Categories
भांडाफोड

पुत्रकामेष्टी यज्ञ करणार्‍या भोंदूचा पर्दाफाश

ऑगस्ट - २०११

            रावण संहिता, भृगुसंहिता व गर्भसंहितेचे पंडीत असल्याचा देखावा करून प्रत्येक समस्येवर तोडगा काढणार्‍या ज्योतिषांचा अंनिसच्या नाशिक शाखेने पर्दाफाश केला. नाशिक जिल्ह्यातील निफाड, कुंदेवाडी, चांदोरी येथे चार ज्योतिषी रहात होते. कमकुवत मन व नकारात्मक भावना असलेल्या भाविकांची त्यांनी चांगलीच फसवणूक चालू केली होती. भाविकांचा भूतकाळ सांगून भविष्यात होणार्‍या अनिष्टांपासून सुटका होण्यासाठी अनेक प्रकारचे विधी ते सांगत असत. त्यासाठी दहा हजारांपेक्षा जास्त रूपये ते घेत असत. लोकांची होणारी फसवणूक कळाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे व नाशिक शहर कार्याध्यक्ष कृष्णा चांदुगडे यांनी चांदोरी येथे जाऊन ज्योतिषांची भेट घेतली. मागील चार महिन्यांपूर्वी नाशिक शाखेने काशीच्या पंडिताचा भांडाफोड केला होता. अगदी तशाच प्रकारचे हे ज्योतिषी होते. येणार्‍या भाविकांचा भूतकाळ एकाने माहीत करून घ्यायचा व ती माहिती सांकेतिक भाषेत आत बसलेल्या मुख्य ज्योतिषाकडे पोहच करायची. अशी ती पद्धत होती. कार्यकर्त्यांनी ठरल्याप्रमाणे मुले होत नाही ही समस्या सांगितली. डॉक्टरांनी सुद्धा मुल होणार नाही असं सांगितल्यावर ज्योतिषाने रामायणातील पुत्रकामेष्टी यज्ञाचा दाखला देऊन विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ कसं आहे ते पटवून सांगितले. ह्या विधीसाठी अकरा हजार रूपयेंची तयारी करण्याचे सांगितले. शेवटी साडेआठ हजारात हा सौदा पक्का झाला. नंतर तक्रार नको म्हणून कार्यकर्त्यांनी हा व्यवहार, विधीचे नाव ज्योतिषाच्या हस्ताक्षरात सहीनीशी लिहून घेतला. पेनमधील छुप्या कॅमेर्‍याने संभाषण रेकॉर्डिंग करून घेतले.

            ठरल्याप्रमाणे दि.6 जुलै 2011 रोजी दु.3 वाजता पं.बिपीन बिहारी शरण उपाध्याय व त्याचा एक साथीदार यांना नाशिकमध्ये भेटलो. पत्नी विधी करण्यास संमती देत नाही असे त्यांना सांगितल्यावर  हा विधी पत्नीशिवाय व कुठेही होऊ शकतो असे त्यांनी सांगितले. नंतर दोन्ही ज्योतिषांना अभ्यंकर प्लाझा येथील अंनिसच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. अगोदरच तेथे छुपा कॅमेरा लावून ठेवला होता. अंनिसचे कार्यकर्ते डॉ.गोराणे, प्रा.डॉ.घोडेराव, वि.तु.जाधव, प्रा.डॉ.कावळे, सुधीर धुमाळ, समीर शिंदे, साहिल दातरंगे वगैरे कार्यकर्त्यांनी जबाबदारी वाटून घेतली होती. ऑफीसमध्ये महेंद्र दातरंगे व कृष्णा चांदुगडे यांनी ज्योतिषांना वेगवेगळे प्रश्न विचारले. ऑफीस खराब होऊ नये म्हणून अग्नी शिवाय पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची ज्योतिषांनी तयारी केली. काळा दोरा, ताईत वगैरे थातूर मातूर साहित्यांवर त्यांनी विधी चालू केला. दहा मिनिटांत ठरल्याप्रमाणे इतर कार्यकर्त्यांनी पत्रकार, छायाचित्रकार, पोलिसांसह ऑफीमध्ये गराडा केला. महेंद्र दातरंगे यांनी ज्योतिषास अंनिसची ओळख करून देताच त्यांनी सपशेल माघार घेतली. लोकांची फसवणूक केल्याचे व अशी विद्या नसल्याचे सांगितले. आता हा धंदा बंद करून आपल्या बिहार राज्यात निघून जाऊ असा माफीनामा लिहून दिला. व सर्वांची माफी माघितली. डॉ.दाभोलकरांशी चर्चा करून ज्योतिषांवर सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही ज्योतिषांना भा.दं.वि.420, 34 नुसार अटक केली.

            भांडाफोड केल्यानंतर कार्यकर्ते बर्‍याच वेळेस भोंदू लोकांचा माफीनामा लिहून घेतल्यानंतर विषय संपवतात. नाशिकच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही मोहीम पुढे चालविण्याचे ठरविले. भांडाफोड झाल्यानंतर लगेचच चांदोरी येथील सरपंच खालकर यांच्याशी संपर्क करण्यात आला. सदर घटनेची त्यांना माहिती देण्यात आली. सरपंच व पोलीस पाटील यांनी निफाड पोलीस स्टेशनला फोनवर तक्रार दिली. ओळखीचा पुरावा उपलब्ध नाही ह्या कारणावरून निफाड पोलीसांनी ज्योतिषांच्या इतर दोन साथीदारांस अटक केली. याकामी अंनिसच्या निफाड शाखेचे कार्यकर्ते डॉ.डेर्ले, निंबा बोरसे, कार्यवाह डेर्ले, दीपक श्रीवास्तव यांनी निवेदन देऊन पाठपुरावा केला. पाचवा व्यक्ती जो स्वयंपाकी होता त्यास गावकर्‍यांनी बिहारला जाणार्‍या रेल्वेत बसवून दिले. ह्या घटनेनंतर गावामध्ये अशा भोंदू व्यक्तीस प्रवेश न देण्याचे आश्वासन सरपंच खालकर यांनी दिले. तसेच पुढे येणार्‍या ग्रामसभेत असा ठराव करणार असल्याचे सांगितले. अंनिसचे कार्यकर्ते ह्या ग्रामसभेत चमत्कार सादरीकरणासह व्याख्यान देणार असून अंनिसची शाखा सुरू करणार आहे. ह्यासाठी गावकर्‍यांचा आश्वासक पाठींबा मिळत आहे. फसलेल्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचे आवाहन अंनिसतर्फे करण्यात आले असून त्यांचे पैसे परत मिळवून देण्यास कार्यकर्ते आग्रही आहे. दुसर्‍या दिवशी राज्यभरातील इतर कार्यकर्त्यांना ई-मेल करून माहिती देण्यात आली.

            डॉ.नरेंद्र दाभोलकर व अविनाश पाटील यांनी नाशिक शाखेच्या व निफाड शाखेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

प्रा. डॉ. लक्ष्मीकांत कावळे