महाराष्ट्र अंनिस ज्योतिषाचा फोलपणा सातत्याने मांडत आलेली आहे. फलज्योतिष शास्त्र आहे असा दावा करणार्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले गेले. काही वेळा आव्हान स्वीकारायचा दावा करून वाद-संवाद झाला; परंतु प्रत्यक्षात आव्हान प्रक्रिया सिद्ध झाली नाही. महाराष्ट्र अंनिसतर्फे देशभरातील ज्योतिषांना येणार्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने निवडणुकीसंदर्भात भविष्य वर्तवावे व ते तपासण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे आव्हान स्वीकारावे असे आवाहन करण्यात येत आहे.
फलज्योतिषाचे आव्हान कशासाठी?
2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. या मधल्या काळात अनेकांना निवडणुकांचे अंदाज वर्तवण्याची उर्मी असते. काही जण आपल्यातील अतिंद्रिय शक्ती, भविष्यकथनातील जाण, ग्रहदशा यांच्या अभ्यासानुसार अंदाज वर्तवण्याचे दावे करतात. यानिमित्त आम्ही निवडणुकाच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणार्या ज्योतिषांसाठी 21 लाख रूपयांचे पारितोषिक जिंकण्याची संधी देत आहोत. मानवी जीवनात घडणार्या घटनांच्या स्पष्टीकरणासाठी ज्या फलज्योतिषाचा आधार घेतला जातो तो किती मजबूत आहे किंवा किती तकलादू आहे याचा विचार लोकांनी करावा यासाठीच हे प्रयोजन आहे. फलज्योतिष वैज्ञानिक कसोट्यांवर टिकत नाही हे तर मअंनिस मांडत आली आहेच. तरी देखील विज्ञान शाखेत फलज्योतिषाला घालण्याचा घाट विद्यापीठ अनुदान आयोगाने घातला होता. मअंनिसने तो हाणून पाडला. फलज्योतिष शास्त्र नाही, ती कला आहे ही भूमिका घेऊन त्याचा व्यवसाय करणार्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा. अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे सतत करण्यात आली आहे. त्यामुळे वर्तविलेले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसान भरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला उपलब्ध राहील. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसने दिलेले आव्हान ज्योतिषांनी संधी मानून स्वीकारले पाहिजे.
फलज्योतिषाच्या चिकित्सेबद्दल आवाहन, प्रयोग हे तर आम्ही आत्तापर्यंत करत आलो आहोतच. 2008 मध्ये आम्ही देशातील प्रथमच संख्याशास्त्रीय निकषांवर वैज्ञानिक चाचणी आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग यांच्या समन्वयातून घडवून आणली होती. त्यात सरासरी 50 टक्के देखील अचूक निकाल ज्योतिषांना देता आले नाहीत. प्रथितयश ज्योतिषांनी तर या चाचणीवर बहिष्कार टाकला होता. चाचणीत अपयश येण्याच्या भीतीपोटीच तो बहिष्कार असावा. म्हणून आता पुन्हा एकदा 2014 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी आव्हान प्रक्रिया राबवत आहोत.
आव्हान कुणासाठी आहे?
महाराष्ट्र अंनिसतर्फे देण्यात येणारे आव्हान स्वत:ला ज्योतिषी, भविष्यवेत्ता समजणारी व्यक्ती, इतर लोक ज्यांना ज्योतिषी भविष्यवेत्ता समजतात अशा व्यक्ती, ज्योतिषी लोकांची संख्या/मंडळ/विद्यापीठ आणि ज्योतिषी लोकांचा समूह यापैकी कोणीही स्वकारू शकेल.
आव्हान नेमके काय स्वरूपाचे आहे?
भारतात 2014 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी विविध पक्ष, त्यांच्या आघाड्या आणि त्यांचे राज्यनिहाय निवडून येणार उमेदवार तसेच पक्षांना मिळणार्या मतांची टक्केवारी, एकूण जागांपैकी पक्षनिहाय निवडून येणार्या जागा, देशातील महत्वाच्या उमेदवारांचे जय-पराजय, त्यांच्या मतांची टक्केवारी आणि महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांपैकी पक्षनिहाय व महत्वपूर्ण उमेदवारनिहाय मतांची टक्केवारी याविषयीचे भविष्य सदर आव्हान प्रक्रियेत वर्तविले जावे असे अपेक्षित आहे. त्यासाठी सहभागी होणार्या ज्योतिषांना आव्हान प्रक्रियेचे तपशील स्वतंत्रपणे पाठविले जातील. आव्हान प्रक्रियेत सहभागी होणार्यांनी 15 एप्रिल, 2014 पर्यंत पोहोचतील अशा बेताने आपली सहभागाची संमती व रू.5000/- अनामत रक्कमेचा डी.डी.समितीकडे पाठविणे अपेक्षित आहे. त्यानंतर निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या आधी वर्तविलेले भविष्य बंद लखोट्यामध्ये पाठविले जाणे अपेक्षित आहे.
फलज्योतिषाच्या आव्हान प्रक्रियेत तज्ञ परिक्षक मंडळाच्या वतीने ज्योतिषांनी वर्तविलेले भविष्य तपासले जाणार आहे. त्यामध्ये संशोधक, राजकीय विश्लेषक, गणिती अभ्यासक, खगोल तज्ञ आणि ज्योतिष अभ्यासक आदिंचा समावेश असेल. परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम असेल व तो पारदर्शी असेल. आव्हान प्रक्रियेची रक्कम रू.21 लाख असेल त्याची ठेव जमा पावती अथवा बँक मॅनेजरचे ऐपत हमी पत्र मागणीनुसार सादर केले जाईल.