भारतरत्न नेल्सन मंडेला यांचे ‘स्वाधीनतेकडे प्रदीर्घ वाटचाल’ हे आत्मचरित्र म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील काळ्या जनतेने वर्णभेदाविरोधात दिलेल्या संघर्षाची एक प्रेरणादायी कहाणी आहे. जी जगभरच्या मानवमुक्तीसाठी चाललेल्या लढ्याला सदैव प्रेरणा देत राहील. काळ्या जनतेच्या या शौर्यशाली लढ्याला घडवण्याचे कार्य मंडेला यांनी केले आणि या शौर्यशाली लढ्यानेच मंडेलांना इतिहास घडवणार्या अजरामर अशा महापुरूषांंच्या यादीत समाविष्ट केले. त्यांचे व्यक्तित्व आणि विचार या लढ्यातून विकसित झाले. ‘माण्ाूस परिस्थितीला आणि परिस्थिती माणसाला घडवते’ हे व्दंव्दात्मक स्वरूप या आत्मचरित्रात ठळकपणे आपल्याला पाहाता येते. अर्थात हे सर्वच प्रकारच्या विकासाला लागू होणारे तत्त्व आहे. तो एक समाजविकासाचा गतीविषयच आहे.
1602 सालच्या एप्रिल महिन्यात एका गोर्या माणसाने द.आफ्रिकेच्या भूमीवर पाय ठेवला. गोरे लोक याच दिवसाला द.आफ्रिकेचा राष्ट्र जन्मदिवस मानतात. तर काळ्या जनतेसाठी हा दिवस त्यांच्या गुलामगिरीचा आरंभ दिवस होता. जंगल, पाणी, खनिज, सोन्याच्या खाणी यांनी समृध्द असलेल्या द.आफ्रिकेवर ब्रिटीश, फ्रेंच, डच या सर्वच वसाहतवादी देशांची नजर वळली. जशी आपाल्याकडे मसाल्यांच्या पदार्थांसाठी वळली. व्यापारासाठी आले आणि राज्यकर्तेबनले, अशी स्थिती थोड्याफार प्रमाणात वसाहतवाद्यांना बळी पडलेल्या सर्वच देशांबाबत आहे. द.आफ्रिकाही त्याचीच भक्ष्य ठरली. याचा अर्थ काळ्या जनतेच्या संदर्भातील वर्णभेद ही आपल्याकडील जातीभेदासारखी धर्मप्रणीत गोष्ट नाही. भारतात वरच्या जातींनी आपल्या शोषणासाठी हे जातीयंत्र जसे घडवले तसेच वर्णभेदाचे तत्वज्ञान त्यासाठीच घडवण्यात आले. पण ते अर्थातच अर्वाचीन आणि भांडवली साम्राज्यवादी शोषणाच्यापोटी जन्माला आले.
द.आफ्रिकेत परंपरेने देशाच्या वेगवेगळ्या विभागात राहणार्या झुलू, खोसा, स्वान यासारख्या समूह टोळ्या होत्या. त्यांचे राजे होते. त्यांची संस्कृती होती. आदिवासी जनजातींच्या संस्कृतीप्रमाणे जमीन सर्वांच्या मालकीची तर कुटूंब म्हणजे सर्व नातेवाईक, त्यात जवळचे आणि लांबचे असा भेद नव्हता. मंडेला हे खोसा जमातीतून आले. त्यांचे कुटूंब राजाला सल्ला देणारे होते, म्हणजे त्या समाजात वरच्या दर्जाचे. या सर्व जमातीनां स्वत:ची अशी तीव्र अस्मिता असते. स्वत:चे निती-नियम असतात आणि ते काटेकोरपणे पाळले जातात. येथेही परकियांनी फोडा आणि झोडा हे तंत्र वापरून या जमातींत कधीही ऐक्य साधले जाणार नाही अशा पद्धतीचे राजकारण करून ’मूठभर’ गोर्या लोकांनी या बहुसंख्य लोकांना गुलामगिरीत ढकलले. खुद्द मंडेलांना आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही काही काळ आपल्या ’खोसा’ असण्याचा फारच अभिमान होता. हळूहळू त्यांनी या भावनेवर मात केली. आपल्या आत्मचरित्रात ही गोष्ट त्यानी स्पष्टपणे नमूद केली आहे. आजूबाजूच्या आफ्रिकन देशात, युरोपात आणि अमेरिकेत चाललेल्या काळ्या जनतेच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा परिणाम म्हणून हळूहळू आपल्या स्थानीक अस्मिता बाजूला पडून एक आफ्रिकन अस्मिता पुढे आली. त्यातूनच एकमेकांना सहकार्य करीत काळ्या जनतेचा मुक्ती लढा व्यापक मानवमुक्तीचा लढा बनला.
द.आफ्रिकेत मूठभर गोरे, अर्धगोरे म्हणजे मिश्र रंगाचे, भारतीय आणि काळ्या वर्णाचे असे चार प्रकारचे लोक होते. काळ्या वर्णाचे लोक अर्थातच बहुसंख्य होते. द.आफ्रिका त्यांचीच होती. बरेच भारतीय लोक कामानिमित्त तेथे गेले होते व स्थायिकही झाले होते. त्यांचीही संख्या बरीच मोठी आहे. म.गांधीनी वर्णभेदाविरोधात आवाज उठविल्याचे आपल्याला माहीतच आहे. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवातच द. आफ्रिकेतून आहे. या चार प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे होते. तुरूंगातही हा भेदभाव पाळला जात असे. म्हणजे गोर्या गुन्हेगारांना वेगळी वागणूक, त्यांना चांगले जेवण. त्या खालोखाल अर्धगोर्या म्हणजे मिश्र वर्णाच्या लोकांना, त्या खालोखाल भारतीयांना आणि सर्वात निकृष्ट जेवण काळ्या गुन्हेगारांना.
मंडेलांच्या या आत्मचरित्रात आपल्याला द. आफ्रिकेतील काळ्या जनतेच्या रणसंग्रामाचे अनेक लढे पाहावयास मिळतात. खरेतर हा इतिहास वाचतांना आपल्याला आपल्या देशातील संदर्भ आठवतात. उदा. तेथील सुुरवातीचा लढा अर्ज, विनंत्या या प्रकारचाच होता जसा आपल्याकडे होता. अगदी म.गांधीनीही पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली नव्हती. अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवू वैगेरे गांधी मांडत होते. द.आफ्रिकेतही हेच आपल्याला पहायला मिळते. द. आफ्रिकेतील कम्युनिस्ट पक्ष आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या अर्ज, विनंत्यांच्या धोरणाला विरोध करणारे जहाल मात्र सशस्त्र संघर्षाचीच भाषा करीत होते. तीच गोष्टही आपल्याला आपल्या स्वातंत्र्य लढ्यात पाहाता येते. मंडेलांनी या लढ्याबद्दल सविस्तर लिहीले आहे. मंडेलाही पूर्वी गांधींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाची भाषा करीत असत. पण पुढे पुढे त्यांचा भ्रमनिरास झाला. एक तर भारतातील गोरे राज्यकर्ते आणि द.आफ्रिकेतील गोरे राज्यकर्ते यामध्ये असणारा फरक त्यांनी विशद केलेला आहे. आणि भारतातील गोरे राज्यकर्ते येथील गोर्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त सुसंस्कृत आहेत असे मांडले. त्यामुळे त्यानी अहिंसेचा मार्ग सोडून सशस्त्र मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्णय घेतला आणि खुद्द मंडेलाच या संघटनेचे पुढारी बनले. पण हिंसा हे तत्वज्ञान होऊ शकत नाही तर तो परिस्थीतीने लादलेला प्रतिकाराचा मार्ग ठरतो. असे मंडेलांनी म्हटले आहे, ‘या मोहीमेतून एक धडा मी शिकलो, तो म्हणजे सशस्त्र प्रतिकाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय आता उरला नाही अहिंसात्मक प्रतिकाराचे सर्व प्रकार भाषणे , निवेदन, मोर्चे, धमक्या, संप, हरताळ, जेलभरो असे सर्व उपाय आलटून पालटून वापरले होते व ते खुंटले होते. कारण आमची कोणतीही कृती पोलादी पंजाने चिरडून टाकली गेली. दडपशाही करणाराच शेवटी स्वातंत्र्यलढा लढणार्या सैनिकाचे हत्यार ठरवतो हे सत्य स्वातंत्र्यसैनिक महा प्रयत्नांनी शिकतो आणि हे हत्यार दडपशाही करणार्याच्याच हत्याराचेे प्रतिबिंब असते. तो दुसरा पर्यायच शिल्लक ठेवत नाही. एक वेळ अशी येते की आगीचा मुकाबला आगीनेच करणे शक्य होते’ अशा प्रकारे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सशस्त्र गटाचे नेतृत्व आणि संघटन मंडेला यांच्याकडे आले.
सुरूवातीच्या काळात मंडेलांचे कम्युनिस्ट चळवळीबद्दल खूपच मतभेद होते. कारण कम्युनिस्ट चळवळीच्या नेतेपदी एकतर गोरे असत किंवा भारतीय असत आणि या दोघांबद्दलही त्यांना सुरूवातीला अविश्वास वाटत असे. अर्थात चळवळीच्या रणांगणात प्रत्यक्ष अनुभवातून मंडेलांचा हा अविश्वास दूर झाला. पुढेतर ते कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रिय कमिटीचे सभासद झाले. त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला, मार्क्सवादाची पुस्तके अनुवादित केली, अभ्यासवर्ग घेतले. त्यामुळे मंडेलांचे ध्येय अधिक व्यापक बनले. केवळ वर्णभेद शोषणाचे कारण नाही तर भांडवलशाही-साम्राज्यवाद हे शोषणाचे कारण आहे. त्यामुळे हा लढा खूपच व्यापक बनला. द.आफ्रिकेच्या गोर्या राज्यकर्त्यांना कम्युनिस्टांची भिती वाटत असल्याने त्यानी केलेले सर्व कायदे कम्युनिस्टांना नेस्तनाबूत करण्यासाठीच केलेले असायचे. द.आफ्रिकेच्या कम्युनिस्ट पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी द.आफ्रिकेचा वर्णलढा आणि वर्गलढा वेगवेगळे मानले नाहीत. अनेक कम्युनिस्ट नेते हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचेही नेते होते. मंडेलांबरोबर सर्वानीच दीर्घकाळ सजा भोगल्या, अनेकजण लढ्यात मारले गेले.
हळूहळू मंडेला हे काळ्या जनतेच्या प्रतिकाराच्या लढ्याचे प्रतिक बनले. त्यामुळे त्यांना मोकळे ठेवणे म्हणजे सर्वनाश ओढवून घेणे हे गोर्या सरकारला कळून चुकले. म्हण्ाुनच आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या संपूर्ण कमिटीला ज्यात अनेक कम्युनिस्ट नेते होते त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला भरला गेला. मंडेला व्यवसायाने वकील होते. त्यामुळे कायद्याचा लढाही त्यांनी अगदी तोडीस तोड लढवला व गोर्या सरकारचे खोटे षडयंत्र उघड पाडले. या सर्वांच्या अटकेनंतर आणि त्यांच्यावर खटला चालू असण्याच्या काळात देशभर प्रचंड आंदोलने झाली. प्रचंड हिंसाचार घडून आला. ज्याचा एक परिणाम असा झाला की, मंडेलांना देशद्रोहासाठी देण्यात आलेली फाशीची शिक्षा दीर्घ तुरुंगवासात परावर्तीत झाली. तुरुंगात असण्याच्या काळात मंडेला आणि इतर नेत्यांनी जनतेला मार्गदर्शन करण्याची आणि जनतेचा लढा सातत्याने चालू राहील याची काळजी घेतली.
मंडेलांनी या तुरुंगवासातील दिवसांचे छान वर्णन केले आहे. त्याचे भांडवल करण्याचा तर त्यांनी अजिबात प्रयत्न केलेला नाही. तुरुंगवास म्हणजे मनाला निराशेत ढकलणारी गोष्ट असते. एकांतात डांबून ठेवलेल्या माणसाचे मनोधैर्य ताबडतोब ढासळते. मंडेला आणि त्यांच्या साथीदारांनी हे मनोधैर्य सतत जपण्याचा प्रयत्न केला आणि ते कधीही निराशेच्या आहारी गेले नाहीत.
जागतिक दबाव आणि द. आफ्रिकेतील लढ्याची वाढती व्याप्ती पाहता द. आफ्रिकेच्या गोर्या सरकारला आपण फार काळ अश्या प्रकारे राज्य करू शकत नाही याची जाण आली. हे असेच चालू राहीले तर कम्युनिस्ट क्रांती दूर नाही हे त्यांनी ओळखले. मूठभर गोर्यांच्या सरकारचे अस्तित्वच त्यामुळे धोक्यात येईल हे त्यांनी जाणले आणि आफ्रिकन नॅशनल काँग्रेसशी तडजोडीचे धोरण त्यांनी स्विकारले. आपल्याकडे ज्या प्रमाणे ब्रिटीशांनी स्वातंत्र्य देतांना आपले आर्थीक हितसंबंध शाबूत ठेवले त्याचप्रमाणे द. आफ्रिकेतील गोर्या राजवटीनें केले. सुरूवातील काळ्या जनतेच्या हातात राज्यसत्ता देतांनाही अंतिम सत्ताही आपल्याच हातात कशी राहील हेच गोर्यांनी पाहिले व तशाच तरतुदी त्यांनी सुचविल्या. पण मंडेलांनी अशा कुठल्याही तरतुदींना मान्यता दिली नाही. निवडण्ाुकीच्याच मार्गाने सरकार येईल व कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा राहाणार नाही याची हमी त्यांनी दिली. गोर्या सरकारने आफ्रिकन नॅशनल काँग्रसने कम्युनिस्टांशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नयेत अशी अट घालण्याचा प्रयत्न केला, परंतु मंडेला यांनी तो धुडकावून लावतांना म्हटले, आम्हाल आजवर माण्ाुसकीची वागण्ाूक जर कोणी दिली असेल तर ती कम्युनिस्टांनीच. असा मित्र आम्ही कुठल्याही किंमतीला गमावणार नाही.
सत्ता काळ्या जनतेच्या हातात आली. आपल्याच भूमीत गुलामगिरी भोगणारी आफ्रिकेची जनता स्वतंत्र झाली. वर्णभेद संपुष्टात आला पण वर्गभेद , वर्गीय शोषण आजही चालूच आहे. आपण जसे आपल्या स्वातंत्र्याबद्दल बोलतो की गोरा साहेब जाऊन काळा साहेब सत्तेवर आला तशीच काहीशी परिस्थीती आज द. आफ्रिकेची आहे. आणखी एक स्वातंत्र्य लढा बाकी आहेच. मंडेलांनी आपल्या आयुष्याचे दान देऊन वर्णभेदाची राजवट संपुष्टात आणली. पण त्यांचे समाजवादाचे स्वप्न मात्र साकार झाले नाही. ते जेव्हा साकार होईल तेव्हाच मंडेलांना आपण खरीखुरी आदरांजली देऊ शकू. आजही जगभर चाललेल्या साम्राज्यावादी शोषणाविरूद्धच्या लढ्यात आणि कामगारवर्गाच्या मुक्ती लढ्यात मंडेलांचे त्यागमय, शौर्यशाली जीवन आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. त्यासाठी आपण सर्वानी मंडेलांचे आत्मचरित्र वाचलेच पाहिजे.
–सुभाष थोरात
मोबा. 9869392157