13 मे 2013 च्या दै.सकाळ मधील ही बातमी ऐकल्यावर मन चक्रावून गेले. लहानपणचे गाणे आठवले .येरे येरे पावसा तुला देतो पैसा … आता असे बरेच पैसे पावसाकडे इतके वर्ष साठल्याने आता पैशाचा पाऊस पडणार ही कल्पना त्या तथाकथित बुवाने त्या खुनी माणसाच्या मनात भरवली असणार.अशा पैशाच्या पावसासाठी दोन नरबळी देण्यासाठी त्याला उद्युक्त केले असणार ….!
सुनील बबन पाचंगे, या दापोडीच्या तरुणाने चाकण मधल्या मित्राचा आणि त्याच्या वयोवृद्ध आईचा गळा चिरून खून केला होता.घटना शहरी भागातील असल्याने असल्या खुळचट कल्पना फक्त खेड्यापाड्यात दूरवर मराठवाड्यात किंवा तिकडे कोकणात घडतात ह्या माझ्या समजुतीला तडा गेला होता.चाकण तर पुण्यापासून अगदी 40-50 कि.मी. वरील गाव ! एकदा त्या खुनी माणसाला बघाव तरी ..! आपल्या बरोबर रोज वावरणार्या मित्राला आणि त्याच्या वृद्ध आईला गळा चिरून मारताना त्याला काहीच वाटले नसणार..!
हा पाचंगे म्हणे तबला वादन आणि संगिताचे क्लासेस चाकण मध्ये घेत असे .संगिताच्या सूर तालात मन् रिझवणार्या ह्या माणसाला त्या बाईचा गळा चिरताना काहीच कसे वाटले नाही? ज्या गळ्यातून कोमल सूर बाहेर पडावेत त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडवताना ह्या संगीत प्रेमी माणसाचे हृदय द्रवले कसे नाही..? पैसा माणसाला इतके विकृत बनवतो ?असे नानाविध प्रश्नांचे कल्लोळ मनात असतानाच मिलिंद देशमुखांचा मोबाईल आला .काय काका काढता का थोडा वेळ ? चाकणला जायचं आहे तिघे चौघे मिळून ! तेथील पोलीस कचेरीत एक निवेदन द्यायचे आहे. मी मनात म्हटले तिथला आपला कार्यकर्ता देईल की निवेदन आपण कशाला आपला वेळ घालवायचा? पण पैशाच्या पाऊस वाल्या खुनी माणसासंबंधी निवेदन द्यायचे आहे म्हटल्यावर मी तत्काळ हो म्हटलं.
मी, मिलिंद आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या कार्याध्यक्ष शुभांगी घनवट दुपारी एकच्या सुमारास चाकण पोलीस चौकीत हजर झालो. चाकण मधील आमचे कार्यकर्ते आमचीच वाट पाहत होते.चाकण मध्ये कुठं एखादा बुवा पकडायचा आहे असं ठरलं की चाकणच्या या कार्यकर्त्यांना मिलिंदला गाठल्याशिवाय चैनच पडत नाही.गेल्या वर्षी सुद्धा याच खेड-चाकण परिसरात पाच दिवसात पाच बुवा बाबा पकडले होते .त्यामुळे खेड चाकणच्या पोलीस चौक्या अंनिस कार्यकर्त्यांना परिचयाच्या झाल्या आहेत. पोलिसांना सुद्धा अंनिस बाबत कमालीचा आदर आहे. त्यामुळेच आमच्या सर्वांचे तिथल्या पोलीस चौकीत स्वागत झाले.ज्या पोलीस इन्स्पेक्टरकडे ह्या घटनेचा तपास होता त्याच्या केबिनमध्येच आम्ही सर्वानी कोंडाळे केले.
प्रथम मिलिंदने पो.इ .चे अभिनंदन केले की इतक्या कमी वेळात खुनी माणसाला पकडण्यात यश मिळवले म्हणून..! निवेदनात पोलिसांचे अभिनंदन तर होतेच पण अशा प्रकारचे खून करण्यास प्रवृत्त करणार्या बुवा मांत्रिकाला लवकरच जेरबंद करावे अशी कळकळीची विनंती होती. निवेदनाच्या सरतेशेवटी अंनिसचे कार्यकर्ते आपणास बुवा/मांत्रिकाला पकडण्यात नक्कीच कधीही ,केव्हाही आणि कुठेही मदत करतील असे ठोसपणे नमूद केले होते.
मला ज्या आरोपीला बघण्याची उत्कंठा मनात लागून राहिली होती त्यासाठी फार वाट पहावी लागली नाही कारण थोड्याच वेळात आरोपीचे दर्शन आम्हाला पोलीस चौकीत झाले. खुनी माणूस असा असतो तर..!असे लगेच मनात आले. तो काही असा आडदांड नव्हता की त्याचा चेहरा असा क्रूर दिसत नव्हता .पण निर्बुद्धपणा मात्र त्याच्या चेहर्यात लपत नव्हता .
पो.इ .कडून या खुनाचा तपास कसा लागला हे ऐकण्यास आम्ही सर्वच उत्सुक होतो.पो.इ. सांगू लागले ….साबळे वाडीतील सार्वजनिक विहिरीत 50 वर्षीय बाईचा मृतदेह आढळून आला .मृतदेहाची ओळख पटून तो दुर्गाबाई जगताप यांचा असल्याचे कळले .तिचा 25 वर्षाचा मुलगा धनंजय गेल्या 4-5 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समजले. तपासाच्या निमित्ताने लोणावळा पोलीस स्टेशनला गेलो असता तिथे सदर मुलाच्या मृतदेहाचा फोटो चौकीत बघायला मिळाला .त्यामुळे सदर वृद्धेचा खून तिच्या मुलानेेकेला असावा ह्या गोष्टीला फाटा मिळाला .धनंजयच्या संपर्कातील व्यक्तिमध्ये सुनील पाचंगे आहे हे पोलिसांच्या ध्यानांत आले. त्याचेकडे कसून चौकशी केली नंतर त्याच्या मोबाईलमधील काँल डीटेल मधून तो 21 एप्रिल च्या रात्री साबळे वाडीत होता हे सिद्ध झाले. थोडा पोलिसी खाक्या दाखवलेवर पाचंगने गुन्हा कबूल केला.मुलाचा खून 18 एप्रिलला तर आईचा खून 21 एप्रिलला रात्री 12 वाजता केल्याचे त्याने सांगितले..गुन्हा करण्याचे कारण मात्र अजब दिले आहे की चाकण येथील एका बुवा/मांत्रिकाने, दोन नरबळी दिल्यानंतर पैशाचा पाऊस पडेल असे सांगितले म्हणून खून केले. पैशाच्या हव्यासापोटी दोघांना ठार मारले.
आता चाकण पोलीस संबंधित बुवा/मांत्रिकाचा शोध घेत आहेत.आता त्या बुवा महाराजाने दूरवर पोबारा केला असणार !सुनील कडून आणि अशाच काही लोभी लोकांकडून त्या बुवाने बरेच पैसे असे काही बाही सांगून उकळलेले असणार.आता तपासाची गती चाकण मधील बुवाच्या अनुभवाचे किस्से पुढे आल्यावर ,पुढे सरकणार. पो.इ. च्या केबिनमधून बाहेर पडता पडता त्यांच्या टेबलावर एक पितळी कासवाची प्रतिमा माझ्या नजरेतून सुटली नाही.कासवाची मूर्ती ठेवल्यावर धनलाभ कासवगतीने न होता भरभर होतो अशी श्रध्दा बरेचजण बाळगून असतात. अशा किती किती अंधश्रद्धा निपटण्यात आपणास यश केव्हा येणार?
– विश्वास पेंडसे, निगडी, पुणे
