Categories
ज्योतिष

लोकसभा निवडणुकीच्या भविष्यांनी ठरवले ज्योतिषांचे भवितव्य

जून – २०१४

महाराष्ट्र अंनिस ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली आहे. फलज्योतिष शास्त्र आहे असा दावा करणार्‍या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले गेले. काही वेळा आव्हान स्वीकारायचा दावा करून वाद-संवाद झाला. परंतु प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिद्ध झाली नाही. त्यामुळे 28 फेबु्रवारी 2014 या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंनिसतर्फे देशभरातील ज्योतिषांना लोकसभा निवडणूक 2014 च्या निमित्ताने निवडणुकीसंदर्भात भविष्य वर्तवावे व ते तपासण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे आव्हान स्वीकारावे असे आवाहन करण्यात आले होते. यानिमित्त निवडणुकांच्या निकालाचे अचूक भविष्य वर्तवणार्‍या ज्योतिषांसाठी 21 लाख रूपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी मअंनिसने दिलेली होती.

भारतात 2014 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या विविध पक्षांना मिळणार्‍या जागा. निवडून येणार्‍या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्वाच्या मतदारसंघातील विजयी उमेदवार, महाराष्ट्रातील विविध पक्षांना मिळणार्‍या जागांची संख्या, नवीन स्थापन होणार्‍या मंत्रीमंडळातील काही सदस्यांची नावे याविषयीचे भविष्य वर्तविले जावे असे सदर आव्हान प्रक्रियेत अपेक्षित हेते. एकूण 30 प्रश्न विचारलेले होते त्यापैकी 22 प्रश्नांची उत्तरे देणार्‍यास बक्षीस मिळणार होते. उत्तरामध्ये 5 टक्के फरक अपेक्षित धरलेला होता. प्रवेशिका htttp://antisuperstition.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली होती. एवढा खुलेपणा मअंनिसने या आव्हानप्रक्रियेत ठेवलेला होता. स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्वत:चे प्रतिज्ञापत्र व रू.5000 चा डी.डी. 15 एप्रिल 2014 पर्यंत तर प्रवेशिका मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या आधी एक दिवस म्हणजे 11 मे 2014 अखेर पाठवायची होती. 15 एप्रिलपर्यंत एकही प्रवेशिका न आल्यामुळे मुदत 30 एप्रिल 2014 पर्यंत वाढवण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रातील प्रथितयश ज्योतिषांना व पंचांगकर्त्यांना रजिस्टर पोस्टाने प्रवेशिका पाठवली होती. त्यामध्ये ब्रहण महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे मा.जकातदार, मा.धुंडीराज पाठक, महालक्ष्मी पंचांग, लाटकर पंचांग, दाते पंचांग, मा.कळंत्री, मनहर देसाई, कालनिर्णय पंचांग, रूईकर पंचांग, महाराष्ट्र पंचांग आदींचा समावेश होता. भाग घेण्यासंदर्भात जवळपास 200 फोन आले. 15 जणांना ई-मेलवरून प्रवेशिका पाठवण्यात आली. प्रवेशिका मिळाल्यानंतर मात्र एकही फोन आला नाही. न भाग घेण्यासाठी, किंवा प्रश्नावलीसंदर्भात शंकेबाबत. सदर आव्हान प्रक्रियेसाठी दि.30 एप्रिल 2014 अखेर एकही प्रवेशिका आली नाही हे विशेष. नेहमीप्रमाणे ज्योतिषवाले स्पर्धेत भाग घेत नाहीत याची प्रचीती याही वेळी आली. आव्हान प्रक्रिया संपल्यानंतर मात्र अकांडतांडव करायचा किंवा प्रश्नावलीबद्दल आक्षेप घ्यायचा. प्रश्नावलीबद्दल आक्षेप घेणार्‍या ज्योतिषांना विचारावसं वाटतं की, जे ज्योतिषी 600 कोटी किलोमीटर अंतरावरील प्लुटोच्या प्रभावाचा वापर करतात. अब्जावधी कोटी किलोमीटर अंतरावरील रास आणि नक्षत्रांचा हवाला घेतात त्यांनी भारताच्या केवळ काही हजार किलोमीटर अंतरावरील एखाद्या मतदारसंघाविषयी विचारणा केली तर एवढं थयथयाट कशासाठी करायचा. आपलं नाणं खणखणीत असेल तर भीती कशाला!

काही तथाकथित ज्योतिषांनी तर फारच उतावळेपणा केलेला होता. प्रवेशिका न पाहताच सांगून टाकलं की, मोदींचं सरकार येणार, काँग्रेस येणार, मला बक्षीस मिळालं तर निम्मं अनाथ आश्रमाला आणि निम्मं स्वयंसेवी संस्थांना द्या. एकजणानी तर म्हटले की, मी तीनच प्रश्नांची उत्तरं देतो, तर दुसरे म्हणाले की, उमेदवाराला मला फक्त फोन करायला सांगा त्याच्या आवाजावरून त्याचं भविष्य सांगतो. काय पण भविष्यवेत्ते.

यानिमित्ताने दै.लोकमत, दै.सकाळ, दै.लोकसत्ता, दै.तरूण भारत, दै.महाराष्ट्र टाईम्स, दै.पुढारी आदी प्रसारमाध्यमांनी समितीची भूमिका अत्यंत योग्य पद्धतीने मांडली होती. दै.लोकमतचे कवी राउल व कार्व्हन मासिक नवी दिल्लीचे अनोध मालेकर यांनी सदर विषयावर लेखमाला प्रसिद्ध केली होती. आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, जय महाराष्ट्र आदी चॅनेल्सनी अंनिसच्या दृष्टिकोनाला अत्यंत चांगली प्रसिद्धी दिली. या आव्हान प्रक्रियेसाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मा.सुहास पळशीकर, जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू व गणितज्ज्ञ मा.एन.के.ठाकरे, ज्येष्ठ सांख्यिकीतज्ज्ञ प्रा.ए.ए.बासडे यांनी बहुमोल सहकार्य केले. तर ज्येष्ठ मार्गदर्शकाच्या भूमिकेतून खगोलतज्ज्ञ डॉ.जयंत नारळीकर व ज्येष्ठ वैज्ञानिक प्रो.यशपाल यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले.

‘फलज्योतिष हे शास्त्र नाही ते थोतांड आहे’ ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणार्‍या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा अशी मागणी महाराष्ट्र अंनिस पुन्हा एकदा यानिमित्ताने करीत आहे. वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला यानिमित्त उपलब्ध राहील. ज्योतिषाच्या मोहामध्ये सर्वसामान्यांनी अडकण्याची अजिबात गरज नाही. आपलं भविष्य आपण घडवूया न की ग्रह तार्‍यांचा अथवा हस्तरेषांचा दुरूपयोग करणारांच्या जोरावर. ही मअंनिसची भूमिका आहे.

अविनाश पाटील राज्य कार्याध्यक्ष

डॉ.नितीन शिंदे राज्य कार्यवाह

प्रकाश घाटपांडे ज्योतिष अभ्यासक

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती.