Categories
छद्मविज्ञान

 कुंडली-पत्रिका-मुहुर्तवाले मोकाट कसे?

मार्च - २०१२

समाजामध्ये असणार्‍या अंधश्रद्धा, खोट्या कल्पना कोणताही आधार नसणार्‍या रुढी परंपरा आणि भाकड कथा हे काहींचे जगण्याचे साधन आहे. त्यामुळे समाजाचे परिर्वतन होवूच नये असे त्यांना वाटते; अंधश्रद्धा हीच त्यांची दुकानदारी आहे. समाज भ्रामक कल्पनेतच राहिला पाहिजे. समाजाने कधीही चिकित्सा करू नये, समाज विज्ञाननिष्ठ बनू नये यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असते. किंबहुना समाजाचे अज्ञान हीच त्यांची रोजगार हमी असते. ते अंधश्रद्धेचे लाभार्थी असतात. त्यांचा फसवणुकीचा धंदा वर्षानुवर्षे तेजीतच असतो. त्या धंद्यात कधीही मंदी येत नसते. तो धंदाही बिनभांडवली असतो. अशा धंद्यात कुंडली पत्रिका तयार करणारे, मुहूर्त सांगणारे यांचा सर्वात वरचा नंबर लागतो.

गिर्‍हाईकांना दुकानदार, व्यापारी लुटतात. त्यांची फसवणूक व पिळवणूक करतात ती थांबावी म्हणून बर्‍याच वर्षापासून ग्राहक चळवळ काम करते. ग्राहक चळवळीचे काम चांगले आहे. त्या चळवळीचा परिणाम म्हणून सरकारने ग्राहकांचे हक्क संरक्षित करणारा कायदाही केला आहे. त्यात नुसतेच दुकानदार आणि कारखानदार येतात असं नाही. त्यात सेवा पुरवणारेही येतात. व्यापार्‍यांनी दिलेला माल खराब निघाला तर त्यांच्यावर केस दाखल करून नुकसान भरपाई मागता येते. अगदी डॉक्टरने चुकीचे निदान करणे, वकीलांनी चुकीचा सल्ला देणे असे जरी घडले तरी सुद्धा त्यांना कोर्टात खेचून नुकसान भरपाई मागण्याची तरतूद त्या कायद्यात आहे. त्यामुळे व्यापारी कारखानादार यांच्यासह सेवा पुरविणार्‍यांनी सदोष सेवा दिल्यास कोर्टबाजीस सामोरे जावे लागते. पैसे घेवून दिलेल्या सल्ल्याला सेवा असे म्हंटले जाते.

या पार्श्वभूमीवर विचार केल्यास कुंडली तयार करणारे, पत्रिका बनविणारे, कुंडली पत्रिका जुळते की नाही हे बघणारे, मुहूर्त सांगणारे पैसे घेवूनच हा धंदा करतात. म्हणजे तेही आर्थिक मोबदल्याच्या बदलत्यात सेवा पुरवतात. परंतु या पैकी कोणीही कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. ही मंडळी धंदा करतात. हा धंदा बिनभांडवली असतो. त्या धंद्यापासून शेलकी कमाई करतात. ग्राहकांच्या कडून पैसे घेवून त्यांना आपल्या पाया पडायला लावतात. पण कायद्याच्या कचाट्यात सापडत नाहीत. इतरांना कायद्याचा बडगा दाखवायला यांनीच सरकारला भाग पाडले आहे आणि आपली जमात मात्र त्यातून पद्धतशीरपणे वगळलेली आहे. धोब्याकडे धुवायला दिलेले कपडे फाटले तर तो गुन्हेगार. न्हाव्याने हजामत करताना नीट केली नाही तर त्यांच्यावर केस. शिंप्याने कपडे नीट शिवले नाही तर त्यांच्यावर खटला. डॉक्टरांचा पेशन्ट तपासताना अंदाज चुकला आणि भलतं सलतं झालं तर त्यास तो जबाबदार. वकीलांचा कायदेशीर सल्ला चुकला तर त्याला कोर्टाचा धाक. ड्रायव्हरचा अंदाज चुकून गाडी दरीत कोसळली तर त्याला शिक्षा. अशा पैसे घेवून सेवा पुरविणार्‍यांना कायदा टिकारणं घेवून मागे लागतो. तोच कायदा पैसे घेवून कुंडली, पत्रिका, मुहूर्त आदी सांगून पैसे मिळविणार्‍याचा अंदाज चुकल्यास का गप्प असतो हेच कळत नाही. कायद्यासमोर सारे समान असं म्हणणार्‍यांनी याचा का विचार केलेला नाही?

आज प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कोर्टात नवरा बायकोच्या वादाचे अनेक खटले चालू आहेत. त्यात पोटगी मागण्याचे, घटस्फोटाचे, छळाचे, छळ करून ठार मारल्याचे, आत्महत्या करायला भाग पाडल्याचे असे विविध प्रकार आहेत. लग्नानंतर पती-पत्नी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या मागे लागलेले कब्जे आणि खटले हे, अपवाद सोडल्यास मुहूर्तावर विवाह केलेल्यांचे आहेत. कुंडली आणि पत्रिका तंतोतंत जमवून सगळेच्या सगळे गुण जुळून आले असे पैसे घेवून ज्यांनी सांगितले आणि त्यांनी काढून दिलेल्या शुभ मुहूर्तावर लग्नं लावून दिली त्यांना कुणीही कधीही जबाबदार धरत नाही. वास्तविक एखाद्याच्या संसाराचं वाटोळं होवू नये म्हणून तर कुंडली आणि पत्रिका जुळवून आणली जाते ना, मुहूर्त बघून लग्न लावलं जातं ना? अशा लग्नातून झालेल्या पती पत्नीत वाद होता कामा नये. त्यांच्या संसाराचं वाटोळं होता कामा नये. पण ते होतं. ज्यांनी सदोष सेवा पुरविली ते नामानिराळेच राहतात आणि नवरा बायको एकमेकावर केस दाखल करतात.

अशी मुहूर्तावर लावलेली लग्ने अयशस्वी झाली तर नवरा-बायकोनी एकमेकांना कोर्टात खेचण्या अगोदर ज्यांनी त्यांची पत्रिका-कुंडली जुळते म्हणून सांगितले, शुभ मुहुर्त काढून देवून त्याच्या प्रमाणे लग्ने लावली, ज्यानी होम, हवन, पूजन करून पैसे घेतले त्यांना त्याचा जाब विचारावा. त्यांना कोर्टात खेचावे. त्यांच्यावर सदोष सेवा पुरविण्याचे खटले दाखल करावेत. ही कोर्टबाजी टाळण्यासाठी ज्यांचा हा व्यवसाय आहे त्यानी तर एक कुंडली, पत्रिका, गुण जुळणे, मुहुर्त हे थोतांड आहे असे जाहीर करावे किंवा आम्ही लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून फुकटची कमाई करतो हे तरी जाहीरपणे कबूल करावे.              

– अ‍ॅड. के. डी. शिंदे