Categories
पुस्तक परिचय

नग्नसत्य बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध

मार्च - २०१२

-प्रा. आदिती मुळ्ये

            ‘बलात्कार’ या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या विषयाची अभ्यासात्मक पद्धतीनं मांडणी होऊ शकते, पण त्याला कोरडेपणा येण्याची शक्यता असते आणि कोणतीही स्त्री असं तटस्थपणे लिहू शकणार नाही. बलात्कार हा मानवी समाजातला अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. या विषयाबद्दल येणारी चीड, संताप, गुन्ह्याचा तपास आणि कोर्टात आरोप सिद्ध करताना निघताना बाईचे धिंडवडे, शिक्षेचा अपुरेपणा या पलिकडे या विषयाची व्याप्ती किती सर्वदूर आणि खोलवर पोचलेली आहे, याची कल्पना ‘नग्नसत्य…बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध’ हे पुस्तक वाचताना पायरी-पायरीनं येत जाते.

            या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नाचा अभ्यास करणं, हजारो केसेसचा अभ्यास करणं, प्रत्यक्ष बळी पडलेल्या स्त्रीचे नातेवाईक आणि संबंधित यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणं, हे खरंच शिवधनुष्य उचलण्याजोगं काम! पण मुक्ता मनोहर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ते पार पाडलंय्. असा अभ्यास पुस्तकरूपानं लोकांसमोर मांडणं हे त्याहूनही अवघड काम. एरवी इतर कोणताही गंभीर विषय रंजकतेनं मांडायची सोय असू शकते. पण बलात्कार हा विषय तसा मांडणं म्हणजे आपणच आपली खिल्ली उडवणं. तेव्हा तो गांभिर्यानं हाताळणं हाच एकमेव पर्याय. शिवाय असं पुस्तक तर सर्वांनीच वाचायला हवं! पण आधी आजकाल लोक हलकं-फुलकं वाचण्यापलिकडे जात नाहीत. त्यामुळे अशा गंभीर विषयावरच्या पुस्तकाचा ‘फॉर्म’ अतिशय ओघवता असणं अत्यंत गरजेचं! आणि म्हणूनच लेखिकेनं अतिशय प्रभावी असा विक्रम-वेताळाच्या लोककथेचा फॉर्म वापरला आहे त्यामुळे काही प्रमाणात विषयाचा ताण कमी व्हायला मदत होतेच, पण त्याहीपेक्षा वाचकाला पुस्तक पकडून ठेवतं, उत्सुकता निर्माण करतं. मला असं वाटतं की, विक्रम वेताळाचीच गोष्ट वापरण्यामागेही एक औचित्य आहे. वेताळाचं अस्तित्व सापडणार ते स्मशानभूमीत. बलात्कारित स्त्रीला आणि तिच्या आसपासच्या सर्वांना उध्वस्त करणार्‍या बलात्काराच्या या वेताळाला ती स्मशानभूमीत भेटते, त्याला घेऊन बाहेर पडते, कारण तिला या वेताळाला ‘मानवतेच्या तांत्रिका’समोर पेश करायचंय, त्याचा पंचनामा करून त्याला कायमचं संपवायचंय.

            ‘स्मशानभूमी’ ही मृतांशी म्हणजेच ‘भुतां’शी पर्यायानं भूतकाळाशी निगडित असणार. म्हणून बहुधा लेखिकेला तिथं सर्व धर्मांच्या स्मशानभूमी दिसत असाव्यात. ही एक कालातीत जागा आहे. जसजसं ती आत प्रवेश करते तसतसं टप्प्याटप्प्यानं तिला काळाच्या पाऊलखुणा दिसतात. अगदी कालपरवाच्या दंगलीपासून ते पार महाभारताच्या युद्धापर्यंत. अशा जागी लेखिका वेताळाला आवाहन करते तेव्हा तो लेखिकेसमोर अवतरतो आणि स्वत:चा निवाडा करून घ्यायला तयारही होतो. पण गोष्टीतील वेताळाप्रमाणे तोही तिला काही अटी घालतो. जर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत असूनही दिलं नाही तर मृत्यू आणि जेव्हा प्रश्नाचं उत्तर येणार नाही, तेव्हा गुलामी पत्करावी लागेल….

            माझ्या मते हे एका अर्थी प्रतिकात्मक आहे. आजवरच्या बलात्कार विरोधात स्त्रीची लढाई ही एकतर्फी राहिली आहे, काही झालं तरी ‘पराभव’च! लेखिका वेताळाच्या अटी मान्य करते आणि मग हा दररोजचा प्रवास चालू होतो…. सूर्यास्त ते सूर्योदय! इथून प्रत्येक प्रकरण हे वेताळानं एकेका बलात्काराची कहाणी सांगणं, ती ऐकून सूर्योदयाच्या वेळी भग्नहृदयानं लेखिकेनं घरी येणं, ऐकलेल्या बलात्काराच्या घटनेची सांगोपांग माहिती मिळवणं, त्यावर विचार करणं, सूर्यास्त झाला की, परत स्मशानभूमीकडे जाणं…. असा दिनक्रम सुरू होतो.

            वेताळ सुरवात करतो ती बंगलोरच्या प्रतिभा मूर्तीपासून- भारताच्या सिलिकॉन व्हॅलीपासून. जिथं तंत्रज्ञानाचा कळस हेतो अशा ठिकाणीही आपला मुक्त संचार कसा आहे याची प्रौढी मिरवतो. पुण्याच्या आयटी कंपन्यांचं जाळं असलेल्या भागात झालेल्या ज्योती आणि नयना या दोन उच्चशिक्षित मुलींच्या बलात्काराबद्दल सांगतो. या तिन्ही मुलींचा बलात्कारानंतर खून करण्यात आला होता. त्याचा लेखिकेनं जाब विचारताच वेताळ तिला जाणीव करून देतो की, ‘पुरूषानं बळजबरीनं स्त्रीच्या शरीरात प्रवेश करणं’ या एवढ्या एवढ्याच-लिंगाशी संबंधित कृतीपलिकडे इतर कशाशीही त्याचा स्वत:चा संबंध नाही. फक्त तेवढ्या कृतीपुरताच तो पुरूषशरीरात शिरतो. पण त्यानंतरच्या आणि त्या आधीच्या घटनाक्रमाला तो जबाबदार नसतो. तो म्हणतो, “मी पुरूषी लालसेचा अविष्कार आहे, खुनाच्या कृतीला मी कसा जबाबदार?” भोगा, भोगा, उपभोगा आणि नष्ट करा’ ही संस्कृती कुणाची, कुणी आणली? त्याला कोण जबाबदार हे लेखिकेनं ठरवायचं!

            पुढच्या प्रकरणात गुडगावमधल्या बलात्काराची घटना येते, गुडगाव एक महत्वाचं सॅटेलाईट शहर. बावीस वर्षीय मिझोरामी मुलीला अपरात्री रस्त्यावरून उचललं जातं, टेम्पोतून पळवून नेऊन सामूहिक बलात्कार होतो, नंतर हातात नोटा कोंबून रस्त्यावर फेकून दिलं जातं. एकीकडे मुली शिकून आत्मनिर्भर होतायत, परप्रांतात नोकरीसाठी जातायत. बीपीओ, कॉलसेंटर्स, आयटी इंडस्ट्रीत ‘वेळे’ची पर्वा न करता काम करतायत. दिवसागणिक शहरा-गावांचा चेहरा बदलतोय. एक वेगळीच संस्कृती आकाराला येत आहे. दुसरीकडे या चकाकत्या दुनियेची काळोखी बाजूही सामोरी येत आहे, जिथे आजही स्त्रिया भयाच्या अंधारात ढकलल्या जातायत.

            या तिन्ही शहरातील घटना फक्त बलात्कारापुरत्या मर्यादित नाहीत. स्त्री-पुरूषांमधील आदिम लालसेपलिकडे धनदांडगेपणा, भ्रष्ट मानसिकता, नैतिक मूल्यांची घसरण, जमिनींचे गैरव्यवहार, गुंडगिरी, लबाडी, दहशत या सर्वांना आपल्या कवेत घेणारं राजकारण आणि या सगळ्याच्या पायावर उभी असणारी झटपट श्रीमंती या घटनांच्या मुळाशी आहे. त्याचा विचार करण्याची गरज अधोरेखित होते.

            या नंतरच्या प्रकरणामध्ये येतो खाकी वर्दीतला दहशतवाद. ज्यांनी रक्षण करायचं तेच भक्षक होतात आणि हे एक-दोन नाही तर मोठ्या प्रमाणावर घडणार्‍या घटनांमधून बाहेर येतंय. मरीन ड्राईव्ह पोलीस चौकीतला बलात्कार, सहारा विमानतळ, मधुरा आणि रमीझाबी केसेस या चारही घटनांत स्त्रिया चार वेगळ्या स्तरातल्या. एक सुखवस्तू कॉलेज तरूणी, दुसरी पंधरा वर्षांची कचरा गोळा करणारी मुलगी, तिसरी विवाहित आदिवासी आणि चौथी मुस्लीम मजूर स्त्री. पण आरोपी एकच-खाकी वर्दीतला सैतान! कोर्टानं शाबित केलं की ज्याअर्थी मथुरा किंवा रमीझाबीनं जिवाच्या आकांतानं विरोध केला नाही त्याअर्थी त्या घटनेला त्या दोघींची संमती होती. रमीझाला तर पुढे वेश्याच ठरवलं गेलं. एखाद्या स्त्रीला वेश्या ठरवलं तरी तिची संमती कशी गृहीत धरली जाते? आणि वेश्या काय राजीखुशीनं धंदा करते? एखाद्या समाजात बाईला पोटासाठी किंवा जबरदस्तीनं शरीर विकावं लागणं ही त्या समाजाला शरमेची गोष्ट आहे. त्याचं समर्थन करणं तर आणखीनच लाजीरवाणं! कोर्टाच्या या निकालामुळे अन्याय आणि न्यायातला फरकच संपला! एन्काऊन्टर स्पेशालिस्ट अरूण बोराडे केसमध्ये तर या सगळ्याची मुळं दहशतवादापर्यंत पोचलेली दिसतात.

            केईएमच्या ‘अरूणा’ची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. दिल्लीतील शांतीमुकुंद हॉस्पिटलमध्ये तशीच समांतर घटना घडली, सुदैवानं की दुर्दैवानं जखमी नर्स वाचली. त्या निर्लज्ज वॉर्डबॉयनं कोर्टात न्यायाधीशांमार्फत तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. का? तर बलात्कारित स्त्रीच्या आणि   दोन्ही कुटुंबाच्या भल्यासाठी….. वा रे वा आमची न्याय व्यवस्था! म्हणजे आमचे न्यायाधीशही गृहीत धरतात की एकदा लग्न झालं की पुरूषाला बायकोवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क मिळतो.

            दहाव्या रात्री कथा येते भवरीदेवीची! त्या निमित्तानं वेताळ काही प्रश्न उपस्थित करतो. उच्च जातीतल्या स्त्रियांपेक्षा दलित जातीतल्या स्त्रियांवर जास्त बलात्कार का होतात? काही ठिकाणी जमीनदार त्याच्या शेतावर काम करणार्‍या कुळातल्या नववधूला स्वत:चा अधिकार म्हणून उपभोगण्याची पद्धत आजही वेगवेगळ्या रूपात का चालू आहे? कनिष्ठ जातीतल्या लोकांवर दहशत बसवण्यासाठी बलात्कार का केले जातात? नंतरच्या शुकसारिका प्रकरणात तर राजकारण्यांनी स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांची जंत्रीच येते. पंजाबमधील बंतसिंगांची – एका शेतमजूर दलिताची व्यवस्थेविरूद्ध लढाई आणि भवरीदेवीनं दिलेला लढा या दोन्ही एकीकडे करूण पण तरीही आशेचा किरण दाखवणार्‍या कहाण्या….

            इथपर्यंत पुस्तक सांगतं ते नेहमीच्या चौकटीतल्या बलात्काराच्या कहाण्या. पण नंतर ‘सेक्स वर्कर’ नलिनी जमीलाची गोष्ट ऐकवता ऐकवता वेताळ लेखिकेला घेऊन जातो जगाच्या बाजारपेठेत. ‘लैंगिकता’ हा बाजारपेठेतला किती प्रभावी घटक बनलाय हे सांगू लागतो. हेथल पारेखच्या निमित्तानं बलात्काराचा बाजार मांडून ‘मिडिया’नं त्यालाही कसा कॅश केला हे सांगतो. नऊ वर्षांच्या मुलानं सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणं, पुढे तिच्या गुप्तांगावर धारदार वस्तू वापरणं या गोष्टी तर अनाकलनीय आहेत. ज्या अबोध वयात  बलात्काराचा अर्थही माहीत नसतो तेव्हा हे का घडतं? या प्रकारच्या दोन्ही घटनांत मुलांनी आपण ब्लू फिल्म पाहिल्यावर असं करावसं वाटल्याचं सांगितलं.

            आपण सर्व संवेदनशील माणसं ‘बलात्कारा’बद्दल जागरूक असतो, त्याचा तीव्र निषेध करतो. पण त्याच वेळी आपल्या अवतीभवती मांडलेल्या लैंगिकतेच्या बाजाराचा किती जण विचार करतो? वेताळ म्हणतो त्याप्रमाणे एका साध्या लैंगिक कृतीची मागणी वाढावी म्हणून आपण माणसांनी त्याचं सतत उद्दीपन करायचं धोरण घेतलंय. त्याची एक इंडस्ट्रीच झालीय. लिंडा लवलेसच्या निमित्तानं मग अश्लील लैंगिक चित्रपट आणि त्यांचे अर्थकारण ते वेश्याव्यवसाय असा सगळा प्रवास मांडला जातो. स्त्रीसौंदर्याचा अश्लीलतेच्या आधारे मांडला जाणारा बाजार आणि त्याला आता मिळत असलेली हिंसक विकृतीची साथ याबद्दल लिहिताना ‘कामदेव-वेताळ’ भेट दाखवणं ही कल्पना अफलातून आहे.

            लैंगिक भावना एक नैसर्गिक सहजप्रेरणा आहे – भूक, तहानेसारखी. प्राण्यांमध्ये केवळ ती पुनरूत्पादनापुरती आहे- निसर्गाचं चक्र चालू ठेवण्यापुरती. म्हणूनच त्यांच्यामध्ये बलात्कार नसतो. पण माणसांच्या समाजात तो भाव कितीतरी पुढच्या टप्प्यावर पोचलाय. त्याची माणसाची लैंगिक इच्छासुद्धा सामाजिक संकेतांनी घडते, नियंत्रित होते. संस्कारित होते. गेल्या काही वर्षात स्त्री-पुरूष संबंधांचा बाजार मांडून, त्यामध्ये अधिकाधिक नाविन्य आणण्याच्या नावाखाली जास्तीत जास्त असमाधान निर्माण करण्याची स्पर्धा सुरू झालीय. स्त्री-पुरूषांनी एकमेकांचा आदर करणं, प्रेमभावना, प्रणय आणि आनंद यांच्याऐवजी घृणास्पद विकृतीचा वापर केला जाऊन स्त्रियांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतोय.

            या नंतर वेताळ लेखिकेला जणू युद्धभूमीवरच घेऊन जातो. सर्व युद्धांच्या मुळाशी असणारा ‘वंशवाद’ आणि वंश विच्छेदनासाठी युद्धं, दंगली यामध्ये होणारे प्रतिपक्षातील स्त्रियांवरील बलात्कार आणि क्रूरपणे ठार करणे, या गोष्टींचा परस्पर संबंधही तो इथं स्पष्ट करतो. हे सर्व लिहिताना जर्मनीपासून रवांडापर्यंत आणि बोस्त्रियापासून गुजराथच्या दंगलीपर्यंत जगातल्या सर्व वंश धर्म संघर्षांचा आढावा लेखिका घेते. अहिल्येपासून शॉपियापर्यंत, सीतेपासून मणिपुरी मनोरमेपर्यंत आणि हब्बा खातून ते आसामी रायफल्ससमोरच्या नग्न निदर्शनापर्यंत…. लेखिका एक आलेख आपल्यासमोर मांडत जाते…. हजारो वर्षांपासून चालत आलेला पुरूषी वर्चस्ववाद, लष्करी दमनयंत्रणा, सर्वसाधारण हितसंबंध या आधारे ‘बाई’वरचं लैंगिक नियंत्रण आजही कसं चालू आहे हे टळटळीतपणे आपल्यासमोर उभं रहातं. आदिम मनुष्य समाजातील स्त्री-पुरूष संबंध वळणं घेत, बदलत बदलत आजच्या टप्प्यात वर येऊन पोचले. एकेकाळी स्त्रीच्या सृजनाचा सन्मान करणार्‍या, स्त्री देहाची पूजा करणार्‍या संस्कृतीपासून पुढे स्त्रीदेहाची रणभूमी बनवणार्‍या आजच्या समाजाचा सारा प्रवासही यानिमित्तानं लेखिका आपल्यासमोर उभा करते.

            अखेरच्या प्रकरणात वेताळ ‘मानवतावादी’ मंडळींबद्दलच प्रश्न उपस्थित करतो तेव्हा लेखिका पूर्ण निराश होते. कारण हेही खरंच की असह्य असणार्‍या वाईट गोष्टींना वाईट म्हणणारा, संघर्ष करणारा आणि त्यात यशस्वी झालेला ताकदवान प्रवाह आहेच कुठं? तर अशा तेव्हा युद्धखोरी, वंशवादासारख्या संहारक शक्तींना रोखू शकणारा मानवतावादी प्रवाह घेऊन येण्याचं आव्हान वेताळ लेखिकेला देतो आणि गुप्त होतो.

            इथं लेखिकेला उमगतं की वेताळानं ठरल्या अटीच्या विरोधात आपल्याला जीवदान दिलं कारण स्त्रियांना मुक्तता देणारं वातावरण तयारच होऊ शकणार नाही याची त्याला खात्री होती म्हणून! मग तिला आठवते आत्मसन्मान जपणारी द्रौपदी, उर्वशी आणि गंगादेखील…. आणि मग व्यवस्थेशी टक्कर देणार्‍या भवरीदेवी, मथुरा आणि कित्येकजणी…. ‘कोणत्याच पुरूषाचा भरवसा वाटत नाही’ अशी प्रत्येक स्त्रीच्या मनात असणारी भीती हाच खरा तो ‘वेताळ!’ त्याला मनातून हद्दपार करणं, बलात्कारामुळे स्त्री अपवित्र झाली, इत्यादी कल्पनांविरोधी उभं रहाणं हाच खरा मार्ग आहे. प्रत्येक स्त्री आणि संवेदनशील पुरूष यांनी एकत्रितपणे युद्धखोरी, दहशतवाद, पुरूषसत्ता, चंगळवाद या सर्वांना नामशेष करायला हवं….

            बलात्कारासंदर्भातल्या वास्तवाचा सर्वांगीण वेध घेताना एक त्रुटी राहून गेल्याचं जाणवतं. ते म्हणजे नातेसंबंधात होणारे बलात्कार(इन्सेस्ट) आणि लहान वयाच्या मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार(चाईल्ड सेक्शुअल अ‍ॅब्युज) या दोन महत्वाच्या आयामांचा फक्त उल्लेख झाला आहे, त्यामागच्या मानसिकतेवर थोडं विवेचन होणं आवश्यक होतं.

            वेताळ आणि लेखिका यांच्यामध्ये होणार्‍या संभाषणातून, वेताळ उपस्थित करतो त्या प्रश्नांतून, आपली संस्कृती, न्यायव्यवस्था, शासन, राजकारण, अर्थव्यवस्था, नैतिक मूल्यं या सगळ्यामधील ‘लूपहोल्स’, पळवाटा उघड होत जातात, विसंगतींवर बोट ठेवलं जातं, व्यवहारातला दुटप्पीपणा बाहेर येतो. बलात्काराच्या पुरूषी दहशतीमागच्या या धगधगत्या वास्तवानं आपण अत्यंत अस्वस्थ होतो. खर्‍या अर्थानं स्त्री-पुरूष समतेवर आधारलेल्या समाजाच्या निर्मितीचं आव्हान हे पुस्तक आपल्यासमोर उभं करतं. म्हणूनच प्रत्येक स्त्री-पुरूषांनी ते आवर्जून वाचायला हवं.

पुस्तकाचे नाव : नग्नसत्य
लेखिका : मुक्ता मनोहर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे.
किंमत : 300 रू.