राजर्षी शाहू महाराजांना,
आदरपूर्वक सविनय प्रणाम!
लोकराजा, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यातला क्षण अन् क्षण कार्यरत राहिलात. त्याचाच परिणाम म्हणून बहुजन समाज आज किमान आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या नावाच्या जयघोषाने सकाळ, दुपार, संध्याकाळ आसमंत दुमदुमत असतो. तुमच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूनच पुरोगामी अन् प्रतिगामी चळवळीसुद्धा आपले कार्य सुरू करतात. प्रत्येक मोठा नेता, मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच सारेच तुमच्या प्रतिमापूजनात पुढे असतात. आणि त्याचवेळी आपल्या न्याय्यहक्क मागण्यांसाठी लोकशाहीचे सनदशीर मार्ग वापरून सरकार व प्रशासनाला जाब विचारणारे कष्टकरी श्रमिक जनता तुमच्याच साक्षीने आपली लढाई लढत असतात. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक अशा सार्या क्षेत्रात आपण अलौकिक कार्य केलेत, ज्या गरीब वर्गाला ‘सन्मान’ मिळवून देण्यासाठी आपण आयुष्य वेचलंत आज त्याच गरीब वर्गाला उद्धवस्त करण्याचे पद्धतशीर प्रयत्न चालू आहेत.
“माझी रयत थोडीफार शिकली अन् राज्यकारभार करणेस योग्य झाली तर मी आनंदानं माझे राज्य जनता जनार्दनाच्या हवाली करेन” असं जाहिररित्या सांगणारा ‘पहिला लोकनेता महापुरूष’ म्हणून शाहूराजा तुला वंदन करतो. शैक्षणिक क्षेत्रांत बहुजन समाज जरा चांगली प्रगती करतोय हे खरे परंतु रोजच्या व्यवहारात हा ‘सुशिक्षित समाज’ तुमच्या विचारांना तिलांजली देतोय. गोरगरीब जनता शिकून शहाणी व्हावी म्हणून आपण प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केलेत. त्याच प्राथमिक शाळांतून शिकलेली बहुजनांची मुले सरकारी नोकरी ‘अधिकारी’ बनले. आज हेच सरकारी अधिकारी, राजकीय नेते, भांडवलदारी उद्योगपती यांची ‘अभद्र युती’ तयार झाली आहे. आज हेच बहुजनांचे ‘तथाकथित प्रतिनिधी’ ह्या प्राथमिक शाळा बंद करून त्या जागेचा मलिदा आपल्या वाट्याला कसा येईल ह्या एकाच ‘शोधनिबंधात’ गर्क आहेत. शाळांचा खर्च चालवणेसाठी मंदिर व मशिदीचा पैसा खर्च करण्याचे ‘धाडस’ तुम्ही दाखवलेत. आज ह्या शाळांमधून ‘गणेश वर्गणी’ गोळा करण्याचे कार्य आमचे ‘शिक्षक’ करताहेत. धार्मिक कर्मकांडे व अनिष्ट चालीरिती यातून बहुजन समाजाची सुटका व्हावी या हेतुने आपण ज्ञानयज्ञ आरंभलात आणि आज शैक्षणिक क्षेत्राचे पौरोहित्य करणारे आमचे शिक्षक हाताच्या मनगटामध्ये दोरे, गंडे,बांधतात. गळ्यात ताईत बांधतात. आपल्या विद्यार्थ्यांना ‘पुरोगामी विचारांची धारातीर्थे’ दाखवण्याऐवजी सहलीसाठी म्हणून गणपतीपुळे, चाफळ अशा धार्मिक क्षेत्रांची सफर घडवून आणणार्या आमच्या शिक्षकांकडून परिवर्तनाची कोणती अपेक्षा करायची? पुण्यातील महात्मा फुलेंचा वाडा, महाडचे चवदार तळे, माणगाव, शिवतीर्थ रायगड अशी ‘विचारस्थाने’ विद्यार्थ्यांनी पहावीत असे शिक्षणक्षेत्रांतील मान्यवरांना वाटेल तो सुदिन होय.
लोकराजा, अस्पृश्यता निवारणाचा कृतीशील कार्यक्रम आपण निर्धाराने पुढे नेलात. दलित-सवर्ण मतभेदाची दरी कमी केलीत परंतु अलिकडेच नदीकाठच्या ‘वडणगे’ गावी दलित सवर्ण संघर्ष झाला हे खेदपूर्वक तुम्हाला सांगावेसे लागेल. ‘आरक्षणकर्ते’ म्हणून जगभर तुमची मान्यता आणि याच आरक्षण धोरणाला ज्यांनी कृतीशीलपणे विरोध करून प्रतिगामीपणा सिद्ध केला आज त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून दलितांचे प्रतिनिधी बसतात याला काय म्हणावे?
फलज्योतिषातील ‘फोलपणा’ ज्योतिषाला तुरूंगात डांबून तुम्ही जाहीररीत्या दाखवून दिलात. पण आजही ही भोळीभाबडी जनता कुंडली-पत्रिका-शांती या माध्यमातून ज्योतिषाची गुलामगिरी स्वीकारतात व आपली सारासार विवेकबुद्धी गहाण ठेवतात. राजकीय नेतेही मुहुर्तावरच निवडणुकीचा अर्ज भरतात. करणीचे प्रकार करतात. तपासासाठी पोलीस प्लँचेटचा वापर करतात. ह्या समाजापर्यंत आपला फलज्योतिषाला असणारा ‘नकार’ पोचलाच नाही.
जाती निर्मूलनाचा कृतीशील कार्यक्रम म्हणून आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारा कायदा तुम्ही 1917 साली केला. स्वत:च्या बहिणीचे लग्न होळकरांच्या(धनगर) मुलाशी लावून देऊन कृतीशील पायंडा पाडलात. आज मात्र आमचे सुशिक्षित पालक जातीतीलच वर/वधू शोधतात आणि स्वत:चे 96 कुळी, पंचकुळी, सप्तकुळी घराणे असल्याचा ‘प्रथा’ अभिमान मिरवतात.
मल्ल विद्या शिकणेसाठी आलेले पैलवान तालमीत कमी आणि रंकाळा चौपाटीवर जास्त वेळ घालवतात. कानपूरच्या जनतेने मोठ्या प्रेमाने ‘राजर्षी’ ही पदवी आपणास दिली. आज मात्र आम्ही त्यांना ‘परप्रांतीय’ मानून स्वत:ची कूपमंडीक वृत्ती जाहीर करतो. जोतिबा यात्रेला येणार्या परराज्यातील नागरिकांना शिवरायांचा इतिहास समजावा म्हणून तुम्ही ‘शिवरथोत्सव’ सुरू केलात आज मात्र यात्रेच्या काळात रथोत्सव कमी व महाप्रसादाची चर्चा जास्त असते.
महात्मा फुलेंचा ‘सत्यधर्म’ सर्वांना नीट समजावा म्हणून भास्करराव जाधवांच्या सहाय्याने ‘सत्यशोधक समाज’ पुर्नस्थापित केलात त्याला 2012 सालीच 100 वर्षे पूर्ण झाली. शेंबड्या पोराचा किंवा टग्या गुंडांचा वाढदिवस जोरात घातला जातो पण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा ‘शतकमहोत्सव’ साजरा झाला नाही. ‘पुरोगामी’ म्हणवणार्या वृत्तपत्रातूनही एक लेख छापला गेला नाही ही विषादाची गोष्ट आहे. आर्थिक रचनात्मक कार्याचा आदर्श म्हणून ‘शाहू मिल’ स्थापन केलीत व बेरोजगारांना रोजगार दिलात. पण आपल्या मृत्यूला 100 वर्षे होण्यापूर्वीच ‘शाहू मिल’ आमच्या ‘कारभार्यांनी’ बंद पाडली. जिथे तुम्ही जन्मलात त्या ‘लक्ष्मी विलास पॅलेस’चे नुतनीकरण अजून पूर्ण नाही. एरवी शेंदूर फासलेल्या दगडशला देव बनवून मंदिरांचा जिर्णोद्धार करण्यात आमचे राज्यकर्ते बाह्या सरसावून पुढे येतात आणि आपल्या जन्मस्थळाबाबतची राज्यकर्त्यांची अनास्था मनात ‘चीड’ निर्माण करते. ‘माझे जीवितकार्य’ असं संबोधून आपण राधानगरी धरणाची पायाभरणी केलीत आज ह्या धरणाची ‘गळती’ काढण्याचेही राज्यकर्त्यांच्या बुद्धीत शिरत नाही. याला काय म्हणावे? सर्व जातीधर्माची वसतीगृहे निर्माण करताना जातीअंताचीच आपली भूमिका होती. या वसतीगृहातून शिकून बाहेर पडलेली मुले परिवर्तनाची चळवळ पुढे नेतील ही अपेक्षा अपवाद वगळता फोल ठरली.
कोल्हापुरात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना कोल्हापूरचे खासदार मात्र हे प्रश्न सोडवण्याऐवजी महालक्ष्मीला सोन्याची पालखी(40 किलो) बनवण्याची योजना आखत आहे. कोल्हापूरची ओळख शाहू महाराजांची ‘प्रबोधननगरी’ अशी असताना या खासदार-महाशयांना आपल्या विचारांची ओळख झाली नाही, अथवा पटली नाही असेच म्हणावे लागेल.
सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुमच्या विचारांचा ‘वसा’ आयुष्यभर ज्यांनी कृतीशीलपणे राबविला त्या कॉ.गोविंद पानसरे यांचा खून ह्याच कोल्हापुरात झाला. लोकराजा, जी कोल्हापूर नगरी तुमच्या विचाराने ‘पुरोगामी’ विचारांची नगरी म्हणून जग ओळखते त्याच नगरीत आता ‘प्रतिगामी’ पावले पडत आहेत. हे ध्यानात घ्यावे लागेल. तुमच्या विचारकार्यावर 100 व्याख्याने देण्याचा कॉ.पानसरेंचा हेतू 82 व्या व्याख्यानापर्यंतच पोहोचला. लोकराजा, आम्हाला खात्री आहे. आज जर तुम्ही असता तर राजवाड्यावर बसून निष्क्रिय न राहता जनप्रबोधनासाठी रस्त्यावर उतरून नेतृत्व केले असते.
असो. सारे नकारात्मक तुम्हाला सांगून झालं आता थोडं सकारात्मकही काही गोष्टी सांगतो. देशभरात हिंदू-मुस्लिम दंगली होऊनसुद्धा कोल्हापुरात मात्र दंगल होत नाही याला कारण आपणच दाखवून दिलेली स्वधर्मप्रेम व परधर्म सहिष्णुतेची वाटचाल. कोल्हापूरच्या ‘लाल’ मातीतले अनेक पैलवान देशपातळीवर नावाजले गेले. आता तर मुलीसुद्धा कुस्ती खेळू लागल्यात. कोल्हापूरचे नाव मोठं करू लागलेत.
इतरही अनेक क्रीडाप्रकारात तरूण तरूणींनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे हे सुद्धा नोंदवतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी आपल्या मान्यतेची व कायद्याची साक्ष घेऊन येथील युवक-युवतीनीच ज्येष्ठांच्या सहाय्याने ‘आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह सहाय्यता केंद्र’ स्थापन करून शेकडो विवाह लावले आहेत. बहुजनांना छळणारे, स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करणारे अनेक कायदे आपण केलेत. तुमच्याच विचारांचा आधार घेऊन बनवलेला ‘जादूटोणाविरोधी कायदा’ कोल्हापूर व महाराष्ट्रात अंनिसच्या माध्यमातून जनहित साधत आहे. ज्यांनी आपल्या आरक्षणनितीला नावे ठेवली. तेच लोक आज स्वत:च्या समाजाला आरक्षण मिळावे म्हणून काळाची पावले ओळखून चालू लागली आहेत. दलित चळवळीला अधीमधी थोडी शिथिलता व कट्टरता आली असली तरी सर्वच महापुरूषांची एकत्रित जयंती करून इतर समाजघटकांना जोडून घेण्याचा शहाणपणा दलित चळवळीत आला ही समाधानाची गोष्ट आहे. राजस्नुषा इंदुमती साहेबांना शिकवण्याचा आपला प्रयत्न आपल्या मृत्यूने मागे पडला असला तरी शिक्षणक्षेत्रात कष्टपूर्वक अभ्यास करून आपली दखल समाजाला घ्यायला लावणार्या अनेक ‘इंदुमती’ आपल्याच भुमीत तयार होत आहेत. आपण निर्माण केलेल्या इतिहासाचे वाटोळे करू पाहणार्या राज्यकर्त्यांना व प्रतिगाम्यांना तुमचा वारसा सांगून जाब विचारणारा तरूण इथं निर्माण झालाय ही आनंदाची गोष्ट आहे. आपण औषध म्हणूनसुद्धा मद्याला नकार दिलात आज इथल्याच भूमीत कष्टकरी स्त्रियांनी व्यसनविरोधी मोहीम तरूणांच्या सहाय्याने राबवून ‘दारूबंदीची चळवळ’ उभारली आहे. परप्रांतीयांना चिरडा असं सांगणार्या नेतृत्वाला आणि परधर्माची भीती दाखवून धर्मांध राजकारण करणार्या नेतृत्वाला जाहीर सवाल करण्याची धमक तुमच्याच विचारांमुळे निर्माण झाली आहे ही कौतुकाची गोष्ट आहे.
लोकराजा, आता थांबतो. सारं वास्तव तुम्हाला सांगितलं. निराशादायक परिस्थितीचा काळोख दूर सारून परिवर्तनाचा प्रकाश जनमानसांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी ‘शाहूप्रेमी’ म्हणवणार्या आम्हा तरूण खांद्यावर आहे हे मी जाणतो. तुमच्या विचारांचा आणि आचारांचा सच्चा अनुयायी म्हणून इतकीच ग्वाही देतो की, तुमचा मानवतेचा, सत्यधर्माचा पुरोगामी विचार आम्ही पुढच्या पिढीपर्यंत सुखरूप पोचवू. तुमच्या विचारांचा वारसा आयुष्यभर कृतीशीलपणे जोपासू. तूर्त, निरोप घेतो.
आपल्या विचारांचा अनुयायी
एक सच्चा शाहूप्रेमी
–उमेश मुरलीधर सूर्यवंशी
लेखक संपर्क : 9922784065