निथल्या 402 नोंदणी केलेल्या आणि अनेक विना नोंदणी कातडी कमावणार्या कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्यामुळे, प्रचंड प्रदुषित होते. या कारखान्यांनी सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रे बसवावीत असा कायदा आहे. मोठ्या कारखान्यांनी ती बसवली आहेत, पण अनेक छोटे कारखाने हे परवडत नाही म्हणून दूषित पाणी खुशाल नदीत सोडत असतात. गंगेच्या काठावर 30 शहरे, 80 गावे आणि हजारो खेडी आहेत, त्या सर्वांचे मैला मिश्रित पाणी गंगेत जात असते. वाराणसीमध्ये गंगेच्या पाण्यातील मानवी मैल्यातील कोलीफोर्म जंतूंची पातळी 100 मिली पाण्यात एक लाख जंतू एवढी म्हणजे जागतिक उच्चांक आहे. साहजिकच पाण्यावाटे पसरणारे कावीळ, टायफॉईड, कॉलरा, डिसेंट्री, गॅस्ट्रो असे रोग इथे कायम थैमान घालत असतात. गंगा काठावर अशा विकारामुळे मरणार्या मुलांची संख्या आहे रोज, होय रोज, एक हजार!! वाराणशीला 24 ठिकाणी गटारगंगा जोमाने गंगेला मिळत असतात, रोज 60 हजार यात्रेकरू इथे स्नान करत असतात, आणि त्याचा परिणाम म्हणून प्रवाहाच्या खाली 6 कि.मी.अंतरावरही कोलीफोर्म जंतू निर्धोक पातळीपेक्षा 3000 पटींनी जास्त आढळतात.
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी गंगा शुद्धीकरण योजना आखली होती. त्यानंतरच्या वर्षी आम्ही हरिद्वार हृषीकेशला गेलो होतो. तिथल्या अनेक मोठ्या उपहारगृहापैकी एकात आम्ही गेलो. चहा, नाश्ता, तोंड धुणे, जेवणे या सर्वांचे खरकटे पाणी जाते तरी कुठे या जिज्ञासेने मी मालकाकडे चौकशी केली तर त्याने हे पाणी मागून वाहणार्या गंगेत जाते असे सांगितले. मी विचारले, ‘अहो पण असे खराब पाणी गंगेत सोडायचे नाही असा कायदा झाला आहे ना?’ त्यावर तो म्हणाला ‘डायरेक्ट पाणी सोडत नाही. तो काय सोक पिट केला आहे ना.’ मी मुद्दाम जाऊन पाहिले तर प्रचंड उत्सर्जनामुळे तो चिमणा सोकपिट केव्हाच भरून उतू जात होता आणि सगळे गंदे पाणी नदीत जात होते. कायदा पाळला होता, आणि कोणी तपासनीस आलाच तर ‘सोक पिट -आहे’ अशी खूण करून गंगेचा प्रसाद’ घेऊन जात असणार.
हल्लीचे माहीत नाही, पण अनेक वर्षे गंगेत मृतदेह सोडून देण्याची प्रथा होती, कारण असे केल्यास थेट स्वर्गात प्रवेश मिळतो ही अंधश्रद्धा.(शिवाय अंत्यविधीचा खर्च वाचत असे) गंगेच्या नुसत्या काठावर मृत्यू आल्यास स्वर्ग प्रवेश निश्चित असल्यामुळे आजही अनेक मरणोन्मुख माणसांना गंगेच्या काठी आणण्यात येते. इथे मरण आले तरी इथल्या डोंबाने प्रेताला लाथ मारल्याशिवाय सद्गती नाही ही आणखी एक अंधश्रद्धा. हिंदू धर्मियांना परम पवित्र असणार्या अशा गंगेचे परम प्रदूषण दूर करण्याकरता वा तिच्या काठावर धर्माच्या नावावर चालणार्या अपप्रवृत्ती रोखण्याकरता हिंदूप्रेमी जनांनी खरे तर केवढी चळवळ उभारावयास हवी. पण मला तरी असे कोणी केल्याचे माहीत नाही. (तुम्हाला माहीत असल्यास मला कळवावे.) चळवळ नाही याचे कारण उघड आहे. गंगेचे पाणी दूषित होऊ शकते हेच अनेक सनातनी लोक मान्य करत नाहीत. आणि परंपरा जपणे हेच ध्येय असणार्या संस्था, कितीही घातक असल्या तरी, परंपरा मोडायला कसे तयार होणार? अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुद्धीप्रामाण्यवादी मंच, रॅशनॅलिस्ट असोसिएशन, असल्या धर्मबुडव्या लोकांचे हे काम!
काही वर्षांपूर्वी याच लोकांनी गंगा अभियान काढून गंगेचे पाणी गावोगाव विकून टनावारी पैसे मिळवले होते. त्यातले थोडे जरी गंगा शुद्धीकरणासाठी खर्च केले असते तर त्यांना गंगा स्नानाचे पुण्य लाभले असते. कदाचित, कानपूर इथे गंगा प्रदूषण करणारे कातडी कमावण्याचे सर्व कारखाने मुसलमानांचे आहेत हे समजले तर हे लोक लगेच चवताळून उठतील.
काही वर्षांपूर्वी आम्ही कोलकात्याला दक्षिणेश्वर मंदिर पहायला दुपारी गेलो होतो. पहातो तर देऊळ आणि सभोवताली निरव शांतता. भक्तही नाहीत की भिकारीही नाहीत. खुश होऊन पुढे जातो तर देऊळ बंद. चौकशी केल्यावर समजले की, देव झोपले आहेत. चार वाजता उठतील. चार वाजता पुजारी, भिकारी आणि देव उठून कामाला लागले. महाराष्ट्रात जागृत देव बरेच आहेत, पण झोपाळू देव उत्तर भारतात सर्वत्र आहेत. खरे तर पुजारी आणि भिकारी यांना विश्रांती हवी असते म्हणून देव बिचारा झोपतो.
या भिकार्यात बरेचसे चांगले धडधाकट होते. हिंदू देवालयासमोर एकही भिकारी दिसणार नाही; त्यांना उपजीविकेकरता धंदे शिक्षण शाळा आम्ही सुरू करू आणि कोणीही धडधाकट भिकार्याला भिक्षा घालू नये असे जनतेचे प्रबोधन करू असे कोणी संघ, परिषद वा सभेने जाहीर केल्याचे तुम्ही ऐकले आहे काय? तसे केले तर दान‘धर्म’ कसा होणार?
हिंदुत्वनिष्ठांचे शत्रू : 1.मुसलमान, 2.ख्रिश्चन मिशनरी, 3.पाकिस्तान, 4.महात्मा गांधी, 5.काँग्रेस, 6.कम्युनिस्ट, 7.समाजवादी, 8.अंधश्रद्धा निर्मूलन समिती, 9.धर्मांतर करून मुस्लीम, ख्रिश्चन वा बौद्ध झालेले दलित. 10.डॉ.आंबेडकर, 11.हिंदू मुलींशी लग्न करणो सर्व अन्य धर्मीय. 12.असे करणार्या हिंदू मुली. 13.बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट अशोक.
मित्र : 1.इस्त्रायेल, 2.अन्य धर्मीय(खास करून मुस्लीम) मुलींशी लग्न करणारे हिंदू. 3.असे करणार्या अन्य धर्मीय मुली. 4.हरे रामा हरे कृष्णा म्हणत नाचणारे गोरे, 5.रणगाडा, विमाने, अणुबॉम्ब हे सर्व आमचेकडे पूर्वी होते असे मानणारे, 6.जर्मन विद्वान मॅक्स म्युलेर, 7.स्वत:ला आर्य समजणारा हिटलर, 8.यज्ञ, गायत्री मंत्र, योगा यांच्यात जबर पॉवर असते असे मानणारे.
मध्यंतरी केरळातील पद्मनाभ मंदिरात रत्ने आणि सोने यांचा प्रचंड साठा सापडला. तो एवढा मोठा होता की, याचे आता काय करावे तरी काय असा विश्वस्तांना प्रश्न पडला. हे सोने बँकेमध्ये ठेवून त्याचे गोल्ड बाँड्स घ्यावेत, आणि त्याचे व्याजातून या देवळाचे बाहेर असणार्या असंख्य भिकार्यांना स्वावलंबी बनवण्याच्या योजना राबवाव्यात असे कोणा हिंदू हृदय सम्राटाने सुचवले आहे का? शक्यच नाही.
महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांचा मानबिंदू समजली जाणारी पंढरपूरची वारी ही आता आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी पावली आहे. या वारीच्या गुणवर्णनाने आणि छायाचित्रांनी या मोसमात वृत्तपत्रांचे रकाने ओसंडून जात असतात. त्यामुळे आपण या वरीला गेलो नाही तर काही पाप करत आहोत अशी भावना अनेकांची होते, त्यामुळे इथे होणारी गर्दी दरवर्षी वाढतच जाते. ठराविक दिवशी ठराविक देवाचे दर्शन घेतल्यास आपल्याला फार मोठे पुण्य लाभते ही समजुतही या गर्दीतील प्रत्येकाच्या मनात असतेच. आता धार्मिक स्वातंत्र्य असल्यामुळे कोणी कोणत्या दिशेने कोणत्या देवाचे दर्शन घ्यावे हे ठरवण्याचे अधिकार ज्याचे त्याला आहेत. पण आपण एकादशीला पंढरपूरला जात आहोत म्हणजे संपूर्ण देशावर फार मोठे उपकार करत आहोत, सबब शासनाने आपल्या सर्व सुखसोयी बिनबोभाट पुरवल्या पाहिजेत अशी यांची मागणी असते. आणि हे सर्व लाड पुरवून ही व्होट बँक खुश ठेवायला राज्यकर्तेपक्ष एका पायावर तयार असतात.
मग प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हाधिकारी या वारीचे स्वागत करतात, मुख्यमंत्री एकादशीला विठ्ठलाची पूजा करतात, पाण्याचे टँकर, आरोग्य खात्याची पथके, एस.टी.च्या जादा गाड्या, पोलीस बंदोबस्त, असे काही कोटी रूपये शासनातर्फे दरवर्षी ह्या अनुत्पादक उपक्रमावर खर्च केले जातात.
एका विशिष्ट धर्माच्या नागरिकांचेसाठी असा खर्च निधर्मी सरकारने करणे खरे तर घटना विरोधी आहे(इथे लगेच हज यात्रेला दिल्या जाणार्या अनुदानाचा प्रश्न निघेल, म्हणून सांगतो की, हज अनुदानही घटना विरोधीच आहे.) माझा मुद्दा वेगळाच आहे, ‘मायबाप सरकारने सर्व काही करावे, शक्य तो सर्व गोष्टी फुकट पुरवाव्या किंवा अनुदान द्यावे.’ ही वृत्ती आता सोडून द्यायला हवी. मला चांगल्या रस्त्याने प्रवास करायचा असेल तर टोल भरावा लागतो. कारण जी गोष्ट जो वापरतो त्याचा त्याने खर्च उचलला पाहिजे हे आता ‘मार्केट एकॉनॉमी’चे मूलतत्व आहे. ज्या लोकांना पुण्य संपादनाची एवढी तळमळ लागली असेल त्यांनी वर्गणी करून हा खर्च करावा. किंवा स्वत:ला हिंदू धर्माचे तारक, पालक, मालक समजणार्या संघटनांनी वा पक्षांनी हा खर्च करावा. रामाचे देऊळ बांधण्याकरता जमा केलेल्या शेकडो कोटी रूपयातील काही कोटी वारकर्यांना निवार्यासाठी चांगले तंबू आणि शौचविधीसाठी फिरती रासायनिक शौचालये पुरविण्यासाठी केला तर यांना नक्कीच दुवा मिळेल.
या वारीत अनेक महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत असतात. त्याऐवजी त्यांनी एखादे रोप घेऊन जावे आणि मार्गावर कोठेतरी ते लावावे, असे त्यांचे प्रबोधन कोणी ‘समिती’च्या सभासद करतील काय? छे, छे! परंपरा भंगाचे पाप कोण करणार?
एखाद्या धर्मियांच्या हृदयाचा सम्राट होण्यासाठी त्या धर्माचे पालन करावेच लागते असे नाही. जीना हे कधीही कुराण पठण, नमाज वा हजयात्रा करत नसत. धुम्रपान, मद्यपान करत, पूर्ण पाश्चात्य पोशाख करत, तरीही ते मुस्लिमांना मसीहा वाटत, या उलट महात्माजी स्वत:ला सनातनी हिंदू समजत, गाय आणि गीता याबद्दल पूज्यभाव बाळगत. भारतीय पोशाख करत, रोज प्रार्थना करत, तरीही कट्टर हिंदू त्यांना शत्रू मानत. का तर ते मुुस्लिमांशी प्रेमाने वागा असे सांगत.
जीनांचे प्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू धर्माचे कुठलेही कर्मकांड मानत नसत. उलट निरर्थक आणि अन्याय रूढींना कडाडून विरोध करत. चातुर्वर्ण, अस्पृश्यता, वेदप्रामाण्य, गोपूजन अशा हिंदू धर्माच्या बुरूजावर ते घणाघाती आघात करत. तरीही ते हिंदू हृदय सम्राट! कारण ते मुसलमानांचे भलते लाड करू नका, स्वतंत्र भारतातही त्यांना दुय्यम स्थान द्या असा आग्रह धरत.
सध्या भारतातील विविध भागात ‘अब्रू हत्या’(ऑनर किलिंग) हा प्रकार वारंवार आढळू लागला आहे. (किंवा उघडकीस येऊ लागला आहे.) यात बहुतेक सर्व हिंदूच असतात. खाप पंचायती दर काही दिवसांनी सगोत्र विवाह, मुलींनी मोबाईल वापरणे याविरूद्ध फतवे काढत असतात. यांची समजूत घालण्याची, मतपरिवर्तन करण्याचा कोणी आर.एस.एस.प्रचारक प्रयत्न करतात का? मला तरी ठाऊक नाही.
तात्पर्य काय तर हिंदू धर्मात असणार्या असंख्य त्रुटी, अपप्रवृत्ती, अन्याय रूढी, अंधश्रद्धा आणि स्वधर्मियांनाच दिली जाणारी अपमानास्पद वर्तणूक याविरूद्ध कोणीही हिंदुत्वनिष्ठ संघटना अल्पसेही प्रयत्न करत नाही, उलट सर्वांना त्यांचा उघड वा छुपा पाठींबाच असतो.
–डॉ.शरद अभ्यंकर, वाई