Categories
परिवर्तन प्रथा

लोणारी समाज दूध विकू लागला

मार्च - २०११

दूध विकले तर देवाचा कोप होईल, या अंधश्रद्धेपोटी दुधाचा व्यवसाय न करणार्‍या लोणारी समाजाने या लाजीरवाण्या प्रथेला आणि पर्यायाने अंधश्रद्धेला झुगारून दिले आहे. या समाजातील सुशिक्षितांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य लोणारी संघटनेचे अध्यक्ष कृषीभूषण अ‍ॅड.सर्जेराव खिलारी, अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीने सुमारे पाचशे लिटर दुधाचे संकलन करून अंधश्रद्धेच्या बेड्या तोडून टाकल्या.

            करगणी (ता.आटपाडी, जि.सांगली) येथे अ‍ॅड.खिलारी यांनी स्वत: दुधाची विक्री करून अंधश्रद्धेला मूठमाती दिली. यावेळी संजीवनी क्रांती दूध संकलन केंद्राचे उद्घाटन ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ.दाभोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.दाभोलकर म्हणाले, वाईट परंपरांचे ओझे निर्धारपूर्वक नाकारणारी माणसे ज्या समाजात जेवढ्या प्रमाणात निर्माण होतात, तो समाज तेवढ्या प्रमाणात बदलतो. लोणारी समाजातील बहुसंख्य लोक केवळ अंधश्रद्धेपोटी दूध विकत नाहीत. दूध फुकट वाटतात आणि ज्यांना हे फुकटचं दूध मिळत नाही ते वाटणार्‍याशी भांडण करतात. या अंधश्रद्धेतून हा समाज कधी बाहेर येणार? मानसिक गुलामगिरीची सीमा सर्वात भयानक असते. सीमोल्लंघन म्हणजे स्वत:च स्वत:च्या ठरवलेल्या सीमांचं उल्लंघन करणे. मानसिक गुलामगिरीच्या सीमेचं उल्लंघन लोणारी समाज करतो आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. गुलामीचं उदात्तीकरण बदलण्याची गरज आहे.

            माजी आमदार अनिल बाबर म्हणाले, जगातील कोणत्याही धर्मात दूध न विकण्याची प्रथा नाही. श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धेमुळे दुग्ध व्यवयासापासून लोणारी समाज दूर आहे. दूध विकलं तर कुलदैवताचा कोप होतो म्हणता तर दारू कशाला पिता? दारू पिणे कोणत्याही दैवताला नव्हे समाजाच्या, कुटुंबाच्यादृष्टीने तरी भूषणावह गोष्ट आहे काय? लोणारी समाजाने आदर्श दुग्ध व्यवसाय करून आर्थिक स्थैर्य मिळवावे, असे त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्र राज्य लोणारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड.खिलारी म्हणाले, प्रत्येक समाजाची निर्मिती व्यवसायातून झाली आहे. लोणारी समाजाकडे जमिनी आहेत; पण अंधश्रद्धेपोटी आतापर्यंत दुधाचा व्यवसाय केला नाही. यापुढील काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करून समाज दुग्धव्यवसाय करून नवा आदर्श निर्माण करेल.

            यावेळी चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, प्रा.सुभाष कवडे, सुनील भिंगे, अण्णासाहेब पत्की, दुर्योधन खिलारी यांची भाषणे झाली. कार्यक्रमास अंनिसचे जिल्हाध्यक्ष आर.एस.कुलकर्णी, सर्जेराव चव्हाण, विश्वास चितळे, डॉ. रामकृष्ण कृष्णाजी कुटे, दत्तात्रय खिलारी, डॉ. सी. व्ही. कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी यांच्यासह लोणारी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.