Categories
पुस्तक परिचय

 मच्छिंद्रनाथ मुंडे यांची वाचनीय दोन नवी पुस्तके

मार्च - २०११

‘अघोरी अंधश्रद्धा’ आणि ‘अतिंद्रिय शक्ती व बुवाबाजी’ ही महाराष्ट्र अंनिसच्या प्रकाशित पुस्तकापैकी अलिकडील प्रकाशने(जानेवारी 2011). या पुस्तकांचे लेखक प्रा.मच्छिंद्रनाथ मुंडे हे महाराष्ट्र अंनिसचे धडाडीचे कार्यकर्ते. त्यांनी आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत. वर उल्लेख केलेल्या पुस्तकांची भर पडल्याने ते सात पुस्तकांचे मानकरी ठरले आहेत.

            ‘अघोरी अंधश्रद्धा’ हे पुस्तक मुंडे सरांच्या दहा-बारा वर्षांच्या अथक चिंतनातून व निरीक्षणातून साकारले आहे. जी अघोरी, अमानुष अंधश्रद्धा व परंपरा दृष्टीला पडली तिचे मूळ मुंडे सर शोधीत गेले व त्यासाठीची शास्त्रीय माहिती पण त्यांनी परिश्रमपूर्वक शोधली. ह्या पुस्तकातील माहितीत अतिरंजितपणा नाही पण माहिती वाचनीय व्हावी म्हणून तिला गोष्टीचे किंवा निबंधाचे स्वरूप दिले आहे. निखार्‍यावरून  चालणे, खिळ्याच्या पाटावर झोपणे, भिंतीवर दलितांनी टकरा  घेणे, नवसासाठी मुले वरून खाली झोळीत फेकणे अशा विविध अघोरी प्रकारांची माहिती व त्यावरील भाष्य यांनी या पुस्तकाला वाचनीय बनविले आहे. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रंगीत फोटो. या फोटोवरून अघोरी प्रकारामागच्या युक्त्या प्रभावीपणे स्पष्ट होतात व वाचक आश्चर्यचकीत होतो.

            मुंडे सरांचे दुसरे पुस्तक म्हणजे पॉकेट डायरीवजा लिहिलेले ‘अतिंद्रिय शक्ती व बुवाबाजी’ हे पुस्तक होय. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी अतिंद्रिय शक्तीचा दावा केला ते जगभरचे समर्थक फसव्या विज्ञानाचा किंवा हातचलाखीचा वापर करतात हे सिद्ध झाले आहे. या छोट्याशा पुस्तकात परामानसशास्त्र, त्याचे वर्गीकरण, त्याच्या शाखा-उपशाखांची ओळख देण्यात आली आहे. ज्या फसव्या विज्ञानाचा आधार परामानसशास्त्रात घेतला जातो ते फसवे विज्ञान म्हणजे काय, त्याचे प्रकार व त्याची भाषा यांची माहिती या पुस्तकात दिली आहे. शेवटी अतिंद्रिय शक्तीचे केले गेलेले तथाकथित प्रयोग व त्यांचे स्पष्टीकरण देऊन जगभरच्या बनेल मंडळींचे या संदर्भातील दावे कसे फोल ठरले याची माहिती दिली आहे. वरील दोनही पुस्तके जिज्ञासूंनी, कार्यकर्त्यांनी अवश्य वाचावी.

1) पुस्तकाचे नाव : अघोरी अंधश्रद्धा,

लेखक : प्रा.मच्छिंद्रनाथ मुंडे

प्रकाशक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पृष्ठे-93, किंमत : 100 रू.

2) पुस्तकाचे नाव : अतिंद्रिय शक्ती व बुवाबाजी

किंमत : 20 रू.

लेखक : प्रा.मच्छिंद्रनाथ मुंडे,

प्रकाशक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, द्वारा : मच्छिंद्रनाथ मुंडे, 502, ओमविश्वेश्वर दर्शन अपार्टमेंट, ठाकूरवाडी, डोंबिवली(प.), ठाणे. 421202

फोन नं. (0251) 2586097, 9930927901

टीप : अंनिवा वाचकांसाठी सवलतीच्या दरात पुस्तके मिळतील.

– प्रा. प. रा. आर्डे