Categories
मानसमित्र

  मानसिक आजार आणि अंधश्रद्धा

फेब्रुवारी – २०१२

मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यांचे नाते फारच जवळचे आहे. याला कारणेही तशीच आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे मानसिक आजार हे ‘आजार’ असतात हेच पटकन लोकांना उमजत नाही. ‘चांगला तर हिंडतो फिरतो आहे. खातोय-पितोय आणि हा कसला आजारी’ ‘अशीच सहज उमटणारी प्रतिक्रिया नेहमी ऐकायला मिळते, याला कारण म्हणजे ‘आजार’ या संकल्पनेत आपल्यापुढे फक्त शारीरिक आजाराचेच चित्र असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आजार जरी प्राचीन काळापासून आढळत असले, तरी त्यावरची प्रभावी उपचार पद्धती अगदी गेल्या साठ-पासष्ट वर्षातच शोधण्यात आली आहे. तसेच भारतातील मानसिक आरोग्य सेवांची अवस्था अगदीच कींव करण्यासारखी आहे. संपूर्ण आरोग्य सेवावरील खर्चाच्या केवळ एक टक्का रक्कम मानसिक आरोग्यसेवेवर खर्च होत आहे. इतर देशात हेच प्रमाण दहा ते अठरा टक्के आहे.

मानसिक रुग्णांच्या बाबतीत आपल्या समाजात खालील पिरॅमिड दिसतो. म्हणजे एकूण मनोरूग्णांपैकी किती कमी मनोरूग्णांना योग्य उपचार मिळतो ते या पिरॅमिडवरून आपल्याला कळू शकते.

संपूर्ण भारतात 43 सरकारी मेंटल हॉस्पिटल आहेत व त्यात मनोरुग्णांसाठी सुमारे 20,000/- बेडस् आहेत. त्यातही बरी गोष्ट म्हणजे यातील चार मेंटल हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत.

भारतातील मानसिक आरोग्य सेवेचे विदारक चित्र पुढील आकड्यांवरून अधिक स्पष्ट होते.

दर एक लाख लोकसंख्येमागे         भारतात
मनोरूग्णांसाठी हॉस्पिटल बेड          2.5
मेंटल हॉस्पिटलमध्ये बेडस्             2.00
जनरल हॉस्पिटलमध्ये मनोरूग्णांसाठी बेड  0.5
सायकीएट्रीस्ट                      0.3
सायकीएट्रीक नर्सेस                  0.04
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट             0.02
सायकीअ‍ॅट्रीक सोशल वर्कर            0.02

मध्यप्रदेशात एका मानसिक आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांची माहिती मिळवण्यात आली, त्यात असे लक्षात आले की, या केंद्रात रुग्णांना सरासरी 250 कि. मी. प्रवास करून यावे लागते. या स्टडीमध्ये असेही आढळले की बहुतांशी रुग्ण मानसोपचारासाठी येण्याआधी बाहेरच्याच उपचारांकडे आधी वळतात. योग्य उपचारापयर्ंंत पोहोचण्यास त्यांना सरासरी 6 महिन्यांचा उशीर होतो. काही काही पेशंटस् मध्ये तर हा उशीर दहा वर्षापर्यंतचा होता.

कोणत्याही मानसिक आजाराचे भवितव्य हे आजाराची लक्षणे सुरु झाल्यापासून किती वेळात योग्य उपचार सुरु झाले यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.

जितक्या लवकर योग्य उपचार सुरु होतील, तितके आजारातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे बाहेर पडण्याची शक्यता असते. उशीर जेवढा जास्त तेवढे योग्य उपचारांनाही योग्य प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी होत जाते. म्हणूनच मनोरूग्ण लवकरात लवकर योग्य उपचारांकडे वळाले पाहिजेत. ‘बाहेरचा’ उपचार करण्यात त्यांनी वेळ घालवला की, रुग्णाच्या आयुष्यावरच त्याचे गंभीर परिणाम होतात. त्याच्या आयुष्यात, फार मोठा गुणात्मक फरक पडू शकतो, म्हणूनच अशा इकडच्या-तिकडच्या, बाहेरच्या उपचारांना फाटा देऊन मनोरूग्ण लवकरात लवकर योग्य उपचारांसाठी पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे.

आज समाजातील अंधश्रद्धांच्या पगड्यामुळे मानसिक आजारासाठी मनोरुग्णांना डॉक्टरांकडे नेण्याचे प्रमाण कमी आहे. दुर्दैवाने जनरल प्रॅक्टीशनर्स म्हणजे अगदी एम. बी. बी. एस. पर्यंतच्या डॉक्टरांना सुद्धा अजून मानसिक आजाराविषयीचे ज्ञान दिले जात नाही. त्यामुळे असे रुग्ण कसे ओळखावे, त्यांना प्राथमिक उपचार कसे करावे आणि तज्ञ मानसोपचारांसाठी त्यांना केव्हा पाठवावे याचे ज्ञान त्यांना नसते.

त्यामुळे इतर उपचार-बाहेरचे उपचार करण्याकडे कल मोठ्या प्रमाणात आढळतो. हे बाहेरचे उपचार म्हणजे कधी ब्राह्मणाकडे जाणे-कुंडली पाहणे, ग्रहतार्‍यांची परिस्थिती, स्थान, त्यांचे आपापसातले हेवे दावे, त्यांचे सरळ चालणे-वाकडे चालणे, चुकीच्या घरात जाऊन बसणे अशा निदानानंतर साहजिकच शांती करणे म्हणजे अमुक यज्ञ, तमुक विधी असे प्रकार येतातच.

तसेच भगताकडूनही उपचार केले जातात, प्रत्येक गावात भगत असतोच, साधारणत: हा अघोरी प्रकार करणारा, प्रामुख्याने भांग, गांजा, दारू यांच्या आहारी गेलेला माणूस असतो आणि तो स्वत:च्या अंगात आणून हडळ, भुते काढण्याचा विशिष्ट कार्यक्रम करीत असतो.

सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सर्वच धर्मात हिंदु, मुस्लीम आणि ख्रिश्चनही, अशी काही ‘स्थाने’ किंवा ‘ठाणे’ असतात की जिथे मनोरूग्णांवर विशेष इलाज केले जातात. अक्कलकोट, गाणगापूर जाळीचा देव, गुजराथेत बालाजीची काही देवळे आहेत. तामिळनाडूत हनुमंतपुरम सारख्या ठिकाणी शंकराची मंदिरे आहेत म्हणजे मनोरूग्णांवर असे उपचार करणे ही काही एका विशिष्ट राज्याची स्पेशालिटी नाही.

दर्गे तर यासाठी खूपच प्रसिद्ध आहेत. मीरा दाताराचे दर्गे, सौलानी बाबांचा दर्गा, रामोशीबाबांचा दर्गा यांसाठी प्रसिद्ध आहेत. माहिम, कल्याण, चाळीसगांव, बुलढाणा असे महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध दर्गे आहेत. परंतु भारतभरातील अनेक दर्ग्यावर अशा प्रकारचे उपचार केले जातात. त्यातीतल एक प्रसिद्ध दर्गा तामिळनाडूत एरवडी येथे आहे.

ह्याच एरवडी येथील दर्ग्यात 2000 साली मोठी आग लागली होती. आणि त्यात जे मनोरूग्ण खांबांना साखळदंडाने बांधून ठेवले होते. अशा पंचवीस जणांचा जळून मृत्यु झाला होता. साखळदंडाने बांधलेले असल्याने ते पळून जाऊन स्वत:चा बचाव करू शकले नाहीत.

अशा ठिकाणी करण्यात येणारे हे उपचार पाशवी आणि अमानुष असतात, त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन तर होतेच होते.

रुग्णांना उपाशी ठेवणे, त्यांना फटक्यांनी मारणे, भूत उतरवण्याच्या नावाखाली त्यांना चटके देणे, केस कापणे याबरोबरच अनेक स्त्रिया आणि मुलांवरही लैंगिक अत्याचार होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

अशा उपचारांमुळे पुष्कळदा रुग्णांना विविध प्रकारचे जंतु-संसर्ग होतात, कुपोषण होते आणि त्यात रुग्ण मृत्युमुखी सुद्धा पडू शकतो.

शिवाय योग्य उपचारांना उशीर झाल्यामुळे मूळ मानसिक आजार जुनाट स्वरूप धारण करतात आणि त्यामुळे अशा रुग्णांमध्ये पुढे फरक पडणे अवघड होऊन बसते.

आम्हाला असा प्रश्न नेहमीच विचारला जातो की, मग असे उपचार चुकीचे असतील तर त्या उपचारांमुळे बरे झालेले लोक आम्हाला दिसतात ते कसे? इथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की बरे वाटणे व आजार बरा होणे यात फरक आहे. अशा उपचारांमुळे काही रुग्णांना, काही आजारात, काही प्रमाणात, काही काळापुरते बरे वाटू शकते म्हणजे त्यांची लक्षणे काही काळापुरती कमी होतात याचा अर्थ आजार बरा झाला असा होत नाही. अशा ठिकाणी बरे वाटण्याची जी कारणे आहेत, त्या कारणांचाही अभ्यास मानसोपचार तज्ञांनी केला आहे. असे बरे वाटण्यामागे दैवी शक्ती वगैरे काही नसून केवळ रुग्णांच्या मनातील मानसिक खेळांचाच तो परिणाम असतो हे निर्विवादपणे लक्षात आले आहे.

कधी स्वत:तील अपराधीपणाची भावना कमी झाल्यामुळे, कधी स्वत:ला प्रायश्चित करून घेण्याची अंतर्मनाची गरज पूर्ण झाल्याने, कधी मनातील दबल्या गेलेल्या तीव्र भावनांचा निचरा झाल्यामुळे, कधी विकृत वातावरणातून बाहेर पडल्यामुळे, कधी नातेवाईकांकडून भरपूर लक्ष मिळण्याची गरज पूर्ण झाल्याने मनोरूग्णांच्या लक्षणांमध्ये फरक पडू शकतो. परंतु लक्षणात फरक पडला तरी आजाराचे मूळ तसेच राहते आणि आजार पुन्हा उफाळण्याची शक्यताही तशीच राहते.

काही लोकांकडून असा प्रचार केला जातो की, असे उपचार करणार्‍या भगत, दर्ग्यावरचे लोक, आणि मंदिरातले पुजारी यांनाच आपण मानसिक आरोग्य सेवेत सहभागी करून घ्यावे त्यांना थोडे प्रशिक्षण द्यावे आणि ते मग मनोरूग्ण ओळखून योग्य उपचारांसाठी त्यांना मार्गदर्शन करतील.

असा विचार योग्य वाटत नाही कारण असे रुग्ण हे त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उत्पन्नाचे आणि प्रतिष्ठेचे साधन बनलेले असते हे साधन सहजगत्या हातातून जाऊ देण्यास ते लोक तयार होणार नाहीत. झाले तरी स्वत:च्या उपचार पद्धती वापरल्यानंतरच ते डॉक्टरकडे पेशंट वळवतील त्यात त्या उपचार पद्धतीमुळे होणारे तोटे होतीलच आणि ट्रिटमेंटला येण्यात रुग्णाचा जो महत्वाचा काळ वाया जाईल त्याचे काय? शिवाय अशा प्रकारामुळे या सर्वांना आपण एक प्रतिष्ठा प्राप्त करून देत आहोत, नकळत या अशास्त्रीय उपचारांना एक मान्यता मिळवून देत आहोत त्याचे काय? मग या न्यायाने गावा-गावात, चोरट्या लॉजमधील रुममध्ये राहून ‘लग्ना आधी लग्नातंर…’ अशा जाहिराती करून व्यवसाय करणार्‍या सेक्स-थेरपीस्टलाही आपल्याला उद्या मान्यता द्यावी लागेल.

-डॉ. प्रदीप जोशी