भक्तांना झपाटणारी भूतं पकडून बीअरच्या काळ्या बाटलीत कोंबणं, ही मिर्झा महाराजाची ख्याती. डोळ्यांच्या इशार्यावर बाटलीसह भुतांना नाचविणं, हा तर त्याच्या डाव्या हाताचा मळ. अशा या बुवाची जादुई बाटली ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी हस्तगत केली. त्याच्यासमोरच दहादा नाचवली. मग काय, महाराजाची भुताटकी पुरती भेदरली. चंबुगबाळ आवरून गाझियाबादच्या दिशेने गायब झाली.
गेल्या एक महिन्यापासून सातारा येथील पोवई नाक्यावरच्या ‘विठ्ठललीला’ शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये मस्तपैकी ‘दुकान’ थाटून बसलेला मिर्झा बाबा मूळचा उत्तर प्रदेशातला. गेल्या महिन्याभरात भक्तांची खच्चून रांग लागली. कुणाला मूल होत नव्हतं, तर कुणाचं मूल सतत आजारी पडायचं, कुणाला नवरा मिळत नव्हता, तर कुणाचा नवरा घरात टिकत नव्हता. एक ना दोन…. हजार प्रश्न!
या भक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी तो एका बाटलीचा वापर करायचा. बाबानं रोखून पाहिल्यानंतर टेबलावरची काळीकुट्ट बाटली नाचली तर समजायचं म्हणे की, समोरच्याला भूतबाधा एकशे एक टक्के. मग भक्ताच्या पत्नीचा नेसत्या वस्त्राचा तुकडा किंवा मुलीचा फोटो बाबा मागवायचा. त्या माध्यमातून हा बाबा नंतर समोरच्या बाटलीत भूत डांबून ठेवायचा…. म्हणजे भक्ताच्या मागची ईडापिडा टळायची.
या बुवाच्या अनोख्या ‘बाटलीबाजी’ची कुणकूण लागताच ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी सापळा रचला. प्रशांत पोतदार अन् भगवान रणदिवे भक्त बनून बाबाकडं गेले. त्यांच्या वडीलधार्यांची भूमिका प्रा.राम जाधव अन् प्रा.विलास भांदिर्गे यांनी मस्तपैकी वठविली. नुकतंच घरात पत्नीच्या हातचं जेवण करून आलेल्या रणदिवेंनी खोटंच सांगितलं, ‘माझी मंडळी मला सोडून गेलीय.’ समोरची बाटलीही लगेच नाचली. साडेतीन हजारांची मागणी झाली. लगेच बाहेर दबा धरून बसलेले शंकर कणसे अन् उदय चव्हाण चमत्कारिक वस्तू घेऊन आत घुसले. युवराज झळकेंचा अवतारही सार्यांना क्षणभर ‘पोलिसां’चाच वाटला.
सुरवातीला ‘बहोत महेंगा पडेगा’ अशी धमकीवजा भाषा वापरणारा मिर्झा बाबा कार्यकर्त्यांच्या बोटांची चलाखी पाहून मात्र भलताच चाट पडला. काळ्या दोर्याने(हा दोरा डोळ्याला दिसत नाही) बांधलेली बीअरची बाटली कार्यकर्त्यांनी स्वत:हून नाचवून दाखवली.
‘हातचलाखी’त समोरची मंडळी आपल्यापेक्षाही ‘सव्वाशेर’ आहेत हे ओळखून मिर्झा बाबानं सपशेल शरणागती पत्करली. लेखी माफीनामा लिहून देऊन ‘दुकान’ गुंडाळलं. एक मात्र; ‘अंनिस’च्या माहेरघरात सासुरवाडी थाटायला आलेला हा मिर्झा बाबा जाताना स्वत:शी एवढंच पुटपुटला, ‘सातारा में बाबा लोग क्यों नही रहते, यह मुझे आज पता चला!’
-सचिन जवळकोटे
भोंदूबाबाचा माफीनामा
‘मै एक महिनेसे सातारा के लोगों को ताबीज देकर पैसे ले रहा हूँ। 3200 रूपयेसे जादा रूपये लोगोंसे लेता हूँ। अंधेरे मे बिअर की बोतल दोरे से हिला कर लोगोंको उल्लू बनाता था। मुझे छोड दो। मै अभी के अभी यहाँ से चला जाता हूँ। फिर कभी ऐसा काम नही करूँगा, मेरे पास कोई भी जादूई शक्ती नही है। पैसे कमाने के लिए मै ये करता हूँ।’ असे म्हणत स्वत:च्या हस्ताक्षरात भोंदूबाबाने माफीनामा लिहून दिला व गाशा गुंडाळला.