Categories
विज्ञान

मुताऱ्यांच्या दुर्गंधीपासून सुटका

जून – २०१५

कुठल्याही शहराचे बसस्थानक, रेल्वे स्टेशन वा सार्वजनिक ठिकाण असो, तेथील मुतार्र्‍यांचा वापर करण्याचे ठरवल्यास नाक बंद करून, घाण तुडवत व दुर्गंधी सहन करतच लघवी उरकावी लागते. बहुतेक शहरांतील सर्वसामाऩ्यांचा हा एक अत्यंत कटु अनुभव आहे. सार्वजनिक मुतार्‍या व मुतार्‍या बरोबरचा घाण वास हे समीकरण ठरले असून मुतार्र्‍यांचा उपयोग करणार्यांचे व अशा मुतार्र्‍यांच्या जवळपास राहणार्‍यांचे जगणे असह्य करण्यात लघवीचे नि:सारण करण्यासाठी वापरात असलेल्या सदोष यंत्रणेचा मोठा वाटा आहे.

महागड्या टाइल्सचा वापर व वाहत्या पाण्याची सुविधा असूनसुद्धा नवीन मुतारी बांधल्यानंतरच्या 2-3 महिन्यात मुतारीच्या अवती भोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसू लागते. लोकांच्या थुंकण्याच्या वाईट सवयीमुळे लघवीचे सिरॅमिक भांडे कायम तुडुंब भरून वाहत असते. त्याची निगा राखणारी कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे काही दिवसातच मुतारीभोवती घाण पाणी साठू लागते. टाइल्स तुटतात. नळ गंजतात. त्यामुळे कुठलाही संवेदनशील माणूस मुतारींचा उपयोग करण्याच्या भानगडीत पडत नाही. या समस्येला उत्तर म्हणून आजकाल खासगी-सार्वजनिक सहभाग (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या गोंडस नावाची भर पडली आहे. या कंत्राटदारांच्या मुतार्र्‍यांच्या देखभालीची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. या व इतर अनेक भेडसावणाऱ्या समस्येमुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केल्याशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थितीशरणता आपल्या सर्वांच्या नसनसात भिनत आहे. अशा असहाय स्थितीत फक्त एखादे नवीन तंत्रज्ञानच यावर तोडगा काढू शकेल की काय अशी एक अंधुकशी आशा मनात उमटत आहे.

दिल्ली येथे पुढील काही महिन्यात कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या निमित्ताने शहर सुशोभित करण्याचा सपाटा तेथील महापालिकेने लावलेला आहे. त्या अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणच्या मुतार्र्‍यांची सुधारणा करण्याचे त्याने मनावर घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हजारेक मुतार्‍या बांधता येतील का याचा अंदाज घेतला जात आहे. (आता या प्रस्तावात भ्रष्टाचार होत आहे की नाही हे फक्त आमच्या पुण्याचे ’भाई’च स्पष्ट करू शकतील!)

पाणीविरहित मुतार्‍या

आधुनिक तंत्रज्ञानात मुतारीतील लघवीसाठी वाहत्या पाण्याची वा फ्लशची गरज पडत नाही व त्याचप्रमाणे या आधुनिक पाणीविरहित मुतार्‍यांमुळे घाण वासही येत नाही, असा दावा केला जात आहे. मुतार्‍यातील पाण्याचा वापर मुळातच लघवीचे डाग, व घाण वास यावर उपाय म्हणून केला जातो. परंतु हेच पाणी दुर्गंध पसरवण्याचा मूळ स्त्रोत आहे. खरे पाहता लघवी हे वासविरहित द्रव आहे. बाहेरच्या पाण्याच्या वापरामुळे मूत्रातील युरियाबरोबरच्या जलीय विच्छेदन (hydrolysis) प्रक्रियेमुळे दुर्गंधी पसरविणारे वायू बाहेर निघतात व घाण वास पसरत जातो. याचबरोबर जेव्हा मूत्र ट्रॅपमध्ये साठत जातो तेव्हा काही दुर्गंधी पसरविणारे सूक्ष्म जंतू मूत्राचे विभाजन करतात. त्यामुळेसुद्धा दुर्गंधी पसरते.

अशा प्रकारच्या पाणीविरहित मुतार्‍या नव्वदीच्या दशकात ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे विकसित झाल्या. या तंत्रज्ञानामध्ये लघवीतील डबर (debris) पकडण्यासाठी स्टेनर वापरला असून त्यानंतर मूत्र झिरपरोधन द्रवामधून (sealant liquid) खालच्या पाइपमध्ये साठवले जाते. हे झिरपरोधन द्रव तेल वा तेलाचे मिश्रण असते. लघ्वीची घनता (1.023 g/mm3) तेल मिश्रणाच्या घनतेपेक्षा (0.928 g/mm3) जास्त असल्यामुळे लघवीवर तेल तरंगते. त्यामुळे मूत्रातील दुर्गंधी वायूंना तेलाच्याखाली पकडून ठेवल्यामुळे आसपास लघवीचा वास येत नाही. काही विकासकांनी सीलंट लिक्विडऐवजी अतीसूक्ष्म छिद्र असलेले पटल (membrene) वापरले आहे. मेंब्रेन वा सीलंट लिक्विड यांना काही निर्दिष्ट अवधीनंतर बदलावे लागते. त्यामुळे पाणीविरहित मुतार्‍यासाठीच्या देखभालीच्या खर्चात वाढ होते. यावर उपाय म्हणून चीनमधील संशोधकानी मुतारीच्या भांड्याला नॅनोसिल्व्हरचा लेप दिल्यामुळे दुर्गंधी पसरविणारे सूक्ष्म जंतू वाढत नाहीत व लेप केलेली पूर्ण भांडी जलनिरोधक (water repellent) म्हणून काम करते.

नेहमीच्या वापरातील युरिनल पॅनची किंमत साधारणपणे 500 रुपये वा अधिक आहे. परंतु पाणीविरहित युरिनल पॅनसाठी 6000 रुपयापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. शिवाय देखभालीचा खर्च वेगळा. या कंपनींच्या वितरकांच्या मते भांडवली किंमत आता जास्त वाटत असली तरी पाण्याची बचत, पाणी वाहते ठेवण्यासाठीचा अतिरिक्त खर्च, फ्लश, वाल्व, नळाची तोटी इत्यादीवरील खर्च इत्यादी गोष्टी टाळता येत असल्यामुळे काही वर्षातच सर्व पैसे वसूल होतात.

कमी खर्चाचे झीरोडोर तंत्रज्ञान

कुठल्याही सार्वजनिक प्रशासनाला या किंमती परवडणार्या नाहीत. कमी किंमतीतील पॅन विकसित करणे शक्य आहे का याचा विचार आयआयटी दिल्ली येथील संशोधन गट, युनिसेफ व स्टॉकहोम येथील पर्यावरण संस्था करत आहेत. हा गट झीरोडोर नावाची यंत्रणा विकसित करत आहे. या यंत्रणेत युरिनल पॅनमध्ये लघवीला trap करण्यासाठी एक चेंडू वापरला जातो. पॅनच्या तोंडाला झाकण्याएवढ्या आकाराचा चेंडू पॅनच्या खालच्या पाईपमध्ये ठेवलेला असतो. लघवी पॅनमधून पाईपमध्ये साठत असताना चेंडू तरंगत वर येऊन पॅनचे तोंड बंद करतो. त्यामुळे घाण वास बाहेर येऊ शकत नाही. लघवीचे पाणी प्लंबिंग पाईपमधून खाली गेल्यानंतर चेंडू आपोआप खाली जातो. याप्रकारे खालच्या पाईपमधून निघणार्‍या वासालासुद्धा चेंडू प्रतिबंध करतो. पूर्ण विकासांती झीरोडोरची किंमत सुमारे 250 रुपये राहील असा अंदाज आहे. याच प्रमाणे जैव तंत्रज्ञान वापरून जलीय विच्छेदनाला मदत करणार्‍या सूक्ष्म जंतूंचा वापर करून दुर्गंधी दूर करण्याचे प्रयत्न काही संशोधक करत आहेत.

झीरोडोर तंत्रज्ञान केवळ दुर्गंध घालवण्यासाठी असून येथे पाण्याचा वापर अनिवार्य आहे. मुळातच आपल्या येथील प्लंबिंग व निचरा व्यवस्था पूर्णपणे वाहत्या पाण्यावर अवलंबून आहेत. या व्यवस्थेत काही कालावधीनंतर मूत्रद्रव स्फटिकात रूपांतर होऊन पाईप choke होण्याची शक्यता आहे. परंतु तज्ञांच्या मते वेळोवेळी जास्त दाबाने पाणी सोडल्यास मूत्रस्फटिक सांडपाण्यात वाहून जातील व पाईप मोकळे राहतील. हे तंत्रज्ञान आता उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करत असल्यामुळे जास्त खर्च येणार नाही. जरी हे तंत्रज्ञान स्वस्त असले तरी त्याचे संशोधन अत्यंत प्राथमिक पातळीवर आहे. पूर्णपणे विकसित होऊन वापरण्यायोग्य होण्यासाठी त्याला फार लांबचा पल्ला गाठावा लागेल. तरीसुद्धा आता उपलब्ध असलेले तंत्रज्ञान खासगी उद्योग-संस्थाना परवडण्यासारखे आहे. मोठमोठे कारखाने, उद्योग, शाळा, कॉलेजेस, पर्यटन स्थळ, मंदिर – प्रार्थनास्थळ, इत्यादी ठिकाणी पाणीविरहित व दुर्गंधीविरहित मुतार्र्‍यांचा वापर करणे अनिवार्य करण्याची गरज आहे. नगरपालिका वा संबंधित प्रशासनाने अशा आधुनिक तंत्रज्ञानाला उत्तेजन दिल्यास सामान्यांचे आयुष्य थोडे फार तरी सुसह्य होऊ शकेल.

-प्रभाकर नानावटी

लेखक संपर्क : 9503334895