धामोरी, ता.कोपरगाव येथील अलका रवींद्र तुपसेंद्रे ही पंचवीस वर्षांची महिला. एवढ्या कमी वयातच तीन अपत्यांची आई झाली. त्यातच नवर्याशी एक दिवस कडाक्याचे भांडण झाले; त्यात तिने विष प्राशन केले. तिला तात्पुरते दवाखान्यात दाखविले. घरी आल्यानंतर तिला मानसिक आजाराने सौम्य झटके येऊ लागले. नंतर मात्र तिच्या नवर्याने व आईने मनोविकार तज्ञांकडे नेले नाही. सर्व कुटुंबच अंधश्रद्धेत बुडाले असल्यामुळे त्यांना हे झटके म्हणजे भुताने झपाटले आहे असे वाटले. त्यामुळे अलकाला तिच्या आईने त्याच गावातील मांगीरबाबाच्या दरबारात नेले.
मांगिरबाबाच्या मंदिरात दर अमावास्या, पौर्णिमा व शनिवारी दरबार भरत असे. भागवत हरी वाकळे व भिकाजी लक्ष्मण ताते(रा.खंडाळा, ता.श्रीरामपूर) हे दोन मांत्रिक हा दरबार चालवत. दरबार चालू झाल्यावर जवळपास हजारावर लोक जमा होत. सकाळी आलेल्या भाविकाचा संध्याकाळी नंबर लागायचा. प्रत्येक भाविकांच्या कोणत्याही समस्येवर या दरबारात तोडगा निघतो व प्रत्येक आजारातून रूग्ण बरा होतो असा मांत्रिक दावा करत असे. प्रत्येक भाविकास मात्र पाच किंवा अकरा वेळा हजेरी लावावी लागे. खास भाविकांना मात्र मांत्रिकाच्या अंगात संचार आल्यानंतर समस्येवरचा उपाय सांगितला जात असे. अलकाच्या आईने अलकाला ह्या मांगिरबाबाच्या दरबारात नेले कारण अलकाच्या आजीला ह्याच दरबारात गुण आला अशी त्यांची ठाम समजूत होती. मांत्रिकाने अलकास संचार आल्यानंतर तपासले. अलकाच्या मृत पुतणीने अलकास झपाटले आहे. अलकाने मुलास जन्म दिल्याच्या खोलीतच पूर्वी तिच्या पुतणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रसुतीच्या काळातच तिच्या मृत पुतणीने तिच्या शरीरात प्रवेश केला. त्यामुळेच अलकाला झपाटले गेले आहे. अलकाच्या पुतणीचा मृत्यू विषप्राशनाने झाला होता. अलकानेसुद्धा विषप्राशन केले होते. मांत्रिकाच्या सल्ल्यामुळे कदाचित मृत्यूची भीती वाटत असावी. ती मृत पुतणी अलकाच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी दरबारात पाच खेटी(हजेरी) कराव्या लागतील असा सल्ला मांत्रिकाने अलकाच्या आईस दिला. त्यानुसार तीन खेटी पूर्ण झाल्या होत्या.
दोन जून रोजी सिन्नरचे अरूण घोडेराव यांचा मला फोन आला. धामोरी येथील मांगीरबाबाच्या दरबारात एका मृत व्यक्तीवर जिवंत करण्यासाठी उपचार होत असल्याची पक्की माहिती त्यांना मिळाली होती. ह्या प्रकारात लक्ष घालण्याची त्यांनी मला विनंती केली. मी तत्काळ वेगवेगळ्या पद्धतीने माहिती जमा केली. बातमी खरीच होती आणि गंभीरही होती. डॉ.दाभोलकर व अविनाश पाटील यांच्याशी चर्चा करून या गंभीर प्रकरणाची रणनीती ठरविली. ह्या घटनेच्या ठिकाणाचे पोलीस ठाणे कोपरगाव आहे. संबंधित पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षक माझ्या ओळखीचे असल्यामुळे हिंमत आली. परंतु नाशिकवरून घटनास्थळी पोहचण्यास दोन तासांचा कालावधी जाणार होता. मृत महिलेचे शवविच्छेदन करण्यासाठी प्रयत्न करेपर्यंत अंत्यविधी होत असल्याची बातमी मिळाली. मुख्य पुरावा हातातून सुटला होता.
ती मृत महिला अलका रविंद्र तुपसेंद्रे नावाची महिला होती. प्रथम गावकर्यांकडे चौकाशी केली. परंतु सर्वच मूग गिळून गप्प होते. मग तिचं घर गाठलं दु:खी वातावरणात कुणीच माहिती देत नव्हते. मग मांगिरबाबाच्या मंदिरात गेलो. तेथे मांत्रिक होताच. थोडं वेड्याचं सोंग करतच दर्शन घेऊन मांत्रिकाबरोबर गप्पा केल्या. करणी-भानामती वगैरे कसं खरं असतं हे मीच मांत्रिकास पटवून दिले. त्यामुळे मांत्रिकास हुरूप आला असावा. कारण ह्या भयानक घटनेची चिंता त्याच्या चेहर्यावर स्पष्टपणे जाणवत होती. मी त्याला धीर दिला. मग तो बोलू लागला की, मी मातंग समाजाचा आहे. गावात तर आमचं एकच घर आहे. त्यामुळे मी माझ्या मेहुण्याला येथे बोलावत असतो. त्याच्याबरोबर दरबार चालवतो. त्याच्या अंगात संचार येत असल्यामुळे गर्दी होते. आमच्याकडे पोलीसपण येतात आजारातून बरे होण्यास वगैरे वगैरे…. मांत्रिकाचं बोलणं ऐकून त्याच्या अज्ञानपणाचे मला दु:ख वाटले. मी त्याला आण्णाभाऊ साठे समजून सांगितले. मागील महिन्यात कोपरगावात मातंग समाजाचं उपोषण झाले. त्यातही मी सहभागी झालो असल्याचे मी त्यास सांगितले. त्यामुळे त्याला माझ्याबद्दल विश्वास वाटला. तो भावनाविवश झाला मग मात्र मी घडलेल्या घटनेबद्दल विचारले. संपूर्ण संभाषण रेकॉर्डिंग होत होते. मांत्रिकास मन मोकळं करायचं होतं.
त्या दिवशीचा प्रसंग मांत्रिक सांगू लागला. अलकाला तिच्या पुतणीने झपाटले होते. सकाळी आठ वाजताच ती मंदिरात आली. दर्शन घेऊन गाभार्यातच होती. मांत्रिकाने अलका मांगिरबाबाशी संवाद करत पडलेली बघितली. तशीच ती जमिनीवर पडली. मग मांत्रिकाने तिला उघड्यावरच आंघोळ घालण्यास सांगितले. मांत्रिकाला स्वत:चे घर असले तरी अलकाच्या आई व इतर स्त्रियांनी अलकास उघड्यावर पिंपळाच्या झाडाखाली थंड पाण्याने आंघोळ घातली.
त्यानंतर मांत्रिकाने तिला अंगारा वगैरे दिला. त्यादरम्यान तिचा मृत्यू झाला हे खरे असले तरी त्याची जबाबदारी मांत्रिकांनी टाळली. शेजारच्या काही तरूणांकडून मी माहिती घेतली. त्या तरूणांच्या मतानुसार, उपचार करण्यासाठी आंघोळ घालण्यास सांगितले. ते दृश्य पाहून लज्जेमुळे ते तरूण बाजूला गेले. नंतर पुन्हा आल्यानंतर त्या तरूणांना अलका मृत झाल्याचे लक्षात आले. परंतु तिच्या मृत शरीरावर मांत्रिकाकडून उपचार झाल्याचे त्या तरूणांचे मत आहे. तरूणांनी विरोध केल्यानंतर बर्याच वेळेनंतर मृतदेह हलविला गेला होता.
अलकाच्या नातेवाईकाशी बोलल्यानंतर त्यांचा अशा उपचारावर विश्वास असल्याचे जाणवले. व मांत्रिकाविषयी त्याची काहीच तक्रार नव्हती. ह्या दरबाराऐवजी औरंगाबादच्या दर्ग्यात अलका वाचली असती असे तिच्या नवर्याचे मत होते. नंतर पुन्हा मी मांत्रिकास मी अंनिसचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले व आत्तापर्यंतच्या विविध बुवाबाजी संघर्षाच्या वृत्तपत्रातील बातम्या दाखविल्या. ते बघून मांत्रिक पुरता घाबरून गेला. त्याच गावात मी काशीच्या पंडितांचा भांडाफोड केल्याचं त्याला माहीत होतं. ‘ह्या क्षणापासून दरबार पुन्हा कधीही सुरू होऊ देणार नाही’ ह्या भूमिकेवर त्याने संमती दर्शविली.
कोपरगाव पोलीस स्टेशनला मी रितसर तक्रार अर्ज दाखल करून ‘ड्रग्ज अॅन्ड मॅजिक रिमीडीज अॅक्ट’ नुसार कारवाईची मागणी केली. मृत अलकास न्याय मिळवून देण्याची विनंती केली. घटनेची सखोल चौकशी करण्यास पोलिसांनी स्वत: फिर्याद दाखल करावी ही माझी भूमिका होती. पोलिसांनी उल्लेख केलेल्या सर्वांना अटक केली. पोलीस ठाण्यात बाबाच्या समर्थक भक्तांची गर्दी झाली. अनेकांनी मला दमदाटही केली. पोलिसांना चार-पाच वेळा हस्तक्षेप करावा लागला. त्या सर्वांच्या लेखी मी एकटाच होतो. परंतु अंनिसची प्रचंड ताकद माझ्यामागे होती. त्यामुळे मी निश्चिंत होतो मी माझ्या चौथ्या कोर्टकेससाठी सज्ज झालो. वृत्तपत्रातील बातम्या वाचून काही गावकर्यांनी बाबाच्या दरबारावर हल्ला केला व गाव सोडून जाण्यास सांगितले.
अशा रूग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी अंनिसच्या मानसमित्रांनी किती व्यापकपणे काम करणे गरजेचे आहे हे अधोरेखित होत आहे.
-कृष्णा चांदगुडे