नैरश्यातून आत्महत्या करण्याचे प्रमाण जगभरच वाढत आहे पण हे नैराश्य येण्यामागेही कारणे असतात मग अगदी कर्जबाजारीपणापासून ते प्रेमभंगापर्यंत; परंतु पुण्यात दि.21 जानेवारीला पत्नी व मुलाची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करणारे अरूण पालकर(वय 42) हे अशाच नैराश्याला बळी पडलेले होते. पण हे नैराश्य त्यांना आले कोठून? या प्रश्नाचे उत्तर देखील त्यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते. घरमालकासाठी, नातेवाईकांसाठी आणि पोलिसांसाठी त्यांनी वेगवेगळ्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. घरमालकासाठी घराचे डिपॉझिट भावांना वाटून द्यावे असे म्हटले होते. तर नातेवाईकांसाठी सर्वांना आशिर्वाद लिहून ठेवले होते. आणि ज्या चिठ्ठीशिवाय या हत्या व आत्महत्या मागचे कारण स्पष्ट झाले नसते त्या चिठ्ठीत पालकर लिहितात, ‘माझा भविष्यावर विश्वास आहे. मला गोष्टी आधीच कळतात; पण मला कोणी गांभिर्याने घेत नाही माझे लक्ष संसारात नव्हते. तेरा वर्षांच्या संसारात पैसा, घर, गाडी घेणे मला सोपे होते पण शनी-मंगळाची युती झाली असल्यामुळे माझी अडचणीकडे वाटचाल सुरू झाली. माझे व पत्नीचे कधीच पटले नाही. माझी मुलं हुशार आहेत. पण त्यांचे हाल नको म्हणून हा मार्ग मी निवडला. पत्नीशी संगनमताने हे पाऊल उचलले आहे.’ तर दुसर्या चिठ्ठीत त्यांनी शनी-मंगळाच्या युतीकडे झालेल्या नुकसानाची यादीच तयार केली आहे. त्यात ते म्हणतात की, ‘माझे बायकोशी व नातेवाईंकाशी कायम भांंडण व्हायचे, मी व्याभिचारी झालो होतो, माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होत नव्हती, व्यवसायात माझे लक्ष नव्हते. हा सर्व शनी-मंगळाच्या युतीचा प्रभाव होता.’ पालकर यांच्या चिठ्ठ्यांवरून हे स्पष्ट हेते की, भविष्य कळते असा दावा असणार्या पालकरांना स्वत:चा अंत स्वत:च करणार हे कळले नाही. भविष्यात शनी-मंगळाच्या युतीचे परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब संपवून टाकले. ‘ज्योतिष’ पालकर, पत्नी व मुलांचे एक प्रकारे खुनीच नाही का?
घटनेचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांची भेट पुणे अंनिस कार्यकर्त्यांनी घेऊन काही माहिती घेतली. पाटील यांनी सांगितले की, संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता पालकर यांचा हा नियोजित कट होता असे लक्षात येते त्यांनी सर्वांसाठी पैसे वाटून ठेवले होते व अंत्यविधीचे चेकही त्यांच्या घरात चिठ्ठ्यांबरोबर सापडले. घटनास्थळीही कार्यकर्ते गेले व त्यांचे शेजारी अवंतिका कुलकर्णी यांच्याकडून माहिती घेतली. पालकर ये अत्यंत धार्मिक होते पण हे कुटुंब 8 महिन्यांपूर्वी रहायला आल्यामुळे त्यांचा जास्त संबंध श्री समर्थ वंदन सोसायटीतील लोकांशी नव्हता. चतुर्थी व एकादशीला त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होत. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत होता व त्यांची दोन्ही मुले ओंकार (11 वर्षे) व ओमप्रकाश(6 वर्षे) हुशार होते. ही घटना घडायच्या अगोदरच्या दिवसापर्यंत पालकर असे काही करतील याची कल्पनाही नव्हती असे कुलकर्णी म्हणाल्या.
घटना उघडकीस आल्यावर पालकर यांची हालचाल चालू होती त्यामुळे त्यांना त्वरीत नवले हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात हलवण्यात आले परंतु दि.30 जानेवारी रोजी त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. पालकरांवर उपचार चालू असताना पुणे अंनिस कार्यकर्त्यांनी अरूण पालकर यांचे छोटे बंधू उमेश पालकर यांची भेट घेऊन पालकरांच्या परिस्थितीची माहीती घेतली त्यावेळी उमेश पालकर यांनी घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली ती अशी : – दि.21 रोजी अरूण पालकर यांचे थोरले बंधू रमेश हे सकाळी त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पलीकडून प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यावर धायरीतच राहत असलेल्या त्यांच्या छोट्या भावाला उमेश यास पालकर यांच्या घरी जाण्यास सांगितले. उमेश आले तेव्हा आतील दार तोडले होते व लोखंडी दार बंद होते. उमेश यांनी लोखंडी दाराच्या फटीतून हात घालून दार उघडले व आत जाऊन पाहिले तर अरूण पालकर यांची पत्नी व मुले यांच्या तोंडातून फेस आला होता. व त्यांचा मृत्यू झाला होता व अरूण पालकरांच्याही तोंडातून फेस येत त्यांची हालचाल चालू होती. उमेश व पोलीस यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात हलवले. उमेश पालकर अरूण यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की, ‘लहानपणापासून अरूण यांना ज्योतिषाची आवड होती. तशी पुस्तकेही ते वाचत असत. शनी-मंगळाच्या युतीचे परिणाम आपल्यावर होत आहे असे ते वारंवार सांगत, दोनच दिवसांपूर्वी ते आमच्या घरी येऊन गेले पण त्यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार येईल असे वाटले नाही.’
मुळचे रत्नागिरीचे असलेले अरूण पालकर यांनी ज्योतिषाच्या आहारी जाऊन नैराश्य ओढावून घेतले त्यातूनच आपल्या हुशार मुलांच्या हत्या केल्या. पत्नीलाही संपविले व स्वत:ही संपले. या घटनेनंतर ज्योतिषांच्या अनेक संतापजनक प्रतिक्रिया वृत्तपत्रातून आल्या. खरेतर ज्योतिषासारख्या अंधश्रद्धेचे समर्थन हे दैववादी मानसिक गुलामगिरीचे लक्षणच आहे परंतु या केवळ हत्या आणि आत्महत्या इथपर्यंत मर्यादित नसून शास्त्राच्या नावाखाली फोफवत चाललेल्या ज्योतिष या अंधश्रद्धेचे हे कुटुंब बळी आहे.
–कुणाल शिरसाठे
वरील घटना घडल्यानंतर पुणे अंनिसने फलज्योतिषाला विरोध कशासाठी? या विषयावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानास पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे हे वृत्त... 20 ज्योतिष ही निखालस अंधश्रद्धाच -डॉ.दाभोलकर “ज्योतिष ही निखालस अंधश्रद्धा असून त्याला शास्त्राचा कोणताही आधार नाही, याच अंधश्रद्धेतून पालकर कुटुंबियांचा बळी गेला असून फुले-आगरकर यांच्यासारख्या सुधारकांच्या भूमीत अशा घटना म्हणजे समाजाला कलंकआहे, समाजाने अतंर्मुख होऊन याचा विचार करायाला हवा.” असे मत अंनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांनी “फलज्योतिषाला विरोध कशासाठी? व कशाप्रकारे?” या कार्यक्रमात व्यक्त केले, याप्रसंगी अंनिस राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख व पुणे शहर अंनिसचे अध्यक्ष माधव गांधी उपस्थित होते. शास्त्र हे नम्र असून गृहीतकांच्या आधारे ते मांडले जाते आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या आधारे ते तपासता येते; परंतु शास्त्र असल्याचा दावा करणारे ज्योतिष अजून कुठलेही गृहीतक मांडू शकले नाही. त्यामुळे त्याला शास्त्र म्हणताच येणार नाही, असेही दाभोलकर म्हणाले. ज्योतिषातून अध्यात्मिक उन्नती करुन घ्यावी या शरद उपाध्ये यांच्या मताचा प्रतिवाद करताना दाभोलकर म्हणाले, “चलाखीने ज्योतिषाचा धंदा करणारी मंडळी ही खोट्या ज्योतिषाला सिद्ध करण्यासाठी अध्यात्माचा आधार घेत असून त्यातून भ्रम निर्माण करुन लोकांना फसवीत आहेत.” जोपर्यंत ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत डॉ.विजय भटकर यांच्यासारख्या मंडळींनी ‘ज्योतिषाचा कार्यकारणभाव नाकारता येत नाही’ असा अवैज्ञानिक दावा करू नये. ज्योतिष ही स्वप्ने विकण्याची कला असल्याचे सांगून ज्योतिषाचा धंदा करणार्या आणि फसवणूक करण्यांना ग्राहक कायद्यात सामावून घ्यावे अशी जोरदार मागणी दाभोलकरांनी केली. ज्योतिषाला विरोध करताना महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत रंजक पद्धतीने खगोलशास्त्र शिकवले पाहिजे जेणे करुन ज्योतिषाचा फोलपणा लक्षात घेऊ शकेल. ज्योतिष हे दैववादी मानसिक गुलामगिरी असून त्या गुलामगिरीला विरोध म्हणून जाहीर कुंडली जाळण्याचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचे आवाहन दाभोलकरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे घनश्याम येनेगे यांनी केले तर आभार श्रीपाल ललवाणी यांनी मानले.