Categories
चळवळ

 मअंनिसची राज्य कार्यकारीणी सातारा येथे संपन्न

फेब्रुवारी – २०१२

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘जादूटोणा विरोधी कायदा मंजूर करून घेऊच’ असा निर्धार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सातारा येथील राज्य कार्यकारिणीत व्यक्त करण्यात आला. ता.21 व 22 जानेवारी 2012 रोजी सातारा येथील स्वराज सांस्कृतिक कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. महाराष्ट्राच्या विविध विभागाच्या 22 जिल्ह्यातील सुमारे 100 प्रतिनिधी याला उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या बाजूने राष्ट्रवादी विधीमंडळ पक्ष उभे करण्याचे जे ठोस आश्वासन समितीला दिले आहे, त्याचे स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या भूमिका कायद्याला अनुकूल आहेत. परंतु, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रत्यक्ष कायदा संमत होण्याची कृती त्यांच्याकडून व्हावी असा आग्रह प्रतिनिधींनी व्यक्त केला. मात्र यासाठी संवाद साधून राज्यातील काही प्रमुख मान्यवरांच्यासह मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजकीय व सामाजिक इच्छा शक्तीला साकडे घालण्याचे ठरले.

            जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीप्रमाणे येत्या दशकात उदासिनता व व्यसनाधिनता हे मोठे आजार नजीकच्या काळात भारतात वाढतील. यावरील उपचारासाठी समाज अंधश्रद्धेकडे वळण्याचा मोठा धोका आहे. हे लक्षात घेऊन समितीने मानसिक आजारावरील प्रथमोपचाराचा ‘मानस मित्र’ नावाचा अभ्यासक्रम नामवंत मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने केला आहे. नजीकच्या काळात सातारा, ठाणे, धुळे व परभणी येथे त्याचे प्रशिक्षण समिती घेणार आहे.

            समितीचे काम आज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत मात्र महाराष्ट्रातील निम्म्याच तालुक्यात आहे. डिसेंबर 2012 अखेर समितीच्या शाखा प्रत्येक तालुक्यात उभी करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीची रूपरेषा बैठकीत ठरविण्यात आली.

            बैठकीला कार्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यासह राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील(धुळे), प्रधान सचिव सुशिला मुंडे(डोंबिवली), मिलिंद देशमुख(पुणे) यांची प्रमुख उपस्थिती होती.

-युवराज झळके, सातारा