पुणे – कपाळी अष्टगंध, डोईवर केशरी पटका, हाती टाळ अन् मुखी लाडक्या विठोबाचे नाव… हरिनामाची पताका फडकवत मृदंगाच्या निनादावर जागर चालला होता… विवेकाचा, विचाराचा अन् संघर्षाचा. नोकरीवर जाण्याच्या गडबडीतही गुरुवारी सकाळी प्रत्येक जण थोडासा थबकत होता… उत्सुकतेने क्षणभरासाठी का होईना ऐकत होता.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला गुरुवारी सहा महिने पूर्ण झाल्याने पुरोगामी परंपरेची आठवण करून देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज फडतरे, श्यामसुंदर सोन्नर महाराज, गोरक्षनाथ महाराज क्षीरसागर, अक्षय महाराज भोसले यांनी ओंकारेश्वर पुलावर सकाळी नऊ वाजता ‘विवेक जागर’ केला. या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विवेक सांबरे, डॉ. हमीद दाभोलकर, अॅड. मनीषा महाजन, मिलिंद देशमुख, वंदना शिंदे आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. फडतरे यांनी ‘मरण माझे मरूनी गेले, मज केले अमर’ हे तुकोबाचे वचन सांगितले. ते म्हणाले, ’दाभोलकरांचे विचार मरणालाही मारून अखंड राहतील; कारण ते सत्य आणि न्याय्य होते. तुकोबांनी सांगितलेली संतांची लक्षणे पाहता कर्मकांडात अडकलेला देव बाहेर काढणारे दाभोलकर परिवर्तनाच्या दिंडीतले खरे संत आहेत. वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून त्यांचेच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न आहे.”
’टिळा टोपी घालूनी माळा म्हणती आम्ही साधू… दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू… ’ या तुकोबांच्या परखड वाणीचा दाखला देत सोन्नर म्हणाले, ’सोयराबाई, जनाबाई, तुकोबा अशा संतांनी प्रचलित व्यवस्था मोडून काढताना देवाशी भांडण केले. भेदाभेद करणार्यांना प्रश्न विचारले. भक्तिमार्गाच्या वाटेतील अंधश्रद्धेचे प्रदूषण हटविले. संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग साधासोपा होता. विवेकाच्या या वाटेवर निर्भय बनण्यासाठी हा जागर आम्ही घालतो आहोत.”