चंद्रपूर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भटक्या विमुक्त समाज उत्थानासाठी काम करणार्या कार्यकर्त्याला प्रोत्साहित करण्यासाठी दिला जाणारा राज्य स्तरीय पहिला समाजकार्य गौरव पुरस्कार चंद्रपूर येथील मातोश्री सभागृहात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे हस्ते पन्नालाल राजपूत यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत डॉ.नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते.
अजूनही भटक्याचे जगणे सुसह्य झालेले नाही. त्यांना फार अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचे जगण्याचे माणुसकीचे हक्कच समाजाने नाकारलेले आहेत. त्यामुळे गरीब, अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये भटके विमुक्त अडकलेले दिसतात. त्यांना आणि इतर समाजाला अघोरी अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित जादूटोणा विरोधी कायदा पारित करावा अशी सदिच्छा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी व्यक्त केली.
भटक्या विमुक्त समाजाचे आजचे अत्यंत हलाखीतील जगण्याचे वास्तव हा आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आतून-बाहेरून पराभव आहे. भटक्या समाजातील भावाबहिणींना जगण्याचा हक्कच नाकारला जातो आहे. जातीने गुन्हेगार हा इंग्रजापासून लागलेला शिक्का अजूनही आपल्या पोलीस प्रशासनाने पुसलेला नाही. त्यामुळे प्रचंड पोलीसी दहशत, मार, कोर्ट कचेर्या यांना सामोरे जावून असंख्य हाल अपेष्टा भोगणारे भटके विमुक्त स्वाभाविकपणे अंधश्रद्धेचे बळी आहेत. जात पंचायतीची चौकट तोडून त्यांच्या अन्यायातून त्यांची सुटका करण्यासाठी धडपडणार्या पन्नालाल सारख्या कार्यकर्त्याला समाजाने पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन आपल्या अध्यक्ष मनोगतात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी केले.
प्रथितयश लेखक अशोक पवार यांनी राजपूतांच्या कार्याबद्दल आणि जगण्याबद्दलचे अनुभव कथन केले. त्यांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केलेल्या समाज वास्तवामुळे आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या पुढाकारामुळे भटक्यांचे दु:ख अत्याचार आणि न्यायाची मागणी आता गतीने चर्चेत येत असल्याचे सांगितले. पाच विद्यापीठातून क्रमिक शिक्षणात लावली गेलेली त्यांची पुस्तके आजच्या पिढीला समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख, दैन्य समजायला मदतगार ठरणार असल्यामुळे पन्नालालच्या प्रयत्नांना मदत होणार आहे.
महाराष्ट्र अंनिसचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पुरस्कार सुरू करण्यामागील भूमिका प्रास्ताविकात व्यक्त केली. त्यांनी भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी त्यांच्या शोषणाला, अधोगतीला कारणीभूत ठरलेल्या अंधश्रद्धा विरोधात प्रबोधनाचे प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी काम करणार्या पन्नालाल राजपूत सारख्या चिवट, लढाऊ पण एकाकीपणे लढणार्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. पुरस्कार रूपात रोख रूपये 11,000/-, स्मृतीचिन्ह आणि शाल मा.पन्नालाल राजपूत यांना देण्यात आले. पुरस्कारार्थी पन्नालाल राजपूत यांनी धन्यवाद व्यक्त करताना या पुरस्कारामुळे समाजासाठी लढण्याची उर्मी मिळाल्याची भावना व्यक्त केली. एकटेपणा जाणून आपल्या सोबत समाजातील काही संघटना व चांगली माणसे पाठीशी उभी असण्याची गरज पन्नालाल यांनी सांगितले. भटक्या विमुक्तामधील पारधी समाजाला लागलेले गुन्हेगारीचा कलंक आणि त्यामुळे होणारे अत्याचार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाची मानसिकता बदलविणे आवश्यक आहे. भटक्या समाजाला स्थिर व सुरक्षित जीवन जगण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा ह्या प्रसंगी व्यक्त केली आहे.
पहिल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे संयोजन गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर यांचे वतीने करण्यात आले होते. विचारमंचावर संस्थेचे सहसचिव अॅड.एच.एन.जांभुळे उपस्थित होते. पाहुण्याचे स्वागत व परिचय संस्थेचे सचिव आणि महाराष्ट्र अंनिसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके यांनी केले. सूत्रसंचालन सर्पतज्ज्ञ व समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी तर आभार पी.एम.जाधव यांनी केले. याप्रसंगी राज्य सरचिटणीस शहाजी भोसले आणि विदर्भातून आलेले समितीचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास गर्गेलवार, चंदू फुलझेले, देविदास नेताम, चव्हाण, डॅनिअल देवगडे आणि डांगरे यांनी अथक परिश्रम घेतले. हा पुरस्कार पालघर येथील अंनिसचे अण्णा कडलास्कर यांच्या आर्थिक सहकार्यातून देण्यात येतो.
-गजेंद्र सुरकार, वर्धा.