Categories
संपादकीय

मरण मरूनी गेले – मज केले अमर

मार्च - २०१४

हरिनामाच्या रूपाने विवेकाची पताका फडकवत मृदुंगाच्या निनादावर खर्‍या वारकर्‍यांनी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर विचारांचा जागर घातला. याच ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अविचार्‍यांनी गोळ्या घातल्या होत्या. ज्ञानेश्वर महाराज फडतरे, श्यामसुंदर सोनार महाराज व तत्सम कीर्तनकार वारकरी यांनी 20 फेब्रुवारी 2014 रोजी या निमित्ताने कीर्तनरूपात जनप्रबोधन केले. आम्ही महाराष्ट्र अंनिसच्या वतीने सर्व विवेकी वारकर्‍यांना धन्यवाद देतो. याला कारणही तसेच आहे. ज्ञानेश्वर महाराज फडतरे आपल्या किर्तनात म्हणाले की, दाभोलकरांचे विचार मरणालाही मारून अखंड राहतील; कारण ते सत्य व न्याय होते. त्यांनी या प्रसंगी तुकोबाच्या एका अभंगाचा खास उल्लेख केला. ‘मरण माझे मरून गेले, मज केले अमर.’

वरील अभंगातील सत्याची प्रचिती आपण अनुभवित आहोत. महाराष्ट्रातील तरूणाई व विवेकी मन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराचा सन्मान करीत आहे. एवढेच नाही तर हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कृतीशील होत आहे याचे दर्शन ठिकठिकाणी होत आहे. दाभोलकरांना मारणारे मेले, त्यांची छी; थू झाली पण दाभोलकर अमर झाले.

आय.बी.एन. लोकमत या इलेक्ट्रॉनिक मिडियाने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्याचे घोषीत केले. यामध्ये संघटना म्हणून महाराष्ट्र अंनिसचा खास गौरव करण्यात आला. अंनिसचा गौरव म्हणजेच डॉ. दाभोलकरांचा गौरव हे वेगळे सांगायला नको. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांनी दाभोलकरांच्या कर्तृत्वाचा व कार्याचा गौरव करणारे समारंभ साजरे केले. त्यात प्रामुख्याने सातारा नगरपालिकेने ‘सातारा-भूषण’ ह्या उपाधीने मरणोत्तर केलेला दाभोलकरांचा गौरव विशेषत्वाने नोंदला जाईल. या समारंभ प्रसंगी प्रख्यात संतसाहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, नरेंद्र दाभोलकर हेच खरे धार्मिक होते. ‘टिळा टोपी घालूनी माळा। म्हणती आम्ही साधू- दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू’ या तुकोबांच्या वचनाप्रमाणे, दया व करूणा हाच धर्म मानणारे डॉ. दाभोलकर हेच खरे साधू व धार्मिक होते यात काय शंका?

परवा परवा सांगली जिल्ह्यातील प्रख्यात लोक कैवारी नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या साखर उद्योग समूहाद्वारे डॉ. दाभोलकरांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. विचार मारता येत नाही असे सांगून नागनाथ अण्णांचे सुपुत्र वैभव नायकवडी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र अंनिसच्या कार्याच्या पाठीमागे आमची ताकद उभी करू.

अशा विविध माध्यमातून, घटकामधून साहित्यीक वर्तुळामधून महाराष्ट्र अंनिसला पाठबळ देण्यासाठी लोक उभे राहू लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून 9 फेबु्रवारी रोजी बांद्रा, मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र अंनिसच्या जादूटोणा विरोधी कायदा परिषदेला मिळालेला भव्य प्रतिसाद. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून व मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून तसेच सोनाली कुलकर्णी, नंदू माधव यांच्या सारखे सेलिब्रिटीज व सुरेखा दळवी व इतर समाजसेवी यांच्या समवेत सुमारे 500 प्रतिनिधी या परिषदेला हजर होते. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी या परिषदेत तुतारी फुंकली गेली. कायद्याची अंमलबजावणी, कार्यक्रम विविध सरकारी खात्यांची त्यासाठी मदत घेणे, तरूणाईला साद घालणे अशा विविध मार्गाने अंनिसची वाटचाल अधिक दमदारपणे चालू ठेवली जाईल. त्यासाठी अंनिसचे सर्व कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी तयार आहेत. या वाटेवरचे आपणही प्रवासी व्हा असे आवाहन याप्रसंगी आम्ही तुम्हाला करीत आहोत.

दाभोलकरांचे बलिदान वाया जाऊ न देणे यासाठी त्यांना व त्यांच्या विचारांना संपविण्याचा प्रयत्न करणार्‍यांना निष्प्रभ करणे हे आपल्या पुढचे मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी आम्ही तुम्हाला साद घालीत आहोत.