गुप्तधनाच्या आमिषापोटी दुतोंडी साप म्हणून मांडुळ जातीच्या दुर्मिळ सापाची विक्री करणार्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. बोगस गिर्हाईक बनून मिरज शहर पोलिसांनी शनिवार दि.23 जुलै रोजी रात्री आठ वाजता ही कारवाई केली. चंद्रकांत माणिकराव गायकवाड (वय 35, रा.गायकवाड वस्ती, डफळापूर, ता.जत, जि.सांगली) व आजिद अकबर मुजावर(वय 35 रा.डफळापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती अशी : महिन्याभरापूर्वी चंद्रकांत गायकवाड यांना वैरण काढताना मांडुळ जातीचा दुर्मिळ साप सापडला. हा साप घेऊन चंद्रकांत रस्त्याच्या कडेला थांबले होते. याचवेळी जत-सांगली वडाप करणारा चालक आजिद मुजावर यांनी पाहिले. त्यांनी खाली उतरून चौकशी केली. आजिद यांनी चंद्रकांतला बाजूला घेतले. भानामती व गुप्तधनाच्या यज्ञासाठी या सापाचा बळी दिला जातो. याला मोठी किंमत मिळते. तुला आठ लाख रूपये देतो. साप जपून ठेव, असे त्याला आजिदने सांगितले. त्याप्रमाणे चंद्रकांतने एका मडक्यात माती घालून सापाला जपून ठेवले. गेले महिनाभर दोघांनी अनेक गिर्हाईकांशी संपर्क साधला, पण मनासारखी किंमत न मिळाल्याने त्याची विक्री झाली नाही.
मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना 25 लाखाला विक्री होणार असल्याची खबर मिळाली. त्यांनी मिरज शहर ठाण्यातील संजय चव्हाण, सागर आंबेवाडीकर, प्रशांत कोळी आदी कर्मचार्यांचे पथक तयार केले. बोगस गिर्हाईक बनून दोघांनाही रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर जत पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षक कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.