Categories
अंधश्रद्धा

‘नागमणी’चा डंख

ऑगस्ट - २०११

            मागील महिन्यात सांगलीतील एक प्रसिद्ध बिल्डर विजय फडके(नाव बदलले आहे.) यांचा मला फोन आला. एका बुवाने त्यांना 5 लाखांचा गंडा घातला होता. त्याविषयी माहिती मला ते फोनवर सांगत होते. मी त्यांना भेटायला बोलविले. तत्परतेने ते भेटायला आले. फडके तसे धार्मिक विचारांचा पगडा असलेले. सध्या त्यांच्या धंद्यामध्ये व कुटुंबामध्ये प्रचंड वाद सुरू असल्याने त्यांना कोणीतरी त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबळीची पूजा करायला सांगितली. सहकुटुंब जाऊन त्यांनी ती पूजा घातली. तरीही फडकेंच्या धंद्यात व कुटुंबातील वादात काही फरक पडला नाही. म्हणून त्यांनी पुन्हा त्र्यंबकेश्वरला जाऊन दुसर्‍यांदा त्याच भटजीकडून पूजा घातली. त्यावेळी भटजींना त्यांनी पूजा घालूनही गुण आला नाही असे सांगितले. त्यावर भटजी म्हणाले, तुमच्यावर भयंकर मोठे संकट असल्याने या पूजेचा उपयोग म्हणावा तेवढा होणार नाही. तुम्हाला मी एक जालिम व खात्रीशीर उपाय सांगतो. तो म्हणजे तुम्ही स्वत:जवळ ‘नागमणी’ ठेवा. त्यावेळी भटजींनी त्यांना नागमणीचे महत्वही सांगितले. हा नागमणी तुम्हाला आंध्रप्रदेशच्या जंगलातील आदिवासीकडून मिळेल असे सांगून भटजीने त्यांना आंध्राच्या एका एजंटचा फोन नंबर दिला. समस्याग्रस्त फडकेंनी शेवटचा उपाय म्हणून नागमणी घेण्याचे ठरविले. त्यांनी त्या एजंटला फोन केला. एजंटाने सध्या नागमणी उपलब्ध नाही अजून दोन आठवड्यांनी फोन करा असे सांगितले. पण फडकेंना घाई झालेली. त्यांनी एजंटाला नागमणी लवकर मिळवा म्हणून विनंती केली. दोन दिवसांनी एजंटचा फडकेंना फोन आला. इकडे काही आदिवासींना नागमणी मिळाला आहे. पण हा नागमणी अत्यंत मौल्यवान असल्याने त्याची किंमत 7 लाख रूपये तुम्ही देण्यास तयार आहात का? असे एजंटनी विचारले. एवढी किंमत म्हटल्यावर फडके विचारात पडले. परंतु त्यांची समस्या मोठी होती. शेवटी घासाघीस करून व्यवहार 5 लाखांवर ठरला. एजंटाने रोख पैसे घेऊन हैद्राबादला बोलवले. आपल्या डॉक्टर मुलासोबत रोख पैसे घेऊन फडके हैद्राबादला गेले. हैद्राबादमध्ये त्यांची व त्या एजंटची भेट झाली. त्या एजंटने स्वत:च्या गाडीतून त्यांना 5-6 तास प्रवास करून एका जंगलात नेले. तेथील आदिवासीसारखा पेहराव केलेल्या एका व्यक्तीकडून त्यांनी गोलाकार आकाराचा 6-7 से.मी.चा एक चकाकणारा, तेजस्वी ‘नागमणी’ त्यांना दिला. या मौल्यवान नागमणीची पूजा करण्याची पद्धतही त्या आदिवासींनी फडकेंना सांगितली. व त्यांच्याकडील 5 लाख रूपये ताब्यात घेतले. मोठ्या आनंदाने तो तेजस्वी नागमणी घेऊन फडके सांगलीला आले. कुटुंबातील सर्वांना एकत्र बोलवून त्यांनी त्या नागमणीची पूजा घातली. त्यांनी तो तेजस्वी नागमणी देव्हार्‍यात ठेवून दिला. दोन आठवड्यानंतर मात्र त्यांना एक मोठा धक्का बसला. त्या तेजस्वी नागमणीचे तेज अचानक कमी झाले. त्यातून बाहेर पडणारा मंद प्रकाश बंद झाला. फडकेंच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांच्या इंजिनियर सुनेने तो नागमणी व्यवस्थित निरखून पाहिला. तेव्हा तिला धक्काच बसला. तो नागमणी नसून एक काचेचा शुभ्र पांढरा गोलाकार गोळा होता. आणि त्याच्या आतमध्ये बॅटरी सर्कीटवर चालणारा अत्यंत छोटा बल्ब होता. त्यातील बॅटरी संपल्यामुळे त्या नागमण्याचे तेज गेले होते. आपली फसवणूक झाली आहे हे फडक्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या एजंटला लगेच फोन लावला. एजंटने त्यांना फोनवर अक्षरश: धमकावलेच. इकडे आला तर जिवंत परत जाणार नाही असा दम भरला. फडकेंनी मग त्र्यंबकेश्वरच्या त्या भटजीला फोन करून तुम्ही सांगितलेल्या माणसाने मला फसविले आहे असे सांगितले. पण त्या भटजीनेही त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. भटजीचे आणि त्या एजंटचे असा गंडा घालण्याचे रॅकेटच आहे असे वाटते.

            शेवटी फडकेंनी नाईलाजाने पाच लाख रूपये अक्कलखाती जमा करून टाकले. त्यानंतर त्यांना कुणीतरी अंनिसबद्दल सांगून माझा फोन नंबर दिला. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. मी त्यांना तुमच्या या फसवणुकीची सविस्तर लेखी तक्रार लिहून देण्यास सांगितली परंतु फडकेंनी लेखी तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला. एकूणच त्यांचे वागणे पलायनवादी होते. त्यांचे म्हणणे असे की, माझे नाव न घेता तुम्ही सर्व कारवाई करा आणि माझे पैसे परत मिळवा.

मी फडकेंना नागाच्या डोक्यावर नागमणी असतो ही एक अंधश्रद्धा आहे असा कोणताही नाग जगामध्ये अस्तित्वात नाही असे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते पटेना. त्या भटजी व एजंटाने मला खोटा नागमणी दिला पण मी ‘खरा नागमणी’ एके दिवशी मिळवीनच असे सांगून ते ताडकन् निघून गेले. तात्पर्य काय, उच्च शिक्षित, उच्च जातीय मंडळींही ‘नागमणी’ सारख्या फालतू गोष्टींवर विश्वास ठेवतात. व स्वत:ची फसवणूक करून घेतात. फसल्यानंतर फक्त पैसे परत मिळावे म्हणून समितीकडे येतात तरीही स्वत:च्या नावाने लेखी तक्रार द्यायला घाबरतात. केवढा हा धार्मिक दहशतवाद व पळपुटेपणा. अशानेच बुवांचे फावते.

राहुल थोरात

रात्रीच्या वेळी डोक्यावरचा नागमणी बाजूला ठेवून नाग शिकाराीसाठी त्याच्या उजेडात जवळपास भटकतात. त्या सापाची नजर चुकवून नागमणी पळवून आणता येतो असे तस्कर सांगतात. ही लबाडी आहे. कुठल्याही नागाजवळ नागमणी नसतो. सर्पविषयक अशा भरपूर अंधश्रद्धा समाजात प्रचलित आहे. सर्प व इतर प्राणी विषयक अंधश्रद्धांचे सदर पुढील अंकापासून सुरू करीत आहोत –संपादक