‘हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही’ हा आशावाद उराशी बाळगून विचार कलहाचा आग्रह धरणार्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संघटीत कार्य सुरु आहे. त्याची द्विदशकपूर्ती आपण नुकतीच साजरी केली. दोन टप्प्यात साजर्या केलेल्या द्विदशकपूर्ती वर्षात आम्ही महाराष्ट्र अंनिसच्या वीस वर्षाच्या वाटचालीत राहून गेलेल्या महत्त्वपूर्ण कामांच्या पूर्ततेसोबत भविष्यात येणार्या आव्हानांचाही विचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला जुन्या-नव्या कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या युवा मनाने उस्फुर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत.
पुण्यात झालेल्या द्विदशकपूर्ती सांगता अधिवेशनाची उपस्थिती असो, वारसा समाजसुधारकांचा अभियानातील विवेकसाथी नोंदणी असो, वा विवेकी युवा शक्ती फाऊंडेशन कोर्समधील सहभाग असो किंवा अगदी विवेक जागर युवा संकल्प परिषदेतील उपस्थिती असो. या सर्व ठिकाणी युवक-युवतींकडून अंधश्रद्धा निर्मूलनासह व्यापक समाज बदलाचा विचार समजून घ्यायला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता संघटना म्हणून उपक्रमशील राहण्यास, शाखा विस्तारण्यास आणि विविधांगी प्रबोधनास गती मिळेल अशी आशा बाळगून आहोत. प्रश्न आहे हा प्रतिसाद व अनुकुलता कृतीशील करण्याचा !
संघटनेच्या 20 वर्षाच्या वाटचालीत सहभागी कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबिय, समविचारी संघटनांचे नेते-पदाधिकारी, जाहिरातदार, देणगीदार, हितचिंतक आणि विविध शैक्षणिक-सामाजिक-सांस्कृतिक- राजकीय-माध्यम क्षेत्रातील मान्यवरांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. वीस वर्ष मिळालेल्या सहकार्याबद्दल समितीची कृतज्ञता त्या सगळ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न द्विदशकपूर्ती वर्षात आम्ही केला आहे. तो सर्वथा यशस्वी नसला; तरीही त्याला जुन्या-नव्यांकडून मिळालेला प्रतिसाद हा उमेद वाढविणारा आहे.
आताच्या परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलनापुढील आव्हाने देखील समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. त्यासाठी समितीची देव-धर्म विषयक भूमिकेचा वैचारिक व संवैधानिक पाया स्पष्ट करताना त्यातील वेगळेपणाचे महत्त्व आणि त्यांच्यामागील मानवतावादी व्यापकत्वाचा वारसा देखील स्पष्ट करावा लागणार आहे. धर्मचिकित्सा आणि धर्मनिरपेक्षता अबाधित राहण्यासाठीची भूमिका व उपक्रमांचे कोणते मार्ग चोखाळायचे इथपासून ते वैज्ञानिक दृष्टिकोन शिक्षणाची क्रमिक चाकोरी तोडून कुठल्या विविध मार्गांनी आणि उपायांनी समाजात रुजविता येऊ शकेल, अशा वैचारिक स्पष्टतांचा प्रयत्न महाराष्ट्र अंनिसने द्विदशकपूर्ती वर्षात करण्याचा प्रयोग केला. आधुनिक जगातील समाजसमुहापुढील प्रश्नांची गुंतागुंत उलगडण्यासाठी, त्यातून येणार्या ताणतणावाच्या आव्हांनाना सामोरे जाण्याचे वैचारिक व भावनिक धैर्य मिळविण्यासाठी काही ठोस कृती करण्याची जाणिवही आम्हाला वृद्धिंगत करावी लागणार आहे.
‘उज्ज्वल उद्यासाठी-वारसा समाजसुधारकांचा-अंधश्रद्धा निर्मूलनाचा, विवेकाचा’ हे राज्यव्यापी अभियान महाराष्ट्र राज्याचे सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आपण आयोजित केले होते. त्यातील भाषणांतून चर्चातून, पुस्तिकांमधून, प्रदर्शनातून आणि लेखनातून समाजमनाचे वैचारिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. फुले-शाहु-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, त्याच्या पुरोगामीत्वाची लक्तरे वेशीवर टांगली जात असताना वैचारिक प्रबोधनाची निरव शांतता भंग करण्याचे काम महाराष्ट्र अंनिसने केले आहे, याची दखल इतिहास नक्कीच घेईल.
अंधश्रद्धांचे व्यापक, मिश्र स्वरुप लक्षात घेता त्याच्या सोडवणुकीसाठी प्रबोधनापलीकडे अधिक व ठोस काही करणे आवश्यक आहे हे आम्ही जाणतो. पण त्यासाठी संघटना म्हणून पुरे पडण्याची मर्यादाही आम्ही जाणून आहोत. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला आज असलेली मागणी, मान्यता आणि त्याची उपक्रमशीलता अधिक प्रभावी व परिणामकारकपणे अंमलात आणावी लागणार आहे. त्यामध्ये अनुभवी, बांधिलकी असणारे सक्षम कार्यकर्ते जसे सक्रीय हवेत, तसेच भावी जगाचे प्रतिनिधीत्व करणारे युवा देखील सहभागी होणे अपेक्षित आहे. म्हणून तरुणाईवर विश्वास व्यक्त करुन त्यांना सहभागाची व जबाबदारीची संधी उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. तसा संदेश संघटना म्हणून आम्हाला आमच्या अभिव्यक्तीतून, कार्यशैलीतून द्यावा लागेल. तो प्रयत्नही या द्विदशकपूर्ती वर्षात समितीचा राहिला आहे.
आज असलेल्या सहकार्यांमधून संघटनांतर्गत कार्यपद्धती विकसीत करण्याचा प्रयत्न आवश्यक आहे, कारण त्यातून आमुलाग्र बदल घडविता येवू शकतो याचा विश्वास आम्हाला वाटतो. त्याची काही ताजी उदाहरणे आपण आज जगात घडतांना बघत आहोत. आधुनिक संवाद तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वसामान्य युवा शक्तीने इजिप्तमध्ये घडविलेला सत्ताबदल, लिबिया मध्ये सत्ता परिवर्तनासाठी सुरु असलेला संघर्ष हे त्याचे दाखले आहेत. आणि त्याच लोण आता जगभर पसरु शकेल असा अंदाजही वर्तविला जात आहे. याचे कारण तरुणाईने ठरविल्यावर ते असे परिवर्तन घडवू शकतात याविषयीचा विश्वास बाळगणे हेच आहे. त्यामुळे जेंव्हा समाजातील प्रश्नांच्या सोडवणुकीच्या प्रयत्नांना एक टप्पा किंवा टोक प्राप्त होते, तेंव्हा त्यामागे रस्त्यावर येणारी युवाशक्ती उभी असणे आवश्यक आहे.त्या जनशक्तीचे दर्शन आपण इराक मधील तेहरीर चौकात बघितले. तसेच विचार कलहाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे चौक आपण आपल्या देशातही विकसित करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी आजच्या युवांना आपण आपले हितचिंतक, समविचारी, सहकारी बनविण्याच्या दिशेने पावले टाकावी लागतील.
– अविनाश पाटील